विद्यार्थी मित्र-मत्रिणींनो, अखेरीस डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात नवा अभ्यासक्रम व पॅटर्ननुसार केंद्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा पार पडली. आयोगाने आपल्या नेहमीच्या अनपेक्षित धक्कातंत्राचा पुरेपूर वापर केल्याचेच निदर्शनास येते. अर्थात त्यामुळे आपल्या तयारीस एक दिशा मिळेल यात शंका नाही. आजपासून पुढे ‘सामान्य अध्ययन-२’ च्या तयारीविषयी चर्चा करणार आहोत. या लेखात एकंदर मुख्य परीक्षेसंदर्भातील सर्वसाधारण निरीक्षणे आणि ‘सामान्य अध्ययन पेपर-२’ (भारतीय राज्यघटना व कारभारप्रक्रिया आणि आंतरराष्ट्रीय राजकारण)ची तयारी या प्रमुख दोन बाबींची चर्चा करणार आहोत.
यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू करताना मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम व मागील प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अभ्यासक्रम तर आपल्यासमोर होताच; आता त्यावर आधारित पहिली प्रश्नपत्रिका आपल्या हाती आल्यामुळे अभ्यासाची व्याप्ती आणि दिशा ठरवणे अधिक सुलभ होईल. म्हणूनच निबंधाच्या पेपरपासून वैकल्पिक विषयांच्या पेपरसह सर्व प्रश्नपत्रिकांचे बारकाईने अवलोकन करणे उपयुक्त ठरेल. त्यात प्रश्न कोणत्या घटकांवरील आहे, प्रश्नाचे स्वरूप माहितीप्रधान आहे की विश्लेषणात्मक आहे, प्रश्न जुन्या माहितीची विचारणा करणारा आहे की अलीकडे घडलेल्या घडामोडींविषयी आहे, अशा विविध पद्धतीने प्रत्येक प्रश्न व प्रश्नपत्रिकेचे सखोल विश्लेषण करावे, या दृष्टिकोनातून विचार केल्यास नुकत्याच पार पडलेल्या  मुख्य परीक्षेतून काही प्राथमिक, परंतु अत्यंत निर्णायक स्वरूपाचे धडे घेणे महत्त्वाचे ठरते.
सर्वप्रथम, नवी प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर २५० गुणांच्या सामान्य अध्ययनाच्या पहिल्या ३ पेपरमध्ये एकूण २५ प्रश्न तर चौथ्या पेपरमध्ये १६ प्रश्न विचारलेले  आहेत, हे लक्षात येते. सा. अ. १, २ व ३ या पेपर्सचा विचार केल्यास प्रश्नांची संख्या वाढलेली आहे. दुसरी बाब म्हणजे प्रत्येक प्रश्नाला १० गुण निर्धारित केलेले आहेत. प्रत्येक प्रश्न २०० शब्दांत लिहावा, असा स्पष्ट निर्देश दिलेला आहे. याचा अर्थ तीन तासांत सुमारे पाच हजार शब्द लिहावयाचे आहेत. जुन्या पद्धतीशी तुलना करता नव्या पद्धतीत जवळपास पूर्वीपेक्षा ४० ते ५० टक्के एवढय़ा अधिक प्रमाणात उतरे लिहावी लागणार आहेत आणि आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आयोगाने प्रश्नपत्रिकेतील सर्वच्या सर्व प्रश्न अनिवार्य केले आहेत आणि कोणत्याही प्रकारचा अंतर्गत विकल्प शिल्लक ठेवलेला नाही. म्हणजे दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिणे अत्यावश्यक बनले आहे.
सामान्य अध्ययन पेपर-२ मध्ये भारतीय राज्यघटना, राज्यव्यवस्था, कारभारप्रक्रिया तसेच आंतरराष्ट्रीय राजकारण या घटकांचा समावेश होतो. इतर विषयांप्रमाणेच या विषयाच्या तयारीची सुरुवात त्यातील अभ्यासक्रमाच्या आकलनाद्वारे करावी लागणार यात शंका नाही. आयोगाने निर्धारित केलेला अभ्यासक्रम समोर ठेवून त्यातील प्रत्येक प्रकरणात साधारणत: कोणकोणते घटक-उपघटक संभाव्यपणे समाविष्ट होतात याची सविस्तर यादीच करावी. त्यामुळे नेमक्या कोणकोणत्या व किती घटकांचा अभ्यास करायचा आहे, हे ठरवणे सुलभ होईल. त्यानंतर महत्त्वाची पायरी म्हणजे या वर्षीची प्रश्नपत्रिका होय. त्यातील एकूण २५ प्रश्नांचे बारकाईने विश्लेषण करून अभ्यासाची व्याप्ती, खोली आणि दिशा ठरवावी लागेल. ही बाब स्पष्टपणे लक्षात यावी यासाठी खाली आयोगाने विचारलेल्या अभ्यासघटकांची थोडक्यात परंतु नेमकी यादी दिलेली आहे.
* भारतीय राज्यघटना व कारभारप्रक्रिया
* पक्षांतरबंदी कायदा व संसद सदस्यांची भूमिका.
* माहिती अधिकार व विचार-अभिव्यक्तिस्वातंत्र्य यातील विवाद.
* केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचे निर्देश व नागांच्या विशेष स्थानावरील परिणाम व ३७१ (अ) कलम.
* सर्वोच्च न्यायालयाचे संसदेच्या घटनादुरुस्ती अधिकारावरील नियंत्रण.
* सुशासनासाठी पंचायतराज विकेंद्रीकरणाप्रमाणेच छोटय़ा राज्यांचा उपाय.
* आंतरराज्य जलवाटपाच्या घटनात्मक यंत्रणेतील रचनात्मक व प्रक्रियात्मक उणिवा.
* १३ वा वित्त आयोग – स्थानिक शासनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन.
* माध्यान्ह भोजन योजना इतिहास, वर्तमान स्वरूपाचे मूल्यमापन.
* दबावगटांची रचना व कार्याचे मूल्यमापन.
* स्वयंसाहाय्यता गटांचे मूल्यमापन व परीक्षण.
* प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र पुरस्कृत योजनांच्या पुनर्रचनेची गरज.
* युनोच्या सहस्रक जाहीरनाम्यातील आरोग्यविषयक उद्दिष्टे व भारतीय शासनाच्या कृतींच्या यशाची चर्चा.
* नागरिकांच्या सनदेची फलनिष्पत्ती.
* राष्ट्रीय लोकपाल सार्वजनिक जीवनातील अनतिकतेची समस्या.
* आंतरराष्ट्रीय संबंध
* अफगाणिस्तानातून आंतरराष्ट्रीय सुरक्षा सन्य काढून घेण्यात शेजारील प्रदेश व भारतीय सुरक्षेसमोर निर्माण होणारी आव्हाने.
* ‘स्ट्रिंग्ज ऑफ पर्ल्स’ धोरण, भारतावरील परिणाम व उपाय.
* भारत-जपान आíथक संबंधातील अडथळे.
* बांगलादेशातील शाहबाग आंदोलन आणि भारतावरील परिणाम.
* मालदीवमधील उलथापालथ व भारत.
* भारत-श्रीलंकेसंबंधात स्थानिक/राष्ट्रीय घटकांचा प्रभाव.
* गुजराल धोरण व त्याची समर्पकता
* जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी – कार्य, भूमिका व अधिकारक्षेत्र.
वस्तुत: वरील सर्व मुद्दे बारकाईने विचारात घेता या पेपरची तयारी करण्यासाठी पुढील घटकांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे ठरते.
० भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाच्या तरतुदी, शासनाची चौकट, यंत्रणा यांचा अभ्यास.
० विविध घटनात्मक संस्थांची अपेक्षित भूमिका व कार्य याबरोबरच प्रत्यक्ष व्यवहार व त्याचे मूल्यमापन.
० विविध कायदे, शासनाची धोरणे यांचा व्यक्तीचे मूलभूत अधिकार, काही प्रदेशांचे घटनात्मक स्थान, केंद्र-राज्य संबंध यावर होणारा परिणाम.
० प्रस्तावित विविध संस्था-यंत्रणांची समस्या निराकरणाच्या संदर्भातील उपयुक्तता.
० एकंदर कारभारप्रक्रियेवर परिणाम करणारी कोणतीही बाब.
० आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या बाबतीत भारताचे शेजारील राष्ट्रांशी व इतर देशांशी असणारे संबंध; आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतील संस्था, कळीचे मुद्दे आणि घडामोडींचा भारतावरील परिणाम; प्रादेशिक संघटना आणि भारताचे परराष्ट्र धोरण या महत्त्वपूर्ण बाबींची थोडक्यात ऐतिहासिक पाश्र्वभूमी, सद्य:स्थिती, त्यातील कळीचे मुद्दे आणि भवितव्य यासंबंधी आकलन.
थोडक्यात, पारंपरिक अभ्यास घटक, त्यांचा आतापर्यंतचा व्यवहार व वाटचाल, समकालीन घडामोडी या तिन्ही आयामांचा सविस्तर अभ्यास करावा लागेल. अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकाच्या समकालीन आयामावर (चालू घडामोडी) बारीक नजर ठेवावी लागेल आणि त्यातून पुढे येणारे मुद्दे समग्रपणे तयार करावे लागतील. दुसरी महत्त्वाची बाब जिथे-जिथे संकल्पनात्मक आकलन अत्यावश्यक आहे, तिथे त्याकडे योग्य लक्ष द्यावे लागणार. त्या दृष्टीने एनसीईआरटी, निवडक संदर्भग्रंथ आणि वर्तमानपत्रे व नियतकालिकांचे नियमित वाचन उपयुक्त ठरेल. उपरोक्त तयारीनंतर निर्णायक ठरणारी बाब म्हणजे लेखनाचा भरपूर सराव. कारण वाढलेली प्रश्नसंख्या, शब्दसंख्या आणि विकल्पाचा अभाव यामुळे लिखाणाचा वेग महत्त्वाचा ठरणार आहे आणि बरेच प्रश्न हे विचार करून लिहावे लागणार असल्यामुळे त्यासाठीदेखील जलद विचार व लेखनाचा वेग मध्यवर्ती ठरणार यात शंका नाही.
उपरोक्त सर्व बाबींचा विचार करता समग्र अभ्यासाबरोबरच वेळेचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. निर्धारित तीन तासांत जास्तीत-जास्त प्रश्नांची उत्तरे लिहिता यावीत यासाठी गतिमान लेखनकौशल्यच मध्यवर्ती ठरणार आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे माहिती असूनदेखील मोठी शब्दमर्यादा आणि भरपूर प्रश्न यामुळे २५० गुणांपकी कमाल १५० ते १७० गुणांचाच पेपर लिहिता आला, अशी सर्वच विद्यार्थ्यांची दशा झाली. त्यामुळे या नव्या पॅटर्नमध्ये लेखनाकडे अभ्यासाइतकेच किंबहुना त्यापेक्षाही जास्त लक्ष देणे अत्यावश्यक बनले आहे. अर्थात त्यासाठी नियमित व प्रचंड सराव हेच उत्तर आहे. त्यामुळे लेखनाची गती तर वाढेलच परंतु आपल्या मांडणीत नेमकेपणा व सुसंघटितपणा येईल आणि त्याद्वारेच जास्तीत-जास्त प्रश्नांची दर्जेदार उत्तरे लिहिता येतील. थोडक्यात, प्रथमदर्शनी विचार करता नवी यूपीएससी विद्यार्थ्यांच्या समग्र आकलनाबरोबरच लेखनकौशल्याची व त्यासंबंधी वेळेच्या नियोजनाची कसोटी पाहणारी आहे, यात शंका नाही.                                                                                           admin@theuniqueacademy.com

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नियोजित परीक्षा- २०१४
० इंडियन इकोनॉमिक अ‍ॅण्ड इंडियन स्टॅटिस्टिकल सव्‍‌र्हिसेस एक्झामिनेशन.
परीक्षेची प्रस्तावित तारीख : २४ मे. अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० मार्च.
० जिऑलॉजिस्टस् एक्झामिनेशन.
परीक्षेची प्रस्तावित तारीख : २४ मे. अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ मार्च.
० सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स असिस्टंट कमांडंट एक्झामिनेशन.
परीक्षेची प्रस्तावित तारीख : १ जून. अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ मार्च.
० इंजिनीअरिंग सव्‍‌र्हिसेस एक्झामिनेशन. परीक्षेची प्रस्तावित तारीख : २० जून. अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ एप्रिल.
० कंबाइन्ड मेडिकल सव्‍‌र्हिसेस एक्झामिनेशन.
परीक्षेची प्रस्तावित तारीख : २२ जून. अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ एप्रिल.
० सेंट्रल आम्र्ड पोलीस फोर्सेस एक्झामिनेशन.
परीक्षेची प्रस्तावित तारीख : १३ जुलै. अर्ज करण्याची शेवटची तारीख : ५ मे.
० सिव्हिल सव्‍‌र्हिसेस (प्रिलिमिनरी एक्झामिनेशन).
परीक्षेची प्रस्तावित तारीख : २४ ऑगस्ट. अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ जून.
० इंडियन फॉरेस्ट सव्‍‌र्हिसेस एक्झामिनेशन.
परीक्षेची प्रस्तावित तारीख : २४ ऑगस्ट. अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ जून.
० नॅशनल डिफेन्स अकादमी व नेव्हल अकादमी एक्झामिनेशन.
परीक्षेची प्रस्तावित तारीख : २८ सप्टेंबर. अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ जुलै.
० इंडियन फॉरेस्ट सव्‍‌र्हिसेस एक्झामिनेशन.
परीक्षेची प्रस्तावित तारीख : २२ नोव्हेंबर. अर्ज करण्याची शेवटची तारीख : सूचित करण्यात येईल.
० सिव्हिल सव्‍‌र्हिसेस (मेन) एक्झामिनेशन. परीक्षेची प्रस्तावित तारीख : १४ डिसेंबर. अर्ज करण्याची शेवटची तारीख : सूचित करण्यात येईल.
 वरील स्पर्धात्मक निवड परीक्षा या निर्धारित शहरातील परीक्षा केंद्रांवर राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येतात. अधिक माहितीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.