केंद्रीय लोकसेवा आयोगाने गेल्या वर्षी नागरी सेवांसाठी घेतल्या जाणाऱ्या पूर्वपरीक्षेचे स्वरूप बदलले. सामान्य अध्ययनाच्या कक्षा वाढवत ‘अभिवृत्ती कल चाचणी’ या नव्या पेपरची भर घालून परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले. हा बदल करत असताना आयोगाने ‘पूर्व परीक्षेचा नवा पॅटर्न २०११ मध्ये लागू होईल व २०११ ची मुख्य परीक्षा ही जुन्या पॅटर्ननुसारच होईल,’ अशी घोषणा केली होती.
या घोषणेद्वारेच आयोगाने मुख्य परीक्षेतील संभाव्य बदलाबाबतचे संकेत दिले होते. २०११ची मुख्य परीक्षा जुन्या पॅटर्ननुसारच होईल. मात्र २०१२ किंवा २०१३ मध्ये बदल होऊ शकतात, असा तो इशारा होता. या संकेतांना व बदलाच्या शक्यतेला पुष्टी देणारी माहिती अलीकडेच दिल्लीतील एका कार्यक्रमात आयोगाचे अध्यक्ष श्री. डी. पी. अगरवाल यांनी दिली.
    केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. डी. पी. अगरवाल म्हणाले, ‘‘अनेक भाषा, संस्कृती आणि समाज यांनी युक्त अशा या महासागरातून गरजेला सुसंगत असा योग्य उमेदवार निवडणे या कामासाठी आयोगाने उच्चस्तरीय मंडळ नेमले आहे. हे मंडळ मुख्य परीक्षेच्या प्रारूपात अपेक्षित बदल सुचवतील. अध्यक्षांनी सविस्तर बोलणे टाळले असले तरी त्यांनी स्पष्ट केले की, आयोगाचा प्रयत्न हाच आहे की सर्व उमेदवार आयत्या वेळच्या घटकेला गोळा केलेल्या माहितीपेक्षा सखोल ज्ञान व त्याची जाण, या आधारावर जोखले जातील अशी परीक्षापद्धती अपेक्षित आहे. काही विशिष्ट बदल घडवून आणण्यासाठी कार्यरत असलेले मंडळ ‘नागरी सेवा परीक्षांमधील बदल’ या विषयावर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन (ए. आर. सी.)ची शिफारस विचारात घेतील.
    ‘एआरसी’ने त्यांच्या २००८च्या शिफारशींमध्ये सुचवले होते की, नागरी सेवा मुख्य परीक्षेतील अभ्यासक्रमातून उमेदवाराची प्रशासकीय आणि व्यवस्थापन क्षमता जोखली जात नाही. या दृष्टीने प्रचलित अभ्यासक्रमातील सामान्य अध्ययनचे दोन पेपर व निबंध याशिवायच्या सर्व वैकल्पिक विषयांबाबत गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे, असे सुचवले होते. आयोगाच्या अध्यक्षांनी अशा प्रकारचे सूतोवाच केल्यामुळे २०१३ वा २०१४ साली होणाऱ्या मुख्य परीक्षेच्या प्रारूपात नक्कीच बदल होतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.
  साधारणपणे डिसेंबरच्या चौथ्या आठवडय़ात परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध होते आणि मे महिन्यात पूर्वपरीक्षा असते. मुख्य परीक्षेत बदल होतील, अशी नुसतीच चर्चा गेल्या वर्षभरात होत असली तरी अधिकृतपणे कोणीच काही सांगू शकत नाही, असे संभ्रमाचे वातावरण आहे. पूर्वपरीक्षेतील २०११च्या अभ्यासक्रम बदलाबाबत आयोगाने एक वर्षांपूर्वी पूर्वसूचना दिली होती, त्यामुळे तो बदल स्वीकारणे उमेदवारांना अवघड गेले नाही. या पाश्र्वभूमीवर मुख्य परीक्षेतील बदलाबाबत आयोग पूर्वसूचना देऊन २०१३च्या परीक्षेत तात्काळ बदल करणार नाही अशी एक शक्यता आहे. पण नुसत्या शक्यतेवर विश्वास ठेवता येत नाही व विसंबूनही राहता येत नाही, कारण ती ‘यूपीएससी’ आहे!
    सन २००० साली आयोगाने मुख्य परीक्षेत वैकल्पिक विषयांचा अभ्यासक्रम बदलला होता. वाङ्मय विषयांचा तर पूर्णत: नवीन अभ्यासक्रमच घोषित केला होता. या बदलाबाबत कोणतीही पूर्वसूचना आयोगाने दिली नव्हती. जानेवारी २०००च्या पहिल्या आठवडय़ात जाहिरात प्रसिद्ध झाली आणि सोबत नवीन अभ्यासक्रमसुद्धा! या धक्कातंत्राने ‘परीक्षेपूर्वीच एक परीक्षा’ अशी उमेदवारांची अवस्था झाली होती. आयोगाच्या अशा
जुन्या सवयी पाहता जाहिरातीसोबत नवीन अभ्यासक्रम किंवा नवा पॅटर्न घोषित केलाच तर जास्त आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. तेव्हा पॅटर्न बदलाबाबत आयोग पुढे काय भूमिका घेईल, हे अनाकलनीय आहे! या पाश्र्वभूमीवर सर्व उमेदवारांसमोर एकच एक पर्याय शिल्लक राहतो की जेव्हा, जसे, जितके बदल होतील त्या बदलांना स्वीकारून जिंकण्यासाठी सामोरे जाण्याचा! नाहीतरी ‘अभिवृत्ती कल चाचणी’चा नवीन पेपर योजण्यामागे आयेागाचा हेतूच हा आहे, की प्रशासकात समोरची परिस्थिती हाताळण्याची ‘व्यवस्थापन क्षमता’ असली पाहिजे. या क्षमतेचा पूरेपूर कस येऊ घातलेल्या पॅटर्न बदलाच्या निमित्ताने लागणार आहे. एक गोष्ट आपण सर्वानी ठामपणे मान्य केली पाहिजे की,
आयोग आपली परीक्षा घेतो आणि आपण परीक्षा देतो. हे एकदा आपण स्वीकारलं की समस्या संपली.
    पूर्वपरीक्षा असो की मुख्य परीक्षा गेल्या १० वर्षांतील ‘यूपीएससी’च्या धोरणाबद्दल ‘नो पॅटर्न इज द पॅटर्न नाऊ,’ हे स्पष्टच आहे. पूर्वपरीक्षेतील प्रश्नांची पद्धत, मुख्य परीक्षेत दरवर्षी बदलणारा  प्रश्नांचा पॅटर्न, एकूणच हे सर्व     बदल स्वागतार्ह आहेत. या सर्व प्रक्रियांतून ‘कसलेला उमेदवारच’ टिकाव धरेल. नुसती माहिती किंवा नुसती घोकंपट्टी हे तंत्र आता कालबाह्य ठरलेले आहे. शिवाय ‘यूपीएससी’ने केलेल्या बदलांची ‘डिट्टो कॉपी’ करण्याचा ‘एमपीएससी’चा प्रयत्नसुद्धा अभिनंदनीय मानावा लागेल. ‘एमपीएससी’ आणि ‘यूपीएससी’ यांचा पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम बव्हंशी समान आहे. ‘एमपीएससी’ने नुसते ‘कॉपी आणि पेस्ट’ तंत्र स्वीकारले आहे आणि या अभ्यासक्रमाच्या प्रत्येक घटकात ‘महाराष्ट्र’ जोडण्याचे श्रम घेतलेले आहेत. पण या नव्या अभ्यासक्रमामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या यशाच्या संधी वाढलेल्या आहेत.
    पूर्वी ‘यूपीएससी’ करणारा वेगळा आणि ‘एमपीएससी’चा अभ्यास करणारा वेगळा असे दोन रस्ते होते. पूर्णवेळ ‘यूपीएससी’ करणारे परीक्षार्थी कधीही ‘एमपीएससी’कडे गांभीर्याने बघायचे नाहीत आणि ‘एमपीएससी’ करणारे यूपीएससीचा विचारसुद्धा करायचे नाहीत. दोन्ही परीक्षांची तयारी करून दोन्ही परीक्षांत यश मिळवणारे काही सन्मान्य अपवाद आहेत, पण ते अपवादच ! आता मात्र ही विभागणी संपली. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये आता दोन्ही परीक्षांची तयारी करण्याचे प्रमाण वाढेल, एकूणच स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचेही प्रमाण वाढेल. त्यामुळे साहजिकच केंद्र व राज्य सेवा परीक्षेत मराठी टक्का वाढेल व नव्या परीक्षा पद्धतीतून चांगल्या अधिकाऱ्यांचेही प्रमाण वाढेल. कालबाह्य ठरलेले आहे. शिवाय ‘यूपीएससी’ने केलेल्या बदलांची ‘डिट्टो कॉपी’ करण्याचा ‘एमपीएससी’चा प्रयत्नसुद्धा अभिनंदनीय मानावा लागेल. ‘एमपीएससी’ आणि ‘यूपीएससी’ यांचा पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम बव्हंशी समान आहे. ‘एमपीएससी’ने नुसते ‘कॉपी आणि पेस्ट’ तंत्र स्वीकारले आहे आणि या अभ्यासक्रमाच्या प्रत्येक घटकात ‘महाराष्ट्र’ जोडण्याचे श्रम घेतलेले आहेत. पण या नव्या अभ्यासक्रमामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या यशाच्या संधी वाढलेल्या आहेत.
    पूर्वी ‘यूपीएससी’ करणारा वेगळा आणि ‘एमपीएससी’चा अभ्यास करणारा वेगळा असे दोन रस्ते होते. पूर्णवेळ ‘यूपीएससी’ करणारे परीक्षार्थी कधीही ‘एमपीएससी’कडे गांभीर्याने बघायचे नाहीत आणि ‘एमपीएससी’ करणारे यूपीएससीचा विचारसुद्धा करायचे नाहीत. दोन्ही परीक्षांची तयारी करून दोन्ही परीक्षांत यश मिळवणारे काही सन्मान्य अपवाद आहेत, पण ते अपवादच ! आता मात्र ही विभागणी संपली. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये आता दोन्ही परीक्षांची तयारी करण्याचे प्रमाण वाढेल, एकूणच स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचेही प्रमाण वाढेल. त्यामुळे साहजिकच केंद्र व राज्य सेवा परीक्षेत मराठी टक्का वाढेल व नव्या परीक्षा पद्धतीतून चांगल्या अधिकाऱ्यांचेही प्रमाण वाढेल.