दिल्लीच्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीत उपलब्ध असणाऱ्या कायदा विषयांतर्गत विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत-
अभ्यासक्रमाचा तपशील व आवश्यक पात्रता :
० पाच वर्षे कालावधीचा बीए-एलएलबी पदवी अभ्यासक्रम : अर्जदारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा कमीत कमी ५०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते यावर्षी बारावीच्या परीक्षेला बसलेले असावेत.
वयोमर्यादा : विद्यार्थ्यांचे वय १ जुलै २०१४ रोजी २१ वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी शिथिलक्षम.
० एक वर्षांचा एलएलएम अभ्यासक्रम : अर्जदारांनी कायदा विषयातील एलएलबी पदवी परीक्षा कमीत कमी ५५ टक्के गुणांसह (राखीव गटातील उमेदवारांसाठी ५० टक्के) उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते एलएलबीच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत.
० कायदा विषयातील संशोधनपर पीएच.डी. : अर्जदार विद्यार्थ्यांनी कायदा विषयातील पदव्युत्तर पदवी कमीत कमी ५५ टक्के गुणांसह (राखीव गटातील उमेदवारांसाठी ५० टक्के) उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते पदव्युत्तर पदवी परीक्षेला बसलेले असावेत.
निवड पद्धती : अर्जदारांची निवड राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या निवड पात्रता परीक्षेद्वारा घेण्यात येईल. ही निवड पात्रता परीक्षा मुंबईसह देशांतर्गत विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल.
अर्जदार विद्यार्थ्यांची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमात प्रवेश दिला जाईल.
अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास सर्वसाधारण गटाच्या विद्यार्थ्यांनी ३००० रु.चा (राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी १००० रु.चा) रजिस्ट्रार, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या नावे असणारा व दिल्ली येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह पाठवावा.
अधिक माहिती व तपशील : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी- दिल्लीच्या http://nludelhi.admissionhelp.com अथवा http://www.nludelhi.ac.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
प्रवेश अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज रजिस्ट्रार, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी- दिल्ली, सेक्टर-१४, द्वारका, नवी दिल्ली ११००७८ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ७ एप्रिल २०१४.