तुमच्यातील विशिष्ट प्रतिभा आणि तुम्ही जे काम करण्यासाठी योग्य ठराल, ते ओळखण्याचे आणि निश्चित करण्याचे काही मार्ग असे आहेत-
* तुम्ही ते काम उत्तम प्रकारे करता. या क्षेत्रात चांगली कामगिरी करण्याची नैसर्गिक क्षमता तुमच्यामध्ये आहे, असे दिसून येते.
* हे कौशल्य तुमच्या आतापर्यंतच्या आयुष्यातील बहुतेक  यश आणि आनंदासाठी जबाबदार राहिले आहे. अगदी लहान वयापासून तुम्हाला ते करण्यात आनंद मिळाला आहे. इतरांकडून त्यासाठी तुम्हाला शाबासकी आणि बक्षिसे मिळाली आहेत.
ल्ल त्या कौशल्याचा विचार कायम तुमच्या मनात घोळत असतो. तुम्हाला त्याबद्दल विचार करायला, वाचायला, बोलायला आणि अधिक जाणून घ्यायला आवडते.  
* तुम्हाला आयुष्यभर त्याबद्दल शिकून घ्यायला आणि त्यात अधिक उत्तमोत्तम कामगिरी करायला आवडते. त्या क्षेत्रामध्येच उत्तरोत्तर प्रगती करण्याची तुम्हाला खरी, आंतरिक इच्छा असते.
* जेव्हा तुम्ही ते करता, तेव्हा काळ जणू स्तब्ध होतो. तुमच्या विशेष प्रतिभेच्या क्षेत्रात तुम्ही दीर्घकाळ न खाता, न झोपता, तासन्तास काम करू शकता, कारण तुम्ही त्यात तितके समरस होता.
* सर्वात शेवटी, तुम्ही जे करण्यासाठी सर्वात योग्य आहात त्यात माहीर असलेल्या व्यक्तींबद्दल तुम्हाला  खरोखरच कौतुक आणि आदर वाटतो.  
तुम्ही आता जे काही करत आहात त्याला जर हे वर्णन लागू पडत असेल, तर तुम्हांला पृथ्वीवर जे कार्य करण्यासाठी आणण्यात आले आहे, त्याकडे- तुमच्या हृदयाची इच्छा घेऊन जाईल.
गोल्स – ब्रायन ट्रेसी, अनुवाद – गीतांजली गीते, साकेत प्रकाशन,
पृष्ठे – २५६, मूल्य – २२५ रु.