शहरांमध्ये आपण पाहतो की, एखाद्या व्यक्तीकडे कलागुण असतील आणि ती लोकांशी संवाद साधण्यात यशस्वी होत असेल, एखादी प्रक्रिया उलगडून दाखवणे तिला शक्य असेल तर साधे पोस्टर लावूनही ते शिकवणी वर्ग सुरू करू शकतात. यामध्ये कला शिकवणीचाही समावेश होऊ शकतो. कमी विद्यार्थी संख्या आणि नियमित संपर्क यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांचे एक छान नाते तयार होते. यातील शिक्षक हा महान कलाकारच असतो असे नाही. पण शिकवणे या प्रक्रियेचा आनंद विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही घेता येतो. मानवी संपर्कातून, नात्यातून, भावनिक बंधातून एखादी कृती करणे, ती करण्यास शिकणे याला खूप महत्त्व आहे. त्याचे एक वेगळे स्वरूप आर्टथेरपीमध्ये पाहिले जाते.

मागील लेखात कलाशिक्षक होण्यासंबंधी जे अभ्यासक्रम पाहिले त्या अभ्यासक्रमांत मानसशास्त्र या विषयाची तोंडओळख करून दिली जाते. कला म्हणजे केवळ कृती शिक्षण किंवा तांत्रिक पातळीवरचे शिक्षण नसून त्याचा आपल्या मनाशी संबंध आहे. जगप्रसिद्ध चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉगसाठी कला ही अभिव्यक्तीचे साधन होतीच परंतु भावनिक ताण, वेदना यांपासून मुक्ती देणारी एक गोष्ट होती. अभिव्यक्ती आणि थेरपी यांचे एक प्रकारचे मिश्रण इथे दिसून येते.

pune , aicte, vernacular language
तंत्रशिक्षण संस्थांतील अध्यापनात आता स्थानिक भाषेचा अधिकाधिक वापर… काय आहे महत्त्वाचा निर्णय?
IAS officer awanish sharan share mpsc examination preparation tip
“इतकंही कठीण नाही” UPSC क्रॅक करण्यासाठी नक्की किती वेळ अभ्यास करावा? खुद्द प्रसिद्ध IAS नं दिल्या टिप्स
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत
Academic difficulties Psychological assessment Career counseling
ताणाची उलगड: स्वत:ला स्वीकारा

लहान मुलांना ज्या प्रकारची गाणी, गोष्टी सांगितल्या जातात, क्लिष्ट कृती करायला सांगितल्या जातात त्याचे स्वरूप ही एक प्रकारची थेरपी असते. प्रौढांसाठीही मधल्या काळात चित्र रंगवण्याची पुस्तके आली होती. त्यात फार काही वेगळे नव्हते. पण त्यामागे एक थेरपी होती. डोळ्यांना आकर्षक वाटेल असे काही साचे, नक्षी असतात. त्यांचे स्वरूप क्लिष्ट असते. हे बारीक काम रंगीत पेन्सिलीने रंगवायचे असते. मन त्यात गुंतल्यावर तणाव, वेदनांचा विसर पडतो, अशी भूमिका त्यामागे असते.

मानवी मन, भावना, विचार यांची अभिव्यक्ती कलेतून होते, असे आपण मानतो. कलांचे आत्तापर्यंतचे शिक्षण देताना याचा विचार केला जात नसे. पण आधुनिक मानसशास्त्र जसे विकसित होत गेले त्यातून मानवी मनाची कल्पना, त्याच्या प्रक्रियांकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जाऊ लागले. परिणामी कलेकडेही वेगळ्या दृष्टीने पाहिले जाऊ लागले. कलानिर्मिती ही केवळ दृष्टिसुखदच असते का? कला निर्माणाच्या कृतीमुळे ती करणाऱ्याला काय अनुभव येतो? त्यांची मानसिक अवस्था बदलते का? तो बदल सकारात्मक असतो का? त्यामुळे मानवी तणाव कमी किंवा नाहीसे होतात का? दुसऱ्याच्या भावना समजायला मदत होते का? स्वतचे दु:ख, वेदना विसरायला मदत होते का? या गोष्टींचा अभ्यास होऊ  लागला. या अभ्यासातून कलानिर्मितीच्या कृतीचा अर्थ बदलू लागला. यातूनच कलेचा थेरपी म्हणून जाणीवपूर्वक विचार आणि वापर करण्याची कल्पना विकसित झाली.

तुम्हाला लोकांशी संपर्क साधणे आवडत असेल, त्यांच्या मनोवस्थेबद्दल अनुकंपा जाणवत असेल तर कलाशिक्षण घेऊन आर्टबेस्ड थेरपीचा विचार करता येईल. यासंबंधीचे शिक्षण परदेशातील विद्यापीठात घ्यायचे असल्यास मानसशास्त्राची पदवी आवश्यक आहे. भारतात कोणतेही विद्यापीठ या विषयात शिक्षण संधी उपलब्ध करून देत नाही. पुण्यातील वर्ल्ड सेंटर फॉर क्रिएटिव्ह लर्निग फाऊंडेशनतर्फे आर्टबेस्ड थेरपीचे वर्ग चालवले जातात.

आर्टबेस्ड थेरपीमध्ये केवळ चित्रकलाच नव्हे तर शिल्पकला, संगीत, नृत्य, कुंभारकाम, भरतकाम, चिकटकाम अशा अनेक कला असू शकतात. कारण यात महत्त्व कलाकृतीच्या स्वरूपाला नसून ती करण्याच्या प्रक्रियेला असते. ही कलाकृती करण्याचा आनंद, ती वारंवार केल्याने उमगणाऱ्या गोष्टी, जाणिवा हे महत्त्वाचे असते. ही कृती केल्याने विचारांचे स्वरूप समजत आहे का, प्रतिक्रियांचे स्वरूप बदलते आहे का, हे समजणे महत्त्वाचे असते. हेच यातील आव्हान असते. आज अनेक स्वयंसेवा संस्था, मानसोपचारतज्ज्ञ आर्टबेस्ड थेरपी देऊ इच्छितात. त्यामुळे या प्रकारच्या कामाकडे भविष्यातील उज्ज्वल संधी म्हणून पाहता येईल.

– महेंद्र दामले

(लेखक चित्रकार, समीक्षक व रचनासंसद अकादमी ऑफ फाइन आर्ट्स अँड क्राफ्ट्स मुंबईचे प्रिन्सिपल आहेत.)