अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना विद्यार्थ्यांनी विद्याशाखा तसेच महाविद्यालयाची निवड काळजीपूर्वक करणे आवश्यक ठरते. त्याचबरोबर अभ्यासपद्धती आणि वेळेचे नियोजन याबाबतही सजग राहणे भाग असते. यासंबंधीचे सविस्तर मार्गदर्शन-
बारावीचा निकाल या महिन्याच्या शेवटी, तर जूनमध्ये दहावी परीक्षेचा निकाल जाहीर होईल.  त्यानंतर आपल्या आवडीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील वा तंत्रनिकेतनातील आवडीच्या विद्याशाखेत प्रवेश मिळावा म्हणून विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होईल. तत्पूर्वी अभियांत्रिकी विद्याशाखेत प्रवेश घेताना काही गोष्टी लक्षात घेणे अत्यावश्यक ठरते. त्या कुठल्या, हे आपण पाहूयात. त्याचसोबत अभियांत्रिकी अभ्यासप्रक्रियेतील आव्हाने कुठली ते ध्यानात घेत विद्यार्थ्यांनी अभ्यासाची पूर्वतयारी करायला हवी.
 यंदाची अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया, प्रवेशाबाबतचे  नियम व निकष, महाविद्यालये/ तंत्रनिकेतने व त्यातील विद्याशाखा इ. सविस्तर माहितीसाठी यासाठी फक्त http://www.dte.org.in या अधिकृत वेबसाइटचीच मदत घ्यावी.   
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील आशादायक चित्र  
अ] प्रवेश-क्षमता, महाविद्यालयांची संख्या : ३०-३५ वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील अभियांत्रिकी शिक्षणाचे चित्र उपलब्ध महाविद्यालयांची संख्या, उपलब्ध विद्याशाखा व एकूण प्रवेश-क्षमता या दृष्टीने फारच निराशाजनक असे होते. ज्यांना या राज्यात प्रवेश मिळत नसे ते कर्नाटकाचा रस्ता पकडत. पण सध्याचे चित्र वेगळे आहे. १९८३ साली मा. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सरकारने  राज्यात विनाअनुदानित तत्त्वावर अभियांत्रिकी महाविद्यालये व तंत्रनिकेतने सुरू करण्याचा निर्णय घेतला. खालील तक्त्यावरून किती मोठा फरक पडलाय ते लक्षात येईल.
                                       (संदर्भ: http://www.dte.org.in)
या संस्थांमधून एकूण सुमारे ६० ते ७० विद्याशाखा उपलब्ध असतात. तेव्हा अभियांत्रिकी प्रवेशाच्या दृष्टीने हे चित्र समाधानकारक आहे, असे तूर्तास म्हणायला हरकत नाही.
ब] भवितव्याची तजवीज
१) पदवीनंतरचे शिक्षण : पदवी/ पदविका शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांपुढे पुढचे शिक्षण, नोकरी किंवा स्वतंत्र व्यवसाय असे पर्याय उपलब्ध असतात. पदव्युत्तर शिक्षण (अभियांत्रिकी, व्यवस्थापन वा अन्य) घेण्यासाठी अनेक संस्था देशात किंवा देशाबाहेर उपलब्ध आहेत. असंख्य विनाअनुदानित महाविद्यालये, नवनवीन आय.आय.टी.ज, एन.आय.टी.ज, स्वायत्त महाविद्यालये याबरोबरच देशात येऊ घातलेली परदेशी विद्यापीठे यांच्यामुळेही पदवी, पदव्युत्तर व संशोधन-अभ्यासक्रमांची उपलब्धता खूपच वाढलेली आहे आणि पुढे वाढणारही आहे.
२) देशपातळीवर नेमलेल्या विविध समित्यांचे अहवाल किंवा ‘पीडब्ल्यूसी’चे अहवाल (जे इंटरनेटवर उपलब्ध आहेत- उदा. http://www.pwc.com/india  स्पष्टपणे ग्वाही देतात की, सर्व प्रगत देशांमधील बहुराष्ट्रीय कंपन्या देशात आल्या आहेत. येत्या काही वर्षांत शेकडोंच्या संख्येने येणारही आहेत. त्यांना सर्वच विद्याशाखांच्या खूप साऱ्या अभियंत्यांची गरज भासणार आहे. भारतातील कंपन्याही परदेशात आपल्या शाखा उघडत आहेत किंवा तेथील उद्योग विकत घेत आहेत, त्यांनाही सुयोग्य मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. तेव्हा नोकरी-व्यवसाय या दृष्टीने सुकाळ असे म्हणायला हरकत नाही. देशात असणारे शिक्षित व स्वस्त मनुष्यबळ, संगणकाचे प्रगत ज्ञान, इंग्रजीचे योग्य ज्ञान, सोयीसुविधांची स्वस्त उपलब्धता अशा विविध कारणांसाठी भारताची निवड अनेक देश करू लागले आहेत. हैद्राबाद, पुणे, बंगळुरू अशा विविध ठिकाणी बहुराष्ट्रीय उद्योगांनी आपले पाय रोवले आहेत. तेव्हा शिक्षण, संधी किंवा करिअर या सर्वच दृष्टीने येथील चित्र तरुण पिढीच्या दृष्टीने फारच उज्ज्वल आहे. म्हणजेच चणेही आहेत आणि ते खायला दातही आहेत आणि इथेच धोकाही आहे. पुरेशी काळजी आधीपासून घेतली नाही तर दात तरी पडतील किंवा चणे तरी दुरापास्त होतील. तेव्हा सावधगिरी बाळगलेली चांगली. असंख्य अभियंते उपलभ असल्याने कंपन्या निवडीबाबत चोखंदळ असतील. त्यांच्या अपेक्षाही भरपूर अधिक असणार हे उघड आहे. तेव्हा स्पर्धा ही तीव्र स्वरूपाची असणारच. म्हणूनच कंपन्यांना काय अपेक्षित असणार आहे याचा ऊहापोह करणे अधिक गरजेचे आहे.  
अभियांत्रिकी पदवीनंतर अपेक्षित गुणकौशल्ये
पदवीनंतर पुढचे शिक्षण घ्यायचे असो किंवा चांगल्या कंपनीत नोकरी मिळवायची असो, ठराविक गुणकौशल्ये उमेदवाराच्या ठायी आहेत की नाहीत, याची चाचपणी नोकरीसाठी निवड करताना केली जाते. यातली काही गुणकौशल्ये बघू या –
सातत्याने राखलेला उच्च शैक्षणिक दर्जा (गुणांची टक्केवारी किंवा जी पी ए), त्या विद्याशाखेतील विषय व संकल्पना यांचे मूलभूत ज्ञान, गणितशास्त्राचा प्रभावी वापर व गणिती पद्धतीने विचार, आत्मविश्वास, तर्कबुद्धीचा विकास, संवाद कौशल्य, नेतृत्वगुण, समस्या निराकरण कौशल्य/बुद्धी, सहकार्य वृत्ती, चिकाटी व समर्पण/ निष्ठाभाव, जबाबदारीचे भान, शोधबुद्धी वा संशोधन वृत्ती, आव्हान स्वीकारण्याची वृत्ती, स्वयंप्रेरित स्वभाव, सतत नवीन शिकण्याची वृत्ती, व्यवस्थापन कौशल्य, सखोल, र्सवकष व एकात्म विचार करण्याची वृत्ती इ.
आता पुढचा स्वाभाविक प्रश्न मनात येईल तो म्हणजे हे सर्व गुण आणि कौशल्ये कोणत्या अभियांत्रिकी संस्थेत विकसित केली जातात? उत्तर अगदी सोपे आहे. एकाही संस्थेत हे सर्व एकत्रित मिळणार नाही. या संस्था शैक्षणिक अभ्यासक्रम तरी नीट शिकवतील याची खात्री नाही. मग अन्य गुण व कौशल्ये यांची गोष्ट दूरच. मग करायचे काय? जर आपले भवितव्य उज्ज्वल असावे वाटत असेल तर सोपा मार्ग शोधूही नये. बघू या, यातून अगदी चांगला नसेल पण एखादा बरा मार्ग सापडतो का ते?
१. विद्याशाखा निवड   
बऱ्याच वेळा आपण ही निवड पालक, मित्र, जवळचे नातेवाईक किंवा निकट ओळखीची माणसे ठासून जे काय सांगतात यावर बेतलेली असते. त्यांचा हेतू वाईट असतो, असे म्हणता येणार नाही. पण एखाद्या वेळी ही निवड भविष्यात फलदायी ठरली तर त्याचा दोष वा त्याची जबाबदारी आपण आपल्याकडे न घेता ती इतरांवर ढकलून आपण नामानिराळे होतो. म्हणून आपला कल, आपली आवड, आपली कुवत लक्षात घेऊन, अनेक योग्य व्यक्तींशी साधकबाधक चर्चा करून, निरनिराळ्या विद्याशाखांची माहिती घेऊन (आज बरीच माहिती नेटवरही उपलब्ध आहे) वा योग्य जाणकार समुपदेशकाचे मार्गदर्शन घेऊन ही निवड पूर्णपणे आपली आपण करावी. म्हणजे त्या निर्णयाची जबाबदारीही आपोआप आपल्यावर पडते.  
 २. महाविद्यालय निवड  
शासन, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद अशा अधिकृत संस्थांद्वारे अभियांत्रिकी संस्थांना प्रत्यक्ष तपासणी करून दर्जा प्रदान केला जातो व तो प्रसिद्धही केला जातो. बऱ्याच वेळा ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ अशी ही स्थिती असते. तेव्हा अधिकृत दर्जा बाजूला ठेवणे अधिक चांगले.  नाहीतर ‘नाम बडे और दर्शन खोटे’ अशी गत व्हायची. यावर एक चांगला उपाय म्हणजे विद्यार्थ्यांनी जमेल तशी काही संस्थांना प्रत्यक्ष भेट द्यावी, तिथे भेटणाऱ्या वा तिथे प्रत्यक्ष शिकत असणाऱ्या वा नुकतेच उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची भेट घ्यावी व चर्चा करावी, हे अधिक चांगले.चच्रेद्वारे खालील निकषांची चौकशी करावी.
        निकष पुढीलप्रमाणे आहेत –
संस्थेस मिळालेले अधिकृत प्रमाणपत्र, शिक्षणास पोषक वातावरण, अर्हता व अनुभवप्राप्त शिक्षकांची पुरेशी संख्या व शिकवण्याचा एकंदरित दर्जा, प्रयोगशाळांची व ग्रंथालयाची अवस्था, अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याबद्दल माहिती, गेल्या तीन वर्षांचे निकाल, नोकऱ्या देणाऱ्या कोणत्या कंपन्या संस्थेमध्ये येतात व किती जणांना, किती वेतनाच्या नोकऱ्या लागल्या.  
यासंदर्भातील गेल्या दोन-तीन वर्षांची माहिती, शैक्षणिक/ क्रीडाविषयक/ सांस्कृतिक/ तंत्रशास्त्रीय उपक्रम, उच्च शिक्षण घेण्यासाठी किती विद्यार्थी चांगल्या संस्थांमध्ये निवडले गेले ही माहिती, अन्य सोयीसुविधा.     
आपल्याला हवी असलेली विद्याशाखा कोणत्या महाविद्यालयांमध्ये आहे, ते आधी बघावे आणि मगच त्यातून चांगल्या संस्थेचा पर्याय शोधावा.
जाता जाता सल्ला द्यावासा वाटतो की, सर्व संस्था बऱ्याच निकषांमध्ये ‘उडदामाजी काळे गोरे’ अशा स्वरूपाच्या असल्याने नाव (Brand Name) असलेल्या संस्थेमध्ये प्रवेश घेणे अधिक चांगले. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे निदान चांगल्या विद्यार्थ्यांचा एक गट तयार होतो व त्याचा चांगल्या अभ्यासाच्या दृष्टीने व पुढील भवितव्यासाठी उपयोग होतो. तसेच प्रवासात कमी वेळ जाईल हाही निकष लक्षात घ्यावा. कारण काही अवघड विषय संस्थेत चांगले शिकवले जात नसतील तर बाहेरून तयार करायला वेळ मिळायला हवा.
३. अभ्यास पद्धती
बहुतांश विद्यार्थी स्मरणशक्तीवर अधिक भरवसा ठेवत इथपर्यंत पोहोचलेले असतात, पण आता किती पुस्तके वाचणार व लक्षात ठेवणार असा प्रश्न पडणार (अभियांत्रिकीत प्रवेश घेतलेले बरेच विद्यार्थी अजूनही गाइड्स वापरतात, ज्याचा पुढे काहीच उपयोग होत नाही, तसेच स्वायत्त संस्थेमधील बहुतांश विद्यार्थी पूर्णपणे शिक्षकांवर अवलंबून/ विश्वासून असतात व ते पुस्तके वा गाइड्स काहीच वापरत नाहीत.). पण वर दिलेली काही कौशल्ये विकसित व्हावी असे वाटत असेल तर स्वयंअध्ययन याला पर्याय नाही. वाचन, लिखाण (स्वत:च्या नोटस काढणे) व त्यावर स्वतंत्रपणे विचार/ चिंतन करणे, मूलभूत संकल्पना मनापासून समजून घेणे व आत्मसात करणे यालाच खऱ्या अर्थाने दूरगामी उपयोगी पडणारा अभ्यास म्हणता येईल. निरीक्षण, कुतूहल, जिज्ञासा, ध्यास, विचार, वाचन, प्रयोग व निष्कर्ष हा शिकण्याचा राजमार्ग आहे. त्याऐवजी खासगी टय़ुशन वा कोचिंग क्लास हा निश्चितच गुणकौशल्ये विकसित करण्यासाठीचा चांगला उपाय नाही. चांगले गुण मिळवण्यासाठी थोडाफार फायदा होईलही कदाचित, पण परावलंबित्व हे पुढच्या दृष्टीने कधीही चांगले नाही.
सध्या इंटरनेटवर आयआयटी वा अन्य प्रसिद्ध संस्थांमधील प्राध्यापकांची व्याख्याने दृक्-श्राव्य पद्धतीने व अनेक अभियांत्रिकी विषयांशी निगडित उपलब्ध आहेत (उदा. NPTEL). तसेच बरीच ई-बुक्स व नोट्स इंटरनेटवर उपलब्ध असतात. विद्यार्थ्यांना त्याचाही प्रभावी उपयोग करता येतो.  
अभियांत्रिकी विद्यार्थ्यांने गणित व त्याचे उपयोजन यात गती प्राप्त होईल याची काळजी घ्यावी. गणिताशिवाय अभियंता ही कल्पनाच अयोग्य. सिद्धान्त व तो स्पष्ट होण्यासाठी त्यावर आधारित गणितांचा उपयोग हाच खरा अभ्यास होय.
याबरोबरच प्रयोगशाळेतील प्रयोग, परिसंवाद, छोटे-मोठे अभियांत्रिकी प्रकल्प, सुट्टय़ांमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण, निरनिराळ्या कंपन्यांना भेटी यामध्येही विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभागी झाले पाहिजे. शिकलेले विषय पक्के होण्यासाठी व अन्य कौशल्ये आत्मसात करण्यासाठी या गोष्टी आवश्यक ठरतात.
४. व्यवहार कौशल्ये (Soft Skills) :
संभाषण/ संवाद कौशल्य, भाषाप्रभुत्व, प्रामाणिकपणा, पारदर्शी व्यवहार, समजावून सांगण्याची कला, उपक्रम/ कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्याचे कौशल्य, सचोटी, सादरीकरण कला, अधिकारी व सहकारी यांच्याशी योग्य वर्तणूक, खिलाडूवृत्ती, उत्साहाने झोकून देण्याचे वृत्ती इत्यादी गुणकौशल्ये येण्यासाठी संस्थेतील वा बाहेरील सामाजिक संस्थांमधील उपक्रमांमध्ये/ कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभागी व्हायला हवे. सांघिकवृत्तीने काम करायला हवे. कंपन्या आजकाल शैक्षणिक दर्जा पारखण्याबाबत काटेकोर असतातच, पण त्याचबरोबर नेतृत्वगुण व ही व्यवहारकौशल्ये असणाऱ्यांना प्राधान्य देतात. केवळ शैक्षणिक प्रगती बघितली जात नाही हे प्रत्येकाने, विशेषत: पालकांनी ध्यानात घ्यावे.
५. वेळेचे नियोजन
शैक्षणिक व अन्य बाबी करायच्या ठरवले तर २४ तासांचाच दिवस आहे, हे विसरता येणार नाही. म्हणजेच निर्थक गोष्टी टाळणे आवश्यक ठरते. निर्थक हा शब्द व्यक्तीवर अवलंबून आहे, पण तरीही भ्रमणध्वनीवरील दीर्घ संभाषण, सोशल साइट्सचा मुक्त वापर, टीव्ही व संगणक गेम्स इ. गोष्टी निश्चितच वेळ खाणाऱ्या आहेत, हे सर्वजण मान्य करतील.
अभियांत्रिकी शिक्षणात दैनंदिन अभ्यास करणे आवश्यक आहे. अभियंता ही केवळ पदवी नाही. ती एक वृत्ती आहे आणि ती अंगी यावी असे वाटत असेल तर जीवनात एक शिस्त आणावीच लागेल. प्रत्येक विषयात गती प्राप्त व्हावीच लागेल. त्यासाठी वेळेचे नियोजन व दैनंदिन अभ्यास या गोष्टी प्रत्यक्षात आणायला लागतील. अभियांत्रिकी पदवी ही शिडी म्हणून अनेकजण वापरतात, पण जर मनापासून अभ्यास केला तर जी गुणकौशल्ये आत्मसात होतील ती वाया जाणार नाहीत! ती आयुष्यभर आपल्याबरोबरच राहतील आणि त्याचा उपयोगही प्रत्येक ठिकाणी होतोच.
तेव्हा शैक्षणिक नियमितता व अन्य रचनात्मक उपक्रम/ कार्यक्रम यामध्ये सक्रिय सहभाग हे दोन्ही करावयाचे असेल तर काही चांगले मिळवण्यासाठी काही निर्थक गमवणे श्रेयस्करच असेल. आपल्याला उत्तम अभियंता होण्याचे स्वप्न साकार करावयाचे असेल तर हे सर्व साधावेच लागेल.
तेव्हा अशी मनाची तयारी असेल तरच अभियांत्रिकीचा पर्याय घ्यावा. रडतखडत मागे राहिलेल्या विषयांचे ओझे पेलत कशीबशी पदवी पदरात पाडून घ्यायची असे ठरवले तर भविष्य चांगले असणार नाही. केवळ मजाच करावयाची असेल तर इतर अनेक पर्याय बाहेर उपलब्ध आहेतच.
अभियांत्रिकी महाविद्यालयात भरपूर फी देऊन, तसेच खासगी क्लास वा टय़ुशन लावून दिली म्हणजे आपली जबाबदारी संपली, असे पालकांनीही समजू नये. विद्यार्थ्यांनीही आपला विकास कशात आहे, हे वेळीच ओळखून आत्मनिर्भर होण्यासाठी परिश्रम घेण्यास तयार व्हायला हवे. मन:पूर्वक अभ्यास करणे, अन्य चांगल्या शैक्षणिक/ सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे, तसेच निर्थक गोष्टींमध्ये जाणारा वेळ वाचवणे हाच खऱ्या अर्थाने उत्तम अभियंता होण्याचा राजमार्ग आहे.   

Extension of time for registration of BBA BMS BCA entrance exam
बीबीए, बीएमएस, बीसीए प्रवेश परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदतवाढ… आतापपर्यंत किती अर्ज झाले दाखल?
design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत