19 February 2020

News Flash

शब्दबोध : रजाचा गज करणे

मराठी भाषा इतकी समृद्ध आहे की, प्रत्येक शब्दाला, वाक्प्रचाराला अर्थाचे अनेक पदर येतात आणि प्रत्येक वेळी आपल्याला भाषेची महती कळते.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. उमेश करंबेळकर

पूर्वीच्या काळी म्हणजे आपल्या आजी-आजोबांच्या काळात मराठी भाषेतील अनेक म्हणी व वाक्प्रचार लोकांच्या तोंडी सहज खेळत असत. त्यातील बहुतेक आता विस्मरणात गेले आहेत. ‘रजाचा गज करणे’ हा त्यातलाच एक वाक्प्रचार.

रज म्हणजे मातीचा कण. गज म्हणजे हत्ती. रजाचा गज करणे याचा शब्दश: अर्थ मातीच्या कणाचा हत्ती करणे असा होत असला तरी व्यवहारात मात्र तो दोन वेगळ्या अर्थाने वापरला जात असे. विद्याधर वामन भिडे यांच्या ‘मराठी भाषेचे वाक्प्रचार व म्हणी’ या कोशात अतिशयोक्ती करणे, छोटीशी गोष्ट मोठी करून सांगणे असे अर्थ दिले आहेत. याच अर्थाचा आणखी एक वाक्प्रचार मराठीत आहे, ‘राईचा पर्वत करणे’. बऱ्याचदा हा वापरलाही जातो.

गुजराथी भाषेत ‘रजनुं गज करवुं’ असा वाक्प्रचार आढळतो. रजाचा गज करणे याचा लहानाचा मोठा करणे, संस्कार करून घडवणे असा दुसरा अर्थ मोल्सवर्थच्या शब्दकोशात आहे. खरे म्हणजे मुलांना वाढवणे व घडवणे या अर्थानेच तो पूर्वी वापरला जाई.

लहान मुले म्हणजे एक प्रकारे मातीचे गोळेच. आई-वडील त्यांचे लालन-पालन करतात, त्यांच्यावर चांगले संस्कार करतात, प्रसंगी स्वत:च्या पोटाला चिमटा घेऊन त्यांची हौस-मौज करतात आणि कधी कधी स्वत:च्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करून त्यांना उच्चशिक्षण देऊन घडवतात. अशा तऱ्हेने मुलांचा ‘रजाचा गज करतात’. अनंत फंदीचे ‘माधवाख्यान’ नावाचे पेशव्यांच्या कारकीर्दीवरील एक काव्य आहे. त्यामध्येमी केले रजाचे गज आता सोडुनि जाताति मज डोळां अश्रु आले सहज साहेबांच्या तेधवा असे वर्णन आहे. राघोबादादा आणि आनंदीबाई यांनी त्यांची अमृतराव व बाजीराव ही मुले नानांच्या हवाली केली, त्या वेळच्या प्रसंगात राघोबादादांच्या तोंडचे हे वाक्य आहे.

मराठी भाषा इतकी समृद्ध आहे की, प्रत्येक शब्दाला, वाक्प्रचाराला अर्थाचे अनेक पदर येतात आणि प्रत्येक वेळी आपल्याला भाषेची महती कळते.

 

First Published on August 29, 2019 12:07 am

Web Title: word sense eloquence abn 97
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : वनसेवा मुख्य परीक्षा सामान्य विज्ञान
2 प्रादेशिकतेचा मुद्दा
3 शिक्षणाचा जपानी मंत्र क्योटो विद्यापीठ,जपान
Just Now!
X