09 August 2020

News Flash

शब्दबोध : चमचा

चमचा या शब्दाला खुशामतखोर, हांजी हांजी करणारा, लाळघोटेपणा करणारा असे अर्थ प्राप्त झाले आहेत

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. उमेश करंबेळकर

पाणी, दूध अशा द्रव पदार्थात मीठ अथवा साखर यांसारखे विद्राव्य पदार्थ टाकून चमच्याने ढवळल्यास ते चटकन विरघळतात. तसेच स्वयंपाकघरातील एक उपयोगी वस्तू म्हणून आपल्याला चमचा माहीत असतो. परंतु गंमत म्हणजे चमच्याच्या या ढवळण्याच्या क्रियेमुळे त्याला वेगळा अर्थही प्राप्त झाला आहे. एखादी व्यक्ती राजकीय पुढारी, नट-नटय़ा किंवा मोठय़ा, महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींची मर्जी संपादन करण्यासाठी त्यांच्या सतत पुढे पुढे करून त्यांच्या कामात ढवळाढवळ करत असेल तर तिचा ‘अमक्या अमक्याचा चमचा’ असा उपहासाने उल्लेख केला जातो. यालाच अनुसरून पुलंनी माझे खाद्यजीवन या लेखात ‘मानवाची सारी वाटचाल स्वत:च्या हाताने चरणे, चारणे, चिरणे आणि चोरणे या चकारी बाराखडीतून होत होत चम् च:पर्यंत आली आहे’. अशी अत्यंत मार्मिक टिप्पणी केली आहे.

चमचा या शब्दाला खुशामतखोर, हांजी हांजी करणारा, लाळघोटेपणा करणारा असे अर्थ प्राप्त झाले आहेत. पण या व्यतिरिक्त चमचा हे निसर्गातील एका पक्ष्याचेही नाव आहे. इंग्रजीत त्याला स्पून बिल असे म्हणतात. स्पून म्हणजे चमचा आणि बिल म्हणजे चोच. या पक्ष्याची चोच चमच्यासारखी असते म्हणून याचे नाव पडले चमचा. हा स्थानिक पक्षी असला तरी स्थलांतर करूनही येणारा आहे. आपल्या चमच्यासारख्या चोचीने तो ढवळाढवळ करतो, पण ती त्याच्या पोटासाठी असते. मुळात हा पाणथळीचा पक्षी आहे. जलाशयांच्या काठावर वीत-दीड वीत उंचीच्या पाण्यात उभे राहून तो खाद्य शोधतो. त्यासाठी तो चोचीने चिखल ढवळतो व त्यातील किडे, बेडूक इत्यादी जलचर चोचीत पकडून खातो. मात्र त्याची ही ढवळाढवळ इतरांना तसेच निसर्गालाही हानीकारक नसते. खरे पाहता या पक्ष्याच्या चोचीचे नीट निरीक्षण केले तर ती चमच्यापेक्षा एखाद्या पळीसारखी दिसते. पळी म्हणजे आमटी किंवा पिठले, वरण अशासांरखे द्रव पदार्थ वाढण्यासाठी वापरण्यात येणारा खोलगट चमचा. तर पळीला संस्कृतमध्ये दर्वि म्हणतात. आणि या स्पून बिलचे संस्कृत नाव आहे, दर्विमुख किंवा दर्वितुण्ड. ज्यांनी कोणी हे नाव दिले असेल त्यांचे निसर्गाकडे किती बारकाईने लक्ष होते ते पाहा!

म्हणूनच नुसतीच चिखलात ढवळाढवळ करतो म्हणून या पक्ष्याला चमचा म्हणणे जीवावर येते त्यापेक्षा संस्कृतमधले दर्विमुख हे नाव त्याला अधिक शोभून दिसेल नाही का!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 12:16 am

Web Title: word sense spoon abn 97
Next Stories
1 यूपीएससीची तयारी : आर्थिक विकास कृषी आणि कृषी संलग्न क्षेत्र
2 यूपीएससीची तयारी : आर्थिक विकास अभ्यासाचे नियोजन
3 विद्यापीठ विश्व : व्यापक दृष्टीकोन देणारे शिक्षणकेंद्र
Just Now!
X