अभ्यासक्रमातील वैविध्य अलिगढ मुस्लीम विद्यापीठ

उत्तर प्रदेशमधील अलिगढ येथे असलेल्या या संस्थेची स्थापना केली

|| योगेश बोराटे

संस्थेची ओळख मुस्लीम समाजाला आधुनिक शिक्षणाचा रस्ता दाखविण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्थापन झालेली एक महत्त्वाची संस्था म्हणून अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचा विचार केला जातो. उत्तर प्रदेशमधील अलिगढ येथे असलेल्या या संस्थेची स्थापना केली ती मुस्लीम समाजातील द्रष्टे नेते सर सयद अहमद खान यांनी. सर सयद अहमद खान यांनी १८७७ साली स्थापन केलेल्या मुहम्मद अँग्लो ओरियंटल कॉलेजमधून या विद्यापीठाची मुहूर्तमेढ रोवली गेली. या संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा व्यापक प्रसार करण्यासाठी म्हणून १९२० साली अलिगढ मुस्लीम विद्यापीठाची सुरुवात झाली. सध्या जवळपास बाराशे एकरांच्या परिसरामध्ये विस्तार असलेल्या या केंद्रीय विद्यापीठाची अलिगढसह आणखी दोन विस्तारित शैक्षणिक संकुले आहेत. ती म्हणजे, पश्चिम बंगालमधील मुíशदाबाद आणि केरळमधील मलाप्पूरम. याशिवाय बिहारमधील किशनगंज येथेही या विद्यापीठाच्या माध्यमातून अभ्यासक्रम शिकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यापीठामध्ये सध्या जवळपास दीड हजार प्राध्यापक कार्यरत आहेत. त्यापकी नऊशेहून अधिक प्राध्यापकांनी पीएचडीचे संशोधन कार्य पूर्ण केलेले आहे. या विद्यापीठाच्या विविध विभागांमधून एकावेळी एकत्रितपणे साधारण दोन हजारांहून अधिक विद्यार्थी पीएचडीचे अभ्यासक्रम आणि संशोधन कार्य करू शकतात. विद्यापीठाच्या नियमित अभ्यासक्रमांसह एक शाळा, सात माध्यमिक शाळा आणि दोन उच्च माध्यमिक शाळांचा विस्तार सांभाळणाऱ्या या विद्यापीठाच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची नोंद राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही सातत्याने घेतली जात आहे. राष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक संस्थांच्या मूल्यांकनामध्येही हे विद्यापीठ ‘एनआयआरएफ’च्या क्रमवारीनुसार दहाव्या स्थानी आहे.

विद्याशाखा आणि अभ्यासक्रम

अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या शैक्षणिक विस्ताराचा विचार करता आपल्याला या विद्यापीठांतर्गत येणाऱ्या बारा विद्याशाखा, शंभरहून अधिक शैक्षणिक विभाग, तीन अकादमी, पंधरा संशोधन केंद्रे आणि संस्था यांचा विचार करावा लागतो. विद्यापीठांतर्गत असलेल्या या सर्व संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तीनशेहून अधिक शैक्षणिक अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनासाठीचे अभ्यासक्रम यांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या कला विद्याशाखेंतर्गत चालणाऱ्या अरेबिक विभागामध्ये क्लासिकल अरेबिक, इंडो-अरेबिक लिटरेचर यांचा अभ्यास करता येतो. प्रयोगजीवी कला विभागामध्ये आर्ट हिस्ट्री ऑफ इंडिया अँड युरोप, फिलॉसॉफी अँड अस्थेटिक्स ऑफ आर्ट्स हे तुलनेने वेगळे असलेले विषय अभ्यासणे शक्य आहे. विद्यापीठाच्या भाषाशास्त्र विभागामध्ये अप्लाइड लिंग्विस्टिक्स, सोशिओिलग्विस्टिक्स अँड कॉग्नेटिव्ह लिंग्विस्टिक्स, उर्दू लिंग्विस्टिक्स यांचा सखोल अभ्यास करण्यासाठीचे अभ्यासक्रम चालविले जातात. विद्यापीठाच्या आधुनिक भारतीय भाषा विभागामध्ये मराठी भाषेसह सात भारतीय भाषांचे शिक्षण घेता येते. संस्कृत विभागांतर्गत वेद आणि पुराणांचे अध्ययन, संस्कृत साहित्य आणि टीकाशास्त्राचा अभ्यास, तर उर्दू विभागांतर्गत सर्जनात्मक उर्दू लेखन, इतर भारतीय भाषांसोबतचा तौलनिक अभ्यास आणि अध्ययन विद्यार्थ्यांसाठी शक्य आहे.

विद्यापीठाच्या इन्स्टिटय़ूट ऑफ पíशयन रिसर्चमध्ये पíशयाविषयीच्या आंतरविद्याशाखीय अभ्यासाला चालना दिली जाते. इंजिनीअिरग आणि तंत्रज्ञान विद्याशाखेंतर्गत असलेल्या आíकटेक्चर विभागामध्ये आíकटेक्चरल कन्झव्‍‌र्हेशनसोबतच इस्लामिक आíकटेक्चरचा अभ्यास करण्यासाठीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. पेट्रोलिअम स्टडीज विभागामध्ये पेट्रोलियम इंजिनीअिरग, पेट्रोलियम प्रोसेसिंग या विषयांमधून इंजिनीअिरगचे शिक्षण घेणे शक्य आहे. मेडिकलच्या अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पातळीवर नावाजलेले जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज हे याच विद्यापीठाचा भाग आहे. विद्यापीठाच्या जैवविज्ञान विद्याशाखेंतर्गत वन्यजीव विज्ञान विभाग चालतो. त्यामध्ये वन्यजीवांचे जतन आणि संवर्धनासाठीचे विशेष संशोधन कार्यही केले जाते. म्युझिओलॉजी विभागामधून संग्रहालये आणि इतर पुरातन वास्तूंचे जतन, संवर्धन आणि व्यवस्थापन आदी बाबींचे शास्त्रशुद्ध शिक्षण-प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाते. विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागामध्ये कौन्सेलिंग अँड हेल्थ मॅनेजमेंट आणि ह्य़ुमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट या दोन विषयांमधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम नव्यानेच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. झाकीर हुसेन कॉलेज ऑफ इंजिनीअिरग अँड टेक्नॉलॉजीमध्ये बी.टेक आणि एम.टेकचे, तर युनिव्हर्सटिी पॉलिटेक्निकमध्ये तीन वष्रे कालावधीचे नानाविध पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

सुविधा

विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे आणि ग्रंथालयाची चांगली सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या विद्यापीठाचा विस्तार लक्षात घेत विद्यापीठामध्ये सत्तरहून अधिक वसतिगृहे उभारण्यात आली आहेत. या माध्यमातून विद्यापीठाचे बहुसंख्य विद्यार्थी आपले शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करतात. विद्यापीठाचे मौलाना आझाद ग्रंथालय हे मध्यवर्ती ग्रंथालय विद्यापीठाच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र ठरते. जवळपास अठरा लाख पुस्तके आणि पंचावन्न हजारांवर जर्नल्सचा संग्रह असणाऱ्या या ग्रंथालयांतर्गत विद्यापीठाच्या वेगवेगळ्या विभागांमधील ११० ग्रंथालयांचा कारभारही चालतो. उर्दू, पíशअन आणि अरेबिक भाषेतील दुर्मीळ संदर्भाच्या संग्रहालयासाठीही हे ग्रंथालय जगभरात ओळखले जाते. मुíशदाबाद आणि मलाप्पुरम येथील केंद्रांवरून विद्यापीठाने एमबीए आणि इंटीग्रेटेड लॉ या विषयांचे शिक्षण घेण्याच्या सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यापीठाचे अजमल खान तिब्बिया कॉलेज हे युनानीविषयी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम चालविणारे भारतीय उपखंडातील एकमेव कॉलेज ठरते. विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास विद्याशाखेंतर्गत परकीय भाषा विभागमधून पश्चिम आशियामधील राजकारण, अर्थकारण, इतिहास आणि समाज, भूगोल आदी बाबींचा अभ्यास आणि संशोधनासाठी मिळणारी संधी, सामाजिक शास्त्रे विद्याशाखेंतर्गत जनसंज्ञापन विभागामधून विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक पत्रकारिता, तसेच व्हिडीओ प्रॉडक्शन आणि जनमाध्यमांच्या संशोधनासाठी उपलब्ध असणाऱ्या सुविधा या विद्यापीठाच्या वैशिष्टय़ांचाच महत्त्वाचा भाग ठरतात.

borateys@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aligarh muslim university

ताज्या बातम्या