मदुराई कामराज विद्यापीठ

योगेश बोराटे

*   संस्थेची ओळख

तामिळनाडू राज्याच्या दक्षिणेकडील भागातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून मदुराई कामराज विद्यापीठाची देशभरात ओळख आहे. मदुराईमधील पल्कलई नगरच्या परिसरात राज्य विद्यापीठाचा दर्जा असलेल्या या संस्थेचे मुख्य शैक्षणिक संकुल वसले आहे. तामिळनाडू राज्याच्या दक्षिणेकडील भागामध्ये उच्चशिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी १९५७ साली तामिळनाडू राज्य सरकारने मदुराईमध्ये स्थापन केलेल्या पदव्युत्तर शैक्षणिक केंद्राच्या माध्यमातून या विद्यापीठाच्या कार्याची सुरुवात झाली. मदुराई येथील अमेरिकन कॉलेजमध्ये मद्रास विद्यापीठाचे हे पदव्युत्तर केंद्र सुरू झाले होते. या केंद्राच्या कार्याचा वाढता विस्तार आणि शिक्षण विस्ताराची नेमकी गरज विचारात घेत, मदुराई केंद्राला १ फेब्रुवारी, १९६६ रोजी स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. या निमित्ताने मदुराई कामराज विद्यापीठ हे तामिळनाडू राज्यासाठी राज्य विद्यापीठ म्हणून अस्तित्त्वात आलेले मद्रास विद्यापीठानंतरचे दुसरे विद्यापीठ ठरले. गेल्या ५० वर्षांत जवळपास १ कोटी विद्यार्थ्यांनी या विद्यापीठाच्या माध्यमातून उच्चशिक्षण घेतले आहे. राष्ट्रीय पातळीवरील ‘एनआयआरएफ’ मूल्यांकनामध्ये देशभरातील विद्यापीठांच्या यादीमध्ये यंदा हे विद्यापीठ ५४ व्या स्थानी आहे.

*  संकुले आणि सुविधा

स्थापनेनंतरच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये विद्यापीठाचे कामकाज मदुराई शहरामधूनच चालत असे. मात्र विद्यार्थ्यांची वाढती संख्या विचारात घेत हे विद्यापीठ १९७३पासून नव्या संकुलामध्ये सुरू झाले. मदुराईजवळच्याच पल्कलईनगरमध्ये असलेले हे संकुल आता या विद्यापीठाचे मुख्य संकुल म्हणूनच ओळखले जाते. विद्यापीठ स्थापनेपूर्वी मदुराई शिक्षण केंद्रामध्ये मद्रास विद्यापीठाच्या ग्रंथालयाची एक शाखा कार्यरत होती. नव्या विद्यापीठाच्या स्थापनेनंतर ग्रंथालयाची ही शाखा नव्या विद्यापीठाचे स्वतंत्र ग्रंथालय म्हणून पुढे आली. विद्यापीठाचे मुख्य संकुल कार्यरत झाल्यानंतर या संकुलामध्येच १९७४ पासून विद्यापीठाच्या मुख्य ग्रंथालयाच्या सेवाही पुरविण्यास सुरुवात झाली. विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. टी. पी. मिनाक्षीसुंदरनार यांच्या गौरवार्थ या नव्या ग्रंथालयाला त्यांच्याच नावाची ओळख देण्यात आली. विद्यापीठाच्या या मुख्य ग्रंथालयाच्या जोडीने विद्यापीठाने आपल्या निवासी विद्यार्थ्यांसाठी एकूण आठ वसतिगृहांची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी सजग राहत, या सर्व वसतिगृहांमध्ये विद्यापीठाने फिटनेस सेंटर उभारले आहेत. विद्यापीठाच्या संशोधन अभ्यासक्रमांना नोंदणी करणाऱ्या विवाहित संशोधकांसाठीही विद्यापीठ स्वतंत्र निवासी व्यवस्था पुरविते. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून लांब गेलेल्या व्यक्तींना पुन्हा शिक्षणाकडे वळविण्यासाठी विद्यापीठ दूरशिक्षणाच्या माध्यमातूनही आपले विविध शैक्षणिक अभ्यासक्रम समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचवत आहे. त्यासाठी विद्यापीठामार्फत वर्षांतून दोन वेळा प्रवेश प्रक्रिया राबविल्या जात आहेत.

*  विभाग आणि अभ्यासक्रम

विद्यापीठामध्ये एकूण वीस स्कूलमधून ७७ शैक्षणिक विभाग चालविले जातात. त्यामध्ये ४४ पदव्युत्तर अभ्यासक्रम, संशोधनासाठी वाहिलेले ४० एम.फील आणि ५७ पीएच.डी. अभ्यासक्रम व १७ पदविका-प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून एकाचवेळी जवळपास साडेचार हजारांवर विद्यार्थी अशा विविध प्रकारच्या आणि विविध पातळ्यांवरील अभ्यासक्रमांचे शिक्षण घेऊ शकतात.

विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांना चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम असल्यामुळे विद्यार्थी आपल्या आवडीनुसार विषयांची निवड करू शकतात. बायोलॉजिकल सायन्सेसअंतर्गत येणाऱ्या बायोकेमिस्ट्री विभागात एमएस्सी जिनोमिक्स, एमएस्सी बायोकेमिस्ट्री, तर मायक्रोबायल टेक्नॉलॉजी विभागात एमएस्सी मायक्रोबायोलॉजी, एमएस्सी मायक्रोबायल जीन टेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रम चालवले जातात. स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजीच्या अंतर्गत असलेल्या सेंटर फॉर एक्सेलन्स इन बायोइन्फम्रेटिक्समध्ये कॉम्प्युटेशन बायोलॉजी विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम चालतो. स्कूल ऑफ एनर्जी, इन्व्हायर्न्मेंट अँड नॅचरल रिसोस्रेसच्या अंतर्गत मरिन अँड कोस्टल स्टडिज विभागामध्ये एम. एस्सी. मरिन बायोलॉजी हा वेगळा अभ्यासक्रम विद्यापीठाने उपलब्ध करून दिला आहे. विद्यापीठाच्या स्कूल ऑफ रिलिजिन्स, फिलॉसॉफी अँड ह्युमॅनिस्ट थॉटच्या अंतर्गत असलेल्या गांधी विचार आणि रामिलग तत्त्वज्ञान विभागामध्ये एम. एस्सी. पीस मेकिंग हा अभ्यासक्रम चालतो.

विद्यापीठाने आपल्या स्कूल ऑफ सोशल सायन्सेसच्या माध्यमातूनही नेहमीच्या पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या जोडीने तुलनेने नव्या आणि विद्यार्थ्यांना करिअरच्या वेगळ्या वाटा सुचविणाऱ्या अभ्यासक्रमांचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यामध्ये पॉलिटिकल सायन्स विभागात चालणारा क्रिमिनल जस्टिस अँड व्हिक्टिमोलॉजीचा पदव्युत्तर अभ्यासक्रम, स्कूल ऑफ युथ एम्पॉवरमेंटच्या अंतर्गत असलेल्या युथ वेल्फेअर स्टडिजमध्ये चालणारा एम. ए. अडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडिजसारख्या अभ्यासक्रमांचा विचार केला जातो. याशिवाय विद्यापीठाने इतर सर्व पारंपरिक अभ्यासक्रमांचे पर्यायही आपल्या विद्यार्थ्यांसाठी खुले ठेवले आहेत.