संशोधन संस्थायण : इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, हैदराबाद

१९४४ मध्ये तत्कालीन ब्रिटिश हैदराबाद संस्थानामध्ये या संस्थेची स्थापना झाली होती.

(संग्रहित छायाचित्र)

रसायन आणि तंत्रज्ञानाची सांगड

तेलंगणा राज्याची राजधानी असलेल्या हैदराबाद येथे असलेली इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी(आयआयसीटी) म्हणजेच भारतीय रसायन-तंत्रज्ञान संशोधन संस्था ही रसायन-तंत्रज्ञान या विषयामध्ये मूलभूत आणि उपयोजित संशोधन करणारी संस्था आहे. आयआयसीटी ही सीएसआयआरशी (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) संलग्न संशोधन संस्था आहे. आयआयसीटीने भारतीय रसायन-तंत्रज्ञानातील संशोधन-विकास व उद्योगातील मूलभूत आणि उपयोजित संशोधनाबरोबरच या क्षेत्रातील देशभरातील संशोधन, शैक्षणिक आणि औद्योगिक संस्थांसाठी एक प्रमुख मार्गदर्शक म्हणून काम केलेले आहे.

संस्थेविषयी 

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) ही वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या जुन्या राष्ट्रीय प्रयोगशाळांपकी एक आहे. १९४४ मध्ये तत्कालीन ब्रिटिश हैदराबाद संस्थानामध्ये या संस्थेची स्थापना झाली होती. तेव्हा संस्था ‘सेंट्रल लॅबोरेटरीज फॉर सायंटीफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्च’ (सीएलएसआयआर) या नावाने कार्यरत होती. कालांतराने संस्थेचे नाव बदलण्यात आले. १९५६ मध्ये सीएसआयआरने सीएलएसआयआरचे नामांतर रिजनल रिसर्च लॅबोरेटरी (आरआरएल) असे केले. नंतर १९८९मध्ये पुन्हा एकदा संशोधन विषय बदलल्यामुळे संस्थेचे नाव बदलून सध्याचे नाव देण्यात आले. संस्थेने १९९४ मध्ये आपला सुवर्ण महोत्सव तर २००४ मध्ये हीरक महोत्सव साजरा केला. नवीन सहस्रकामध्ये प्रवेश करतानाच संस्थेने आपले उद्दिष्ट पुनर्रचित केले आहे. रासायनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक अभिनव जागतिक संशोधन व विकास संस्थेच्या रूपात उदयास येण्याच्या उद्देशाने संस्थेने आपली वाटचाल सुरू ठेवलेली आहे. संस्थेने आपल्या संशोधन कार्यामध्ये मदत व्हावी यासाठी स्वतंत्रपणे राष्ट्रीय पातळीच्या तीन संशोधन केंद्रांची लिपिड रिसर्च, सेमि केमिकल्स आणि केमिकल बायोलॉजीची स्थापना केली आहे. आयआयसीटीने आपल्या सत्तर वर्षांच्या प्रवासात गतिशील, अभिनव आणि परिणामकारक संशोधन केलेले आहे. भारत हे जगभरातील रासायनिक व जैवतंत्रज्ञान उद्योगांचे एक विश्वासार्ह गंतव्यस्थान आहे. मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध असलेले संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच प्रभावी व्यावसायिक विकास धोरणे या दोन गोष्टींमुळे आयआयसीटी या क्षेत्रातील एक विश्वासार्ह संशोधन व विकास भागीदार म्हणून औद्योगिक ग्राहकांमध्ये आपली ओळख प्रस्थापित करू शकलेली आहे.

संशोधनातील योगदान 

आयआयसीटी ही रसायन तंत्रज्ञान, उपयोजित रसायनशास्त्र, जैव रसायनशास्त्र, बायो इन्फोम्रेटिक्स, रसायन अभियांत्रिकी व संबंधित शास्त्रांमध्ये संशोधन करणारी संस्था आहे. मात्र सीएसआयआरच्या मार्गदर्शनानुसार संस्थेमध्ये रसायन तंत्रज्ञानाबरोबरच विज्ञान व अभियांत्रिकीच्या इतर शाखांमधील संशोधनसुद्धा – आंतरविद्याशाखीय संशोधन (Interdisciplinary research) राबवले जाते. या सर्व शाखांमधील संशोधन समन्वयाने चालावे यासाठी संस्थेने संशोधनाच्या सोयीने विविध विभागांची रचना केलेली आहे. या संशोधन विभागांच्या साहाय्याने संस्थेने देश-विदेशातील उद्योगांचे अनेक प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे ते पूर्ण केलेले आहेत. संस्था सध्या ऑरगॅनिक सिंथेसिस, नॅचरल प्रॉडक्ट्स आयसोलेशन, मेडिसिनल केमिस्ट्री, फ्लुरो ऑरगॅनिक्स, अ‍ॅग्रो केमिकल्स, फिरोमोन्स, कॅटॅलीसीस, मटेरियल्स फॉर सोलर एनर्जी, पॉलिमर्स अ‍ॅण्ड फंक्शनल मटेरियल्स, बायोमटेरियल्स, बायोकेमिकल्स, एनएमआर स्पेक्ट्रोस्कोपी इत्यादी विषयांमध्ये संशोधन करते. आयआयसीटीचे संशोधन हे रसायन तंत्रज्ञानाच्या विकास आणि अद्ययावत उत्पादन यांसाठी सर्वत्र नावाजलेले आहे.

विद्यार्थ्यांसाठी संधी

आयआयसीटीमध्ये चाललेल्या इतक्या उत्कृष्ट संशोधनाचा फायदा शैक्षणिक क्षेत्रालाही व्हावा म्हणून आयआयसीटीने देशातील विविध विद्यापीठांबरोबर संलग्न होऊन अनेक शैक्षणिक व संशोधन कार्यक्रम सुरू केले आहेत. भारतातील इतर संशोधन संस्थांसारखे या संस्थेमध्येही Academy of Scientific & Innovative Research (AcSIR) च्या अंतर्गत पदव्युत्तर, पीएच.डी. व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करता येतात. अलीकडेच आयआयसीटीने केमिकल इंजिनीअिरगमध्ये एम.टेक डिग्रीची सुरुवात केली जी पीएच.डी. प्रोग्राम आणि डिग्री अ‍ॅकेडमी ऑफ सायंटिफिक अ‍ॅन्ड इनोव्हेटिव्ह रिसर्च (एसीएसआयआर) द्वारे प्रदान करण्यात येईल. आयआयसीटी भारतीय व परदेशी विद्यापीठांशीही पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी संलग्न आहे. तसेच दरवर्षी सीएसआयआरच्या ‘नेट’ व ‘गेट’सारख्या परीक्षांमधून गुणवत्ताप्राप्त  जेआरएफ व एसआरएफ विद्यार्थी या संस्थेमध्ये पीएच.डी.चे संशोधन करण्यासाठी प्रवेश घेतात.

संपर्क

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी,

उप्पल मार्ग, तारनाका, हैदराबाद, तेलंगणा – ५००००७.

दूरध्वनी – +९१-४०-२१७९१६२३,२७१९१६१९.

ई-मेल –  aau@iict.res.in , aau.iict@gov.in

संकेतस्थळ –  http://www.iictindia.org/

itsprathamesh@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Article about indian institute of chemical technology hyderabad

ताज्या बातम्या