योगेश बोराटे    

संस्थेची ओळख – ‘देवभूमी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळच्या तिरुवनंतपूरम या राजधानीच्या शहारामध्ये वसलेले हे विद्यापीठ देशभरातील जुन्या विद्यापीठांपकी एक. स्वातंत्र्यपूर्व काळात त्रावणकोर संस्थानाचे महाराज श्री चिथिरा थिरूनल बलराम वर्मा यांनी १९३७ मध्ये त्रावणकोर विद्यापीठाची स्थापना केली. इंग्लंडमधील सर्वोत्तम विद्यापीठांच्या धर्तीवर या विद्यापीठाची रचना करण्यात आली. त्याची छाप आजही या विद्यापीठावर काही अंशी अनुभवायला मिळते. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये राज्य पुनर्रचनेनंतर १९५७ मध्ये हे विद्यापीठ केरळ विद्यापीठामध्ये रूपांतरित झाले. गेल्या आठ दशकांत भौगोलिकदृष्टय़ा विद्यापीठाचा विस्तार कमी होत गेला असला, तरी शैक्षणिकदृष्टय़ा मात्र विद्यापीठाने प्रगती साधली आहे. ‘नॅक’कडून वर्ष २०१५ ते २०२० या कालावधीसाठी ए- ग्रेड’ मिळालेले हे विद्यापीठ वर्ष २०१८ साठी राष्ट्रीय पातळीवरील ‘एनआयआरएफ’ मानांकनामध्ये देशामध्ये तिसाव्या क्रमांकावर आहे. विद्यापीठातर्फे चालविल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमांना मोठय़ा संख्येने प्रवेश घेणाऱ्या विद्याíथनी हे या विद्यापीठाचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ ठरते. एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेमध्ये विद्यार्थिनींचे प्रमाण पाहिल्यास ते पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठी साधारण ६७ टक्के, एम. फिलसाठी ७५ टक्के, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ७६ टक्के प्रमाण इतके आहे. पर्यायाने या विद्यापीठाने मुलांसाठीच्या दोन वसतीगृहांच्या जोडीने, मुलींच्या वाढत्या संख्येचा विचार करत मुलींसाठीच्या तीन वसतीगृहांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

संकुले आणि सुविधा  – सुरुवातीच्या काळामध्ये तिरुवनंतपूरम, एर्नाकुलम आणि कोझीकोडे या ठिकाणी विद्यापीठाची संकुले होती. नंतर १९६८ मध्ये कोझीकोडे केंद्राला पूर्ण विद्यापीठाचा दर्जा मिळाला. त्याचप्रमाणे कोचीन युनिव्हर्सटिी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, केरळ अ‍ॅग्रीकल्चरल युनिव्हर्सटिी, महात्मा गांधी युनिव्हर्सटिीच्या स्थापनेनंतर केरळ विद्यापीठाचे कार्यक्षेत्र तिरुवनंतपूरम, कोलम, अलप्पुझा या जिल्ह्यात तसेच पॅथनामथिट्टा या जिल्ह्याच्या काही भागापुरते मर्यादित झाले. विद्यापीठाचे मुख्य संकुल तिरुवनंतपूरम येथे आहे. मुख्य संकुलापासून दूर असलेल्या कोलम, अलप्पुझा व पँडलम येथील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) साहाय्याने विद्यापीठ अभ्यास केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. संलग्न महाविद्यालयांमध्ये असलेल्या मदत केंद्रांमधूनही विद्यार्थाना माहिती-सेवा पुरविली जाते. विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना वाव मिळतो. या विभागाने अनेक चांगले खेळाडू देशाला दिले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी विद्यापीठाचे मदान आहे. इथे जागतिक दर्जाचा सिन्थेटिक ट्रॅक पाहायला मिळतो. केरळमधील सर्वात जुने व मोठे विद्यापीठीय ग्रंथालय म्हणून तिरुवनंतपूरम येथील ग्रंथालय ओळखले जाते. या ग्रंथालयाची स्थापना १९४२ मध्ये झाली. या ग्रंथालयामध्ये साडेतीन लाखांहून अधिक पुस्तके आहेत व दरवर्षी यात भर पडत राहते. नव्या तंत्रज्ञानाची कास धरत विद्यापीठाने डिजिटल सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. हे ग्रंथालय विद्यार्थी, शिक्षक तसेच सामान्य नागरिकांसाठीही संदर्भ वाचनासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. कर्यवट्टम येथील संकुलातही एक ग्रंथालय आहे. त्याशिवाय विभागांमध्ये व महाविद्यालयांमध्ये असलेली ग्रंथालये विद्यार्थाची वाचनाची भूक भागवतात. हस्तलिखिते हे या विद्यापीठाच्या ग्रंथालयाचे महत्त्वाचे वैभव असून, या ग्रंथालयामध्ये ६५ हजारांवर हस्तलिखितांचा संग्रह आहे. त्यामध्ये बहुतांश हस्तलिखिते ही संस्कृत भाषेतील आहेत.

विभाग आणि अभ्यासक्रम – विद्यापीठामध्ये एकूण १६ विद्याशाखांमधून ४१ विभाग चालतात. विद्यापीठात मुख्यत्त्वे पदव्युत्तर अभ्यासक्रम, तसेच एम.फील, पीएच.डी. याद्वारे संशोधनावर भर देण्यात आला आहे. या विद्यापीठाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे ४५ पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. तसेच, ३६ विषयांमधील एम. फिल. आणि ४२ विषयांमधील पीएच.डी.च्या संशोधन अभ्यासक्रमांची सुविधाही हे विद्यापीठ उपलब्ध करून देत आहे. त्याशिवाय, विद्यापीठाच्या विविध विभागांमधून १८ प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि १३ पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमही चालविले जातात. विद्यापीठामध्ये नॅनो टेक्नॉलॉजी, बायोइन्फम्रेटिक्स, विमन स्टडीज, गांधीवाद, केरळ अशा विशिष्ट विषय वा संकल्पनांना वाहिलेली खास अभ्यासकेंद्रेही चालतात. या अभ्यासकेंद्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संबंधित विषयांमधील प्रगत अध्ययन आणि संशोधन करण्याची सुविधा विद्यापीठाने निर्माण केली आहे.

विद्यापीठाच्या विभागांमधून एका वेळी दोन हजारांहून अधिक विद्यार्थी पूर्णवेळ अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित होऊ शकतात. विद्यापीठाने दहा ‘युनिव्हर्सटिी कॉलेज ऑफ टीचर एज्युकेशन’ आणि आठ ‘युनिव्हर्सटिी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’चीही स्थापना केली आहे. कर्यवट्टम येथील ‘युनिव्हर्सटिी कॉलेज ऑफ इंजिनीअिरग’ येथे तंत्रशिक्षणातील पदवीचे अभ्यासक्रम चालविले जातात. या सर्व संस्थांमध्ये मिळून पाच हजारांहून अधिक विद्यार्थीसंख्या आहे. याशिवाय १५० हून अधिक महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्न आहेत. यांपकी ६० महाविद्यालये ही कला व शास्त्र, २ विधी महाविद्यालये, १७ अभियांत्रिकी महाविद्यालये, ९ एमबीए/ एमसीए महाविद्यालये, ३७ अध्यापक प्रशिक्षण महाविद्यालये, ४ वैद्यकीय महाविद्यालये, ४ आयुर्वेद महाविद्यालये, २ होमिओपॅथी महाविद्यालये, ३ दंतचिकित्सा महाविद्यालये, १० नìसग कॉलेज, ४ फार्मसी कॉलेज, २ फाईन आर्ट कॉलेज, संगीत महाविद्यालय आदींचा यात समावेश आहे. नॅशनल कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन हेही याच विद्यापीठांतर्गत येते. त्याशिवाय, इन्स्टिटय़ूट ऑफ डिस्टन्स एज्युकेशनच्या माध्यमातून अनेक पदवीपूर्व व पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवले जातात. देशभरातून तसेच परदेशातून ७ हजारांहून अधिक विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेतात.  बी. एड. (अरेबिक स्टडिज), मृदुंगवादन- वीणावादन- व्हायोलिनवादन- नृत्य या विषयांमधील बॅचलर ऑफ परफॉìमग आर्ट्स (बीपीए), तसेच मास्टर ऑफ परफॉमिंग आर्ट्सचा (एमपीए) अभ्यासक्रम, मास्टर ऑफ प्लॅनिंग (एम. प्लॅन), मास्टर ऑफ व्हिज्युअल आर्ट्स इन आर्ट हिस्ट्री, मास्टर ऑफ व्हिज्युअल आर्ट्स इन पेंटिंग हे या विद्यापीठामध्ये उपलब्ध असणारे काही वेगळे आणि तितकेच महत्त्वाचे अभ्यासक्रम ठरतात. याशिवाय विद्यापीठाने नेहमीच्या पारंपरिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांची सुविधाही उपलब्ध करून दिलेली आहे.