नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी

सुरेश वांदिले

फॅशन डिझाइन, इंटेरिअर डिझाइन, कम्युनिकेशन डिझाइन, निटवेअर डिझाइन, टेक्स्टाइल डिझाइन या विषयांमध्ये दर्जेदार आणि उत्तम शिक्षण देणारी संस्था म्हणजे नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी. ही संस्था भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असणारी स्वायत्त संस्था होय. फॅशन तंत्रज्ञानाशी निगडित शिक्षण-प्रशिक्षण देणारी आणि संशोधनास वाव देणाऱ्या जगातील सर्वोत्कृष्ट संस्थांमध्ये या आपल्या देशी संस्थेचा समावेश होतो. या संस्थेचे देशातील १५ ठिकाणी कॅम्पसेस आहेत.

फॅशन डिझायिनग आणि तंत्रज्ञान याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत असला तरी या महत्त्वाच्या संस्थेमध्ये तुलनेने मराठी किंवा महाराष्ट्रीय विद्यार्थी अल्प संख्येने निवडले जातात. एकतर या संस्थेविषयीची अनभिज्ञता आहेच. शिवाय या संस्थेच्या प्रवेश प्रक्रियेविषयीही महाराष्ट्रीय पालक आणि शिक्षकसुद्धा तितकेसे जागरूक नसतात. आपल्याकडे सगळा भर किंवा लक्ष केंद्रित केले जाते ते वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेवरच. या दोन ज्ञानशाखांची बित्तबातमी ठेवणाऱ्या पालकांना इतर ज्ञानशाखा व त्यांचे अभ्यासक्रम चालवणाऱ्या राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थांकडे विशेष लक्ष द्यावे वाटत नाही. किंबहुना अशा संस्था व अभ्यासक्रमांचा समावेश पालकमंडळी आपल्या मुलांच्या करिअर प्लॅनच्या शेवटी करतात किंवा बहुधा करत नाहीत. त्यामुळे या संस्थांच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचा टप्पा नेमका कधी सुरू होतो हे लक्षात न घेतल्याने या संस्थांच्या प्रवेश परीक्षांमध्ये जितक्या मोठय़ा प्रमाणावर आपली मुले बसायला हवीत तितकी बसत नाहीत. पर्यायाने या संस्थांमध्ये अल्प प्रमाणात महाराष्ट्रीय विद्यार्थी निवडले जातात.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेतील पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे २०१९ चे शैक्षणिक सत्र जून अथवा जुलै २०१९मध्ये सुरू होणार असले तरीही त्याच्या प्रवेशाचा बिगुल ऑक्टोबर २०१८ म्हणजेच सात महिने आधीच वाजला आहे. त्याचा ध्वनी पालकांच्या कानी पडणे गरजेचे आहे. कारण प्रवेश अर्ज भरणे, त्यानंतर परीक्षा देणे आणि मुलाखत देणे या प्रक्रियेसाठी हा कालावधी लागतो याची त्यांना जाणीव होऊ शकते.

या संस्थेच्या प्रवेश प्रक्रियेची सुरुवात २२ ऑक्टोबर २०१८ पासून सुरू झाली आहे. १८ डिसेंबर २०१८ ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन भरता येतो.

*  परीक्षा शुल्क – खुला आणि नॉन क्रीमीलेअरसह इतर मागास सवंर्ग २०००रुपये, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अपंग संवर्ग १००० रुपये. ही रक्कम डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेटबँकिंगद्वारे भरता येते. (ज्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावयाचा नसेल त्यांनी संबंधित रकमेचा डिमांड ड्राफ्ट एनआयएफटी एच क्यू (NIFT HQ ,NEW DELHI) या नावाने काढून पाठवावा. या डिमांड ड्राफ्टमध्ये उमेदवाराचे नाव, पत्ता, शुल्काची रक्कम आणि डिमांड ड्राफ्ट देणाऱ्याची सही असणे आवश्यक आहे. या डिमांड ड्राफ्टसोबत प्रवेश अर्जाची प्रतही सोबत पाठवावी लागते.

*    हा अर्ज व डिमांड ड्रॉफ्ट पाठवण्याचा पत्ता – प्रोजेक्ट मॅनेजर, ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन, मॅनेजमेंट हाऊस, १४ इन्स्टिटय़ूशनल एरिया, लोधी रोड, न्यू दिल्ली- ११०००३.)

उशिरा शुल्कासह ३ जानेवारी २०१९ पर्यंत अर्ज करता येऊ शकतो. मात्र हे उशिराचे शुल्क ५ हजार रुपये असल्याने त्या वाटेला न गेलेलेच बरे. १० जानेवारी २०१९ पर्यंत प्रवेश पत्र ऑनलाइन पद्धतीने प्रत्येक उमेदवाराच्या ई-मेलवर पाठवले जाईल. २० जानेवारी २०१९ रोजी देशभरातील विविध शहरांमध्ये ही परीक्षा घेतली जाईल. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, पुणे या शहरांचा समावेश आहे. फेब्रुवारी किंवा मार्च २०१९ मध्ये निकाल घोषित केला जातो. एप्रिल किंवा मे २०१९मध्ये मुलाखती, समूह चर्चा आणि प्रासंगिक चाळणी परीक्षेसाठी निवडक उमेदवारांना बोलावले जाते. अंतिम निकाल मे किंवा जूनमध्ये घोषित केला जातो.

*    अभ्यासक्रम

या संस्थेतर्फे बॅचलर ऑफ डिझाइन (बी.डिझाइन) आणि बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (बी.एफटेक) हे पदवी अभ्यासक्रम आणि मास्टर ऑफ डिझाइन (एम.डिझाइन),मास्टर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एम.एफटेक), मास्टर ऑफ फॅशन मॅनेजमेंट (एम.एफएम)  हे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम चालवले जातात. बी.डिझाइन अभ्यासक्रम हे लेदर डिझाइन, फॅशन डिझाइन, अ‍ॅक्सेसरी डिझाइन, टेक्सटाइन डिझाइन, निटवेअर डिझाइन, फॅशन कम्युनिकेशन या विषयांमध्ये करता येतात. बी.एफटेक हा अभ्यासक्रम अ‍ॅपरल प्रॉडक्शन या विषयात करता येतो.

*  कॅम्पसेस 

या संस्थेची कॅम्पसेस पुढील ठिकाणी आहेत.

(१) बेंगळुरु, (२) भोपाळ, (३) चेन्नई, (४) गांधीनगर, (५) हैदराबाद,(६) कानपूर, (७) कोलकता (८) दिल्ली, (९) पाटणा, (१०) रायबरेली, (११) शिलाँग, (१२) कांग्रा, (१३) जोधपूर, (१४) श्रीनगर, (१५)भुवनेश्वर.

या कॅम्पसेसमध्ये विविध अभ्यासक्रमांच्या ३,०००च्या आसपास जागा आहेत. शासनाच्या नियमानुसार राखीव जागांचा यात समावेश आहे.

*    अशी असते परीक्षा-

या परीक्षेमध्ये क्रिएटिव्ह अ‍ॅबिलिटी टेस्ट (कॅट)आणि जनरल अ‍ॅबिलिटी टेस्ट (गॅट)आणि सिच्युएशन टेस्ट या चाळण्यांचा समावेश असतो. या चाळण्यांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना समूह चर्चा, मुलाखतीसाठी बोलावले जाते. या चाळण्यांसाठी पुढीलप्रमाणे वेटेज देण्यात येते.

बॅचलर ऑफ डिझाइन-कॅट ५० टक्के,गॅट ३० टक्के आणि सिच्युऐशन टेस्ट २० टक्के.बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी- गॅट १०० टक्के. मास्टर ऑफ फॅशन मॅनेजमेंट आणि मास्टर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी- गॅट- ७० टक्के आणि मुलाखत व समूह चर्चा- ३० टक्के.

जनरल अ‍ॅबिलिटी टेस्टचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे –

१) सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी- अवतीभवती घडणाऱ्या घटना घडामोडी यांचे ज्ञान व आकलनाची चाळणी करण्यासाठी प्रश्न विचारले जातात.

२)विश्लेषण व ताíकक क्षमता चाचणी- दिलेल्या माहितीवर आधारित उमेदवार कशा तऱ्हेने निष्कर्ष काढू शकतो व ताíकक पद्धतीने विचार करू शकतो, यासाठी प्रश्न विचारले जातात. दिलेल्या समस्येचे तर्कविश्लेषण करून कशा पद्धतीने उमेदवार उत्तर शोधू शकतो याविषयीचे प्रश्न विचारले जातात.

३) संवाद कौशल्य आणि इंग्रजीचे आकलन- दैनंदिन जीवनात उमेदवार कशा पद्धतीने इंग्रजीतून संवाद आणि संपर्क साधू शकेल याची चाचपणी करणारे प्रश्न विचारले जातात. इंग्रजी व्याकरण, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, शब्दांचे अर्थ, वाक्प्रचार आणि म्हणी, वाक्यात उपयोग, अचूक शब्द ओळखणे, शब्द दुरुस्त करणे, उताऱ्यावरील प्रश्न विचारले जातात.

४) संख्यात्मक/परिणात्मक विश्लेषण- संख्यावर आधारित प्रश्न विचारले जातात यामध्ये बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, टक्केवारी, काळ, काम, वेग, व्याज, अंतर अशा अनेक बाबींवरचे प्रश्न विचारले जातात.

Story img Loader