अणुऊर्जा विभागातर्फे मुंबई व भुवनेश्वर येथे उपलब्ध असणाऱ्या ५ वर्षीय एकात्मिक एमएससी या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या नॅशनल एंट्रंस स्क्रीनिंग टेस्ट म्हणजेच एनईएसटी- २०१४ या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
उपलब्ध जागांची संख्या व तपशील : या अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागांची संख्या १०० असून त्यापैकी काही जागा सरकारी नियमानुसार राखीव आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा विज्ञान विषय घेऊन व कमीत कमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी अथवा २०१४ मध्ये ही पात्रता परीक्षा दिलेली असावी.
विशेष सूचना : बारावीच्या गुणांच्या टक्केवारीची अट अनुसूचित जाती-जमातींच्या उमेदवारांसाठी ५५% पर्यंत शिथिलक्षम आहे.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना अणुऊर्जा विभागातर्फे राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या नॅशनल एंट्रंस स्क्रीनिंग टेस्ट, एनईएसटी-२०१४ साठी बोलाविण्यात येईल.
अर्जदार विद्यार्थ्यांची बारावीच्या परीक्षेतील गुणांची टक्केवारी व एनईएसटी-२०१४ मधील गुणांकाच्या आधारे त्यांना ५ वर्षे कालावधीच्या अणुऊर्जा विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या बीएससीसह एमएससी या विशेष पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येईल.
प्रवेश शुल्क : अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून ७०० रु.चा (राखीव गटातील उमेदवारांसाठी ३५० रु.चा) ‘एनआयएसईआर-एनईएसटी’ यांच्या नावे असणारा व भुवनेश्वर येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट पाठविणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी अणुऊर्जा विभागाच्या  http://www.niser.ac.in अथवा http://www.visva-bharati.ac.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील, कागदपत्रे आणि डिमांड ड्राफ्ट असणारे अर्ज दी चीफ को-ऑडिनेटर, एईएसटी-२०१४, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ फिजिक्स कॅम्पस, सैनिक स्कूल पोस्ट ऑफिस, भुवनेश्वर ७५१००५ येथे २० फेब्रुवारी २०१४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
विज्ञान विषयासह बारावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवी व विशेष पदव्युत्तर अभ्यासक्रमासह आपले करिअर करणाऱ्यांना हा अभ्यासक्रम फायदेशीर ठरेल.