एमबीए अभ्यासक्रमासंदर्भात र्सवकष माहिती देणारे हे पाक्षिक सदर. यात एमबीएच्या प्रवेशपरीक्षा, विविध विद्याशाखा, विषयांचे स्वरूप, अभ्यासाची तयारी याबाबतची माहिती दिली जाते.
एम.बी.एची संस्था निवडल्यानंतर अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्याच्या प्रवासाची सुरुवात होते. व्यवस्थापन क्षेत्रामध्ये यशस्वी करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी हा प्रवास म्हणजे येणाऱ्या अनेक संधींची मालिकाच असते. त्याचप्रमाणे या दोन वर्षांमध्ये नुसताच वेळ न घालवता, प्रत्येक क्षणाचा वापर करून आपल्यातील क्षमतेचा विकास करणे शक्य असते. मात्र यासाठी कठोर मेहनतीला मात्र पर्याय नाही हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. याची सुरुवात एम.बी.ए.ला असणाऱ्या विषयांची माहिती करून घेण्यापासून होते.
एम.बी.ए.च्या पहिल्या वर्षी असलेले विषय हे अनिवार्य असतात. स्पेशलायझेशनची सुरुवात ही दुसऱ्या वर्षांपासून होते. विद्यापीठांशी संलग्न असलेल्या, पण अंतर्गत स्वायत्तता असलेल्या संस्थांमध्ये विशेषीकरणाची सुरुवात ही पहिल्याच वर्षांच्या दुसऱ्या सत्रापासून होऊ शकते. स्पेशलायझेशनमध्ये, मार्केटिंग, फायनान्स, ह्य़ुमन रिसोर्स डेव्हलपमेंट, कॉम्प्युटर मॅनेजमेंट, अ‍ॅग्री बिझनेस, फॅमिली बिझनेस, प्रॉडक्शन व मटेरिअल्स मॅनेजमेंट असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
एम.बी.ए.च्या पहिल्या वर्षी अनिवार्य असलेल्या विषयांमध्ये प्रामुख्याने व्यवस्थापनाची मूलतत्त्वे, मॅनेजमेंट अकौटिंग, मॅनेजेरिअल इकॉनॉमिक्स, कम्युनिकेशन स्किल्स, बिझनेस लॉ, ऑर्गनायझेशनल बिहेव्हिअर इत्यादी विषयांचा समावेश होता. तसेच माहिती तंत्रज्ञानाची मूलभूत तत्त्वे हाही विषय प्रथम वर्षांच्या प्रथम सत्रामध्ये असतो. या विषयांची नावे (नॉमेनक्लेचर) प्रत्येक विद्यापीठामध्ये वेगवेगळे असू शकते. उदा. मॅनेजमेंट अकौटिंग विषयाचे नाव हे अकौटिंग फॉर बिझनेस डिसीजन किंवा बिझनेस अकौटिंग असे असू शकते. पण काही मूलभूत पाठ मात्र सारखेच असतात.
एम.बी.ए. अभ्यासक्रमातील पहिल्या सत्रामधील एक महत्त्वाचा विषय म्हणजे व्यवस्थापनाची मूलतत्त्वे. काही विद्यापीठांमध्ये हा विषय स्वतंत्र आहे तर काही विद्यापीठांमध्ये हा पहिल्या सत्रामध्येच, पण वैकल्पिक स्वरूपाचा आहे. काही ठिकाणी हा विषय ऑर्गनायझेशनल बिहेव्हिअर या विषयांबरोबर शिकवला जातो. या विषयाच्या पेपराचे स्वरूप कसेही जरी असले तरी व्यवस्थापनशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, हे नक्की.
व्यवस्थापनाची मूलतत्त्वे या विषयाची सुरुवात ही व्यवस्थापनाच्या व्याख्येने होते. वेगवेगळय़ा व्यवस्थापन तज्ज्ञांनी, ‘व्यवस्थापन’ या शब्दाची व्याख्या वेगवेगळय़ा शब्दांमध्ये केली असली तरी या व्याख्यांमधून दिसून येणारा व्यवस्थापनाचा खरा अर्थ समजून घेणे हे आवश्यक आहे. याचे कारण असे की, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर व्यवस्थापन क्षेत्रामध्ये काम करताना या व्याख्या प्रत्यक्ष वापरण्याची वेळ येईल तेव्हा हा अर्थ संपूर्णपणे समजलेला असायला हवा. व्यवस्थापनासंबंधीचे पारंपरिक विचार आणि आधुनिक काळातील विचार प्रवाह यांचा अभ्यासही या विषयामध्ये करता येतो. ज्याप्रमाणे आजूबाजूची परिस्थिती बदलत गेली तसतसा व्यवस्थापनविषयीच्या संकल्पनेतसुद्धा बदल होत गेला. हे बदल लक्षात घेऊन आधुनिक व्यवस्थापन क्षेत्राची ओळख करून घेता येईल.
व्यवस्थापनातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे व्यवस्थापनाची कार्ये की ज्यामध्ये नियोजन (प्लॅनिंग), संघटन (ऑर्गनायझेशन), नियंत्रण (कंट्रोल), निर्णय घेणे (डिसीजन मेकिंग), योग्य कर्मचाऱ्यांची निवड (स्टाफिंग), दिशा  देणे (डायरेक्शन) आदी महत्त्वाच्या कार्याचा
समावेश होतो.
व्यवस्थापनाच्या या महत्त्वाच्या कार्याची ओळख करून घ्यायला हवी. कामाचे नियोजन करणे म्हणजे कामाची व्यवस्थितपणे आखणी करणे आणि त्याचे वेळापत्रक ठरवणे. पुढील वर्षांमध्ये किंवा सहा महिन्यांमध्ये किंवा पुढील महिन्यात किंवा अगदी पुढच्या आठवडय़ामध्ये काय करायचे याचे नियोजन आधीच केले पाहिजे. नियोजन हे दीर्घकालीन म्हणजे साधारणपणे पुढील पाच वर्षांसाठी, मध्यम कालावधीसाठी (मिडियम टर्म) म्हणजे तीन ते पाच वर्षांसाठी आणि कमी कालावधीसाठी म्हणजे साधारणपणे पुढील दोन ते तीन वर्षांपर्यंत करता येते. काही वेळा नियोजन हे पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी केले जाते. याला ‘पस्र्पेक्टिव्ह प्लॅनिंग’ असे म्हटले जाते. नियोजनाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सर्व प्रकारची कार्ये व्यवस्थितरीत्या पार पाडता येतात. व्यवस्थापनाच्या वेगवेगळय़ा विभागांसाठी म्हणजे वित्त विभाग, विपणन विभाग, उत्पादन विभाग, मनुष्यबळ विकास आदी विभागांसाठी नियोजन केले जाते. नियोजन केले त्याप्रमाणे प्रत्यक्ष काम झाले किंवा नाही हे पाहणे म्हणजेच नियंत्रणाचे काम करीत व्यवस्थापनाला वेळोवेळी केलेल्या कामांचा आढावा घ्यावा लागतो. हा आढावा, जर नियोजन केलेले असेल तर शक्य होतो. यामध्ये प्रत्यक्ष कामाची प्रगती नियोजन केल्याप्रमाणे होते आहे किंवा नाही याची पाहणी केली जाते.
संघटन (ऑर्गनायझेशन) हे व्यवस्थापनाचे आणखी एक महत्त्वाचे कार्य. संस्थेतील कामांची विभागणी करून ते वेगवेगळय़ा विभागांमध्ये विभागून देणे तसेच कामाची जबाबदारी निश्चित करणे आणि एखादे काम करण्यासाठी संबंधित विभागाला किंवा व्यक्तीला योग्य ते अधिकार देणे यांचा समावेश ‘संघटन’ या कार्यामध्ये होतो. आधुनिक काळातील व्यवसायांमध्ये अनेक गुंतागुंतीची आणि एकमेकांवर अवलंबून असणारी कार्ये पार पाडावी लागतात. यामध्येही विशेषीकरण असल्यामुळे तज्ज्ञ व्यक्तींची गरज असते. पण एखादे काम पार पाडण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांची गरज असल्यामुळे कामाची विभागणी करणे जरुरीचे असते. याचबरोबर काम पूर्ण करण्यासाठी योग्य ते अधिकार देणे व तसेच जबाबदारी निश्चित करणे
हेही आवश्यक असते. त्यादृष्टीने ‘डेलिगेशन ऑफ ऑथॉरिटी’ ही आवश्यक बाब होते. सारांश संघटन या कार्याद्वारे कामाची योग्य विभागणी करून ते कार्यक्षमतेने पूर्ण करणे शक्य होते.
वेगवेगळय़ा प्रश्नावर योग्य निर्णय घेणे हे व्यवस्थापनाचे महत्त्वाचे काम आहे. उदा. उत्पादन करीत असलेल्या वस्तूंच्या वेगवेगळय़ा भागांपैकी एखादा भाग बाहेरून खरेदी करायचा का उत्पादित करायचा हा निर्णय घ्यावा लागतो. तसेच आऊटसोर्सिग करून खर्चामध्ये बचत करता येईल का हेही ठरवावे लागते. तसेच इतर अनेक बाबतीत उदा. कर्मचाऱ्यांची नियुक्ती, जाहिराती संबंधीचे नियोजन, नवीन वस्तू उत्पादित करण्यासंबंधी असे अनेक निर्णय घ्यावे लागतात. अशा प्रसंगी वेगवेगळय़ा पर्यायांचा विचार करून योग्य तो पर्याय कसा निवडावा ही निर्णय प्रक्रिया समजावून घेतली पाहिजे. निर्णय घेणे हे एक महत्त्वाचे कार्य असल्यामुळे त्याचे वेगवेगळे पैलू समजावून घ्यावे लागतात.
व्यवस्थापक हा कितीही कार्यक्षम असला तरी त्याला कर्मचाऱ्यांच्या मदतीशिवाय काही करता येणार नाही. त्यामुळे योग्य त्या कर्मचाऱ्यांची नेमणूक योग्य त्या कामासाठी करणे हे आवश्यक ठरते. प्रथम किती कर्मचाऱ्यांची गरज आहे, याचे नियोजन करावे लागते. यासाठी संस्थेची भविष्यकाळामध्ये किती वाढ अपेक्षित आहे, हे लक्षात घ्यावे लागते. तसेच कोणत्या प्रकारचे कर्मचारी लागणार आहेत याबाबतीतही धोरण ठरवावे लागते. यानंतर प्रत्यक्ष नेमणूक आणि त्यानंतर त्यांचे प्रशिक्षण आदी कामे पार पाडावी लागतात. यालाच ‘स्टाफिंग’ असे म्हटले जाते. जर योग्य त्या कर्मचाऱ्यांची नेमणूक योग्य त्या ठिकाणी झाली नाही तर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. याचबरोबर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना सतत प्रोत्साहित करणे  हेसुद्धा व्यवस्थापनाचे एक महत्त्वाचे काम आहे. मोटिव्हेशनमुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल दुणावते आणि कार्यक्षमताही वाढते.
काम सुरू करण्यासाठी योग्य ती दिशा देणे ही जबाबदारी व्यवस्थापनाला पार पाडावी लागते. यामध्ये कामाचा प्रवाह हा एका विशिष्ट गतीने आणि योग्य त्या दिशेने चालू ठेवणे आवश्यक असते. यादृष्टीने व्यवसायाला एक विशिष्ट दिशा देणे हे व्यवस्थापनाचे एक महत्त्वाचे कार्य आहे. योग्य ती दिशा देण्यासाठी संस्थेचे व्हिजन आणि मिशन हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे दिशा देणे गरजेचे आहे.
या महत्त्वाच्या कार्याबरोबरच व्यवस्थापनाची महत्त्वाची कार्ये म्हणजे संघटनेतील बदलांचे व्यवस्थापन (चेंज मॅनेजमेंट) तसेच संघर्षांचे व्यवस्थापन (कॉन्फिक्ल्ट मॅनेजमेंट) तसेच संघटनेची योग्य ती रचना (ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर) करणे इ. या सर्व कार्याचा अभ्यास करताना, थिअरी समजणे तर आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर वेगवेगळय़ा उद्योगसंस्था आणि इतर संस्था यांच्या केस स्टडींचा अभ्यास करणेसुद्धा तितकेच गरजेचे आहे. थिअरीबरोबरच व्यवस्थापनाची मूलतत्त्वे कशा पद्धतीने अमलात आणली जातात हेही पाहिल्यास विषयाचा पाया पक्का होतो आणि त्याचा पुढील करिअरमध्ये उपयोग होतो.    
nmvechalekar@yahoo.co.in

IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
National Medical Commission, Denies Approval for New Medical Colleges, Medical Colleges and Seat Increase, 2024 2025 Academic Year, medical students, medical seats in india, medical seats
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा, महाविद्यालयांमध्ये वाढ? राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने काय सांगितले?
BBA
बीबीए, बीएमएस, बीसीएच्या प्रवेशांचीच परीक्षा… झाले काय?
complaints can be made by keeping name confidential in savitribai phule pune university
पुणे : नाव गोपनीय ठेवून करता येणार तक्रार