‘क्रिएटिव्हिटी अर्थात सृजनशीलता म्हणजे नेहमीच्या साच्यापेक्षा काही तरी वेगळं असणं एवढंच फक्त नव्हे, कारण नेहमीपेक्षा वेगळं/विचित्र वागणं ठरवलंच तर कोणालाही जमू शकतं. सृजनशीलता म्हणजे गोष्टी सोप्या करणं, विलक्षण सोप्या करणं.’  सुप्रसिद्ध जाझ संगीतकार चार्ल्स िमगसचं हे सृजनशीलतेविषयीचं मत.
ज्याच्या सृजनशीलता विचारांमुळे आधुनिक तंत्रज्ञान हाताळणं विलक्षण सोपं झालं आणि जगाच्या हातात ‘अ‍ॅपल कॉम्प्युटर्स’ची कल्पनेपलीकडची विविध उपकरणं पडली तो स्टीव्ह जॉब्ज म्हणतो, सृजनशीलता म्हणजे फक्त गोष्टींना गोष्टी जोडत जाणं एवढंच असतं. (Creativity is just connecting things.) ‘हे तुम्ही कसं केलंत?’ असं सृजनशील लोकांना विचारलं तर त्यांना उत्तर देता येत नाही, कारण त्यांनी जाणीवपूर्वक काहीच केलेलं नसतं. त्यांना काही तरी दिसतं आणि कालांतराने त्यांच्याकडून सहजपणेते घडून येतं.
सृजनशील म्हणून जगविख्यात असणारे दोन वेगळ्या क्षेत्रांमधले हे दोन दिग्गज सृजनशीलता एक सहज प्रवृत्ती म्हणून घेतात, तिची एवढी सोपी व्याख्या करतात, पण सर्वसामान्यपणे सृजनशीलता ही अतिशय ‘दुर्मीळ, अलौकिक चीज’ समजली जाते. ती फक्त कलाकारांकडे आणि काही जिनिअस लोकांकडेच असते, अशी आपली खात्री असते. ती शिकणं हे फार कठीण काम आहे, असं पक्कं ठरवून आपण सृजनशीलतेला एक परग्रहावरची गोष्टच समजतो. शाळांमध्ये ‘क्रिएटिव्ह िथकिंग’, ‘क्रिएटिव्ह रायटिंग’ची शिबिरं घेतली जातात, तर मोठय़ा कंपन्या ‘क्रिएटिव्ह कल्चर’ रुजवणाऱ्या कार्यशाळा घेतात. खरंच, सृजनशीलता म्हणजे नक्की काय? ती रुजते कशी? कुठल्या वयात? सृजनशील व्यक्तीचे गुणधर्म कुठले? शिकण्याचं आणि सृजनशीलतेचं नातं कसं आहे?
अतिशय सहजसोपं असणं हा सृजनशीलतेचा अविभाज्य घटक आहेच, पण अगदी व्याख्याच पाहायची झाली तर, ‘प्राप्त परिस्थितीमध्ये काही तरी पूर्वीपेक्षा वेगळं, स्वतंत्र आणि उपयुक्त निर्माण करणे म्हणजे सृजनशीलता. अभिनव (ओरिजिनल) कल्पना, संकल्पना, विचार सुचणे किंवा जुन्याच गोष्टीकडे नवीन पद्धतीने पाहणे या सगळ्यामागे सृजनशीलता असते. सृजनशील व्यक्ती चाकोरीबाहेरचा विचार करतात. जुना साचा तोडून बाहेर पडण्याची क्षमता आणि धाडस त्यांच्यामध्ये असतं. त्यासाठी धोका पत्करण्याची तयारी असते.  सृजनशीलता संसर्गजन्य असते आणि विशेष म्हणजे जेव्हा अपयश किंवा वैफल्य येतं, तेव्हा ती जास्त गतिमान होते.
एका नामांकित कंपनीमध्ये एक तरुण उमेदवार जॉब इंटरव्ह्य़ूसाठी गेला. त्याची फाइल पाहिल्यानंतर आणि विषयाबाबतचे काही तांत्रिक प्रश्न विचारून झाल्यानंतर मुलाखत घेणाऱ्या साहेबांनी त्याच्यासमोर एक शर्ट ठेवला. ‘विक्रेत्याच्या भूमिकेत जाऊन हा शर्ट तू मला पटवून विकायचा आहेस,’ असं त्यांनी सांगितलं. तरुणानं त्या शर्टचा कपडा, टिकाऊपणा, रंग जाणार नाही, वाजवी किंमत वगरे अनेक नेहमीच्या गोष्टी सांगून तो शर्ट कसा चांगला आहे ते पटवायचा प्रयत्न केला. साहेब हं! हं! म्हणत राहिले, पण त्यांच्या चेहऱ्यावरची रेषही हलली नाही. शर्ट घेण्याचं नाव नाही. मग तो शर्ट साहेबांच्या अंगावर कसा खुलून दिसेल, कुठल्याही डार्क पँटवर कसा चालेल वगरे मुद्दे तरुणानं शोधले. साहेब म्हणाले, ‘हा शर्ट उत्तम आहे, हे मला पटतंय, मला तो आवडलाही आहे, पण सध्या माझ्याकडे खूप शर्टस् आहेत. मला हा शर्ट नकोच आहे.’
तरुण क्षणभर गप्पच बसला. साहेबांनी त्याच्या तोंडावर दारच बंद केलं. थोडक्यात ‘नकोच आहे तर घ्यायला कशाला आलात?’ असा विक्रेत्याच्या भूमिकेतला चिडकट प्रश्न त्याच्या मनात आला. उमेदवाराच्या भूमिकेतून त्याला वाटलं, ‘तुम्ही मला नोकरी द्यायची नाही असं ठरवलंच असेल तर सरळ नाही म्हणा ना, उगीच हे नाटक कशाला?’ पण ही वेळ चिडण्याची नव्हती. शर्ट विकण्याचं आव्हान होतं, एवढी उत्तम नोकरी सहजासहजी थोडीच हातची जाऊ देणार? खरी परीक्षा तिथेच तर होती. शिवाय तरुणाच्या आत्मसन्मानाचा प्रश्न होता. आता दुसरं दार शोधणं आलंच.
जरा थांबून तरुण हसून म्हणाला, ‘सर, तुम्हाला असा शर्ट या किमतीत पुन्हा मिळणार नाही. उद्या माझ्याकडे घ्यायला आलात तरी हा नक्कीच विकला गेलेला असेल. तुम्ही हा शर्ट घेऊन ठेवा. अनेकदा आपल्याकडे कुणी जवळचं अचानक येतं आणि त्याला गिफ्ट देण्यासाठी ऐन वेळी काहीच नसतं. तुमच्या एखाद्या जवळच्या नातलगाला, मित्राला ही अगदी उत्तम गिफ्ट असेल. त्यांना तर आवडेलच, पण आपण आवडीनं दिलेली गोष्ट जवळच्या माणसाच्या अंगावर बघताना तुम्हालाही छान वाटेल आणि मुख्य म्हणजे शर्ट तुमच्या ताब्यात राहील. कधी वाटलंच तर स्वत:साठी वापरू शकताच. आत्ता घेऊन ठेवलात तर नंतर ‘अरेरे, तो शर्ट छान होता’ अशी हळहळ राहणार नाही..
यावर मात्र साहेब प्रसन्न हसले. तरुणाला नोकरी मिळाली, हे सांगायला नकोच. त्याची फाइल त्याची शैक्षणिक पात्रता सांगत होती, तांत्रिक प्रश्नांची उत्तरं त्याची बौद्धिक क्षमता सांगत होती, पण ऐन वेळी अनपेक्षित परिस्थितीत हा माणूस किती वेगळ्या प्रकारे विचार करू शकतो? किती आणि कुठले पर्याय वापरून आपलं म्हणणं पटवून देऊ शकतो? जराही प्रतिसाद मिळाला नाही किंवा दारच बंद झालं तर तो नकार त्याला अडवतो की पुढे नेतो? हे तपासणंदेखील कंपनीसाठी तेवढंच महत्त्वाचं होतं. शिवाय बोलताबोलता त्यानं ‘जवळच्या व्यक्तीला भेट देताना त्याला आणि आपल्यालाही छान वाटेल’ हा विन-विन विचारही नकळत केला होता. स्वत:जवळ अशी सृजनशीलता असू शकेल याचा अंदाज त्या तरुणालादेखील नव्हता, पण ‘कर नाही तर मर’ या परिस्थितीतल्या गरजेमुळे त्याच्यातली सुप्त सृजनशीलता जागी झाली. त्या दहा मिनिटांत हा तरुण जीवनशिक्षणातली कित्येक कौशल्यं समजून शिकला होता. असं अनुभवातून शिकणं फारच खरं, सुंदर आणि दीर्घकाळ सोबत राहणारं असतं.
स्टीव्ह जॉब्ज ज्याला गोष्टींना गोष्टी जोडणं म्हणतो ती खरं तर आतून जाणवलेली गरजच असते. फक्त कधीकधी ती परिस्थितीच्या रेटय़ातून येते, तर कधी जॉब्जसारख्या एखाद्याला काळापुढची गरज आतून जाणवते. जगाची नजरही पोहोचलेली नसते अशा गोष्टी त्या जाणिवेतून तयार होतात आणि नंतर एवढय़ा सवयीच्या बनतात की, त्यांच्याशिवाय चालूच नये.
‘अलौकिक असेल तरच ती सृजनशीलता खरी,’ असं एक तत्त्व नकळत आपल्या सर्वाच्या मनात रुजलेलं असतं. गावं तर लतादीदींसारखंच, क्रिकेट खेळावं तर सचिनसारखं, अभिनय अमिताभजींसारखाच असं मानलं तर सर्वसामान्य माणसाची पुढे जाण्याची शक्यताच संपते. सुरू करण्यापूर्वीच वैफल्य येऊ शकतं. त्यामुळे ही हिमालयाच्या उंचीची माणसं आदर्श म्हणून डोळ्यासमोर हवीत, पण आपापल्या पातळीवर, आपापल्या क्षेत्रात प्रत्येक जण सृजनशील असू शकतो, हा विश्वासदेखील तेवढाच सोबत हवा. ‘क्रिएटिव्ह िथकिंग’ हे एक तंत्र आहे. अगदी लहानपणापासून ते वापरता येतं. त्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकात ते कमीअधिक प्रमाणात रुजत जातं. आपल्याला यातून काय घडायला हवं आहे, हे लक्षात घेऊन त्या दिशेनं टप्प्याटप्प्यानं पुढे जाता येतं.
 थोडक्यात, सृजनशीलतेची सुरुवात एवढय़ा लहानपणापासूनसुद्धा करून देता येऊ शकते. आईन्स्टाईन म्हणतो तसं, ‘क्रिएटिव्हिटी ही संसर्गजन्य असते, ती एकाकडून दुसऱ्याकडे सरकत राहाते.’ क्रिएटिव्ह िथकिंग ही सवय आहे. आनंदानं शिकणं होण्यासाठी सृजनशीलतेशी लहानपणापासून सहज मत्री हवी. शिक्षकांनी आणि घरातल्यांनी ती पहिल्यापासून रुजवली पाहिजे. वेगळा विचार करण्यासाठी परिस्थिती निर्माण करून दिली पाहिजे. तर ‘क्रिएटिव्ह कल्चर’ ही जीवनशैली बनू शकते.  सृजनशीलता ही सहजप्रवृत्ती व्हायला हवी असेल तर एवढं ग्रासरूटला, शिकण्यातल्या साचेबद्धतेच्या मुळापर्यंत जायला हवं. नाही का?    
neelima.kirane1@gmail.com

Is this waitress serving at a restaurant in China robot or human Find out
भारताला ‘कॅन्सर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’ का म्हटले जाते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कारण…
Real Reason Behind MSD's Early Test Retirement
VIDEO : ‘जर तुला मूल हवे असेल तर …’, साक्षीने धोनीच्या कसोटी क्रिकेटमधून लवकर निवृत्तीचे खरे कारण सांगितले
Gudi Padwa 2024 Wishes messages and quotes in Marathi
Gudi Padwa 2024: गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या द्या प्रियजनांना हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर मेसेज
How to improve Cibil score tips to increase
‘सिबिल’ स्कोअर कसा सुधाराल?