career guidance for students career counselling tips benefits of career guidance zws 70 | Loksatta

करिअर मंत्र

मुंबईत एका नामवंत कॉलेजात उत्तम मार्काने तुझा सगळा प्रवास चालू आहे हे वाचून प्रथम तुझे अभिनंदन करत आहे.

career guidance for students
(संग्रहित छायाचित्र) ;

डॉ. श्रीराम गीत

नमस्कार सर,

मी रुपारेल कॉलेजमध्ये ‘एसवायबीए’ला शिकतेय. माझे विषय सायकॉलॉजी, फिजिओलॉजी, इंग्लिश लिटरेचर आहेत. मला पुढे क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये मास्टर्स करून संशोधन करायचे आहे. मला मास्टर्स भारतात किंवा बाहेर देशात करायचे आहे. पण पीएच. डी. मात्र बाहेरच करायची आहे. त्यासाठी मला भारतात आणि बाहेर मास्टर्स कुठे करावे, त्यासाठी शिष्यवृती कुठे मिळेल ते कसे शोधावे याचे मार्गदर्शन करावे हि विनंती.

मध्यमवर्गीय आहोत. शिक्षणासाठी योग्य खर्च करू शकू. पण, अवास्तव जास्तीचा खर्च शक्य नाही. एसवायबीए करत असतानाच मी जॅपनीज  N5,  N4 परीक्षा उत्तम मार्काने उत्तीर्ण झाले,  N3 ची तयारी चालू आहे, जून २०२३ मध्ये परीक्षा देईन. शिवाय फ्रेंच २ परीक्षांची तयारी झाली आहे. त्या परीक्षासुद्धा मी जूननंतर देणार आहे. जपानी किंवा दुसरी परदेशी भाषा यात करिअरचा दुसरा पर्याय ठेवला आहे, मला जॅपनीज, इंग्लिश आणि सायकॉलॉजी तिन्ही आवडते व जमते. क्लिनिकल सायकॉलॉजी मास्टर्स किंवा पीच.डी. जपानमध्ये काय संधी आहेत किंवा इतरत्र दुसऱ्या देशात चांगल्या संधी असतील तर मला तिथली नवीन भाषा शिकायला आवडेल.

– चारुता

मुंबईत एका नामवंत कॉलेजात उत्तम मार्काने तुझा सगळा प्रवास चालू आहे हे वाचून प्रथम तुझे अभिनंदन करत आहे. तुझा प्रश्न खूप सविस्तर व मोठा आहे. त्याचे छोटे तुकडे करून मी उत्तर देत आहे.

निमहंस बंगलोर ही सायकॉलॉजी मास्टर्ससाठी भारतातील उत्तम संस्था आहे. कठीण प्रवेशपरीक्षेतून निवड होते. जपानी भाषा व सायकॉलॉजी या दोन्हीतून डॉक्टरेट करण्यासाठी जपानला अगदी कमी खर्चात जाता येण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्याकडे शैक्षणिक खर्च जवळपास पडत नाही. मात्र, तुझ्या मनात जे संशोधन करायचे आहे त्यासाठी तिथे राहण्याची, काम करण्याची संधी कितपत उपलब्ध होईल याबद्दल माझे मनात शंका आहे. स्वाभाविक पुढचा प्रश्न येतो जपानी डॉक्टरेट केल्यावर त्याला इतर देशात किती व कसे प्राधान्य देऊन काम मिळेल. सायकॉलॉजी विषयामध्ये गेल्या २५ वर्षांत तिथे जाऊन काम करणारी व्यक्ती मला अजून माहिती नाही. तशी सापडली तर तू त्याना भेटून सविस्तर माहिती घ्यावीस.

अमेरिका या देशात सायकॉलॉजी विषयात काम करणे संशोधन करणे याला मान्यताही आहे व त्या स्वरूपाची कामे करणारे अनेक व्यक्ती उत्तम कार्यरत आहेत. मात्र त्यासाठी मिळणाऱ्या सर्व सवलती म्हणजेच फी वेव्हर या तुझ्या एमए नंतरच्या जीआरईच्या स्कोअरवर अवलंबून असतील. सध्या तरी फ्रेंचचा अभ्यास बाजूला ठेवावास. दरमहा एका इंग्रजी (नॉन फिक्शन) पुस्तकाचे वाचन, व सायकोलॉजीतील अभ्यासेतर अवांतर वाचनावर भर द्यावा. विविध भाषा शिक्षण हे आयुष्यभर करता येण्याची गोष्ट आहे. मात्र जपानी भाषेतील यानंतरच्या सर्व पातळय़ा खूप कठीण होत जातात, एवढे पक्के लक्षात ठेवावे. शेवटचा एक वेगळा रस्ता सुचवत आहे. जपानी भाषेच्या सर्व पातळय़ा पूर्ण झाल्यानंतर स्कॉलरशिप मिळवून जपानमध्ये एखादे वर्ष शिकायला जावे व त्यावेळेस तेथील सायकॉलॉजीमधील विविध पर्यायांचा नीट माहिती घेऊन अभ्यास करावा व निर्णय घ्यावास. अशा पद्धतीत मुला मुलींना जपानी विद्यापीठे मदत करतात.

आवाहन

यूपीएससी द्यायची आहे. तर मनात हजारो प्रश्न उभे राहतात. मार्गदर्शनाची गरज भासते. अर्थात प्रश्न तिथे उत्तरही असतेच, करिअरशी निगडित देशातील सर्वोच्च परीक्षांविषयीच्या शंकांचे निरसन होईल, असे एकच ठिकाण म्हणजे करिअर वृत्तांतमधील करिअर मंत्र. म्हणूनच विद्यार्थ्यांनो, लेखणी उचला आणि प्रश्न विचारा. आमचा ई-पत्ता : 

careerloksatta@gmail. Com

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-01-2023 at 05:43 IST
Next Story
एमपीएससी मंत्र : वनसेवा मुख्य परीक्षा पेपर एक – राज्यव्यवस्था घटक