छान, वेगळं काही पाहिलंत की तुम्हाला तो क्षण कॅमेऱ्यात टिपावासा वाटत असेल तर छायाचित्रण या कलेकडे अधिक गांभीर्याने पाहायला हरकत नाही. छायाचित्रणात जर तुम्हाला करिअर करायचे असेल तर सृजनशीलतेसोबत तंत्रकौशल्याचीही आवश्यकता असते, हे मात्र लक्षात घ्यायला हवे.
छायाचित्रणात करिअर करायचे असल्यास व्यापाराचा दृष्टिकोन, तांत्रिक माहिती आणि सृजनशीलता या तीन गोष्टी अत्यावश्यक ठरतात. दृश्यकल्पना करू शकणारा सृजनशीलतेचा तिसरा डोळा छायाचित्रकाराकडे असणं आवश्यक असतं. याच्या जोडीला जर तुम्ही तांत्रिक ज्ञान अवगत केलंत तर तुमच्या सृजनशीलतेला अधिक बळकटी प्राप्त होते.
छायाचित्रणासाठी आवश्यक असलेली तांत्रिक वैशिष्टय़े संपादन करण्यासाठी काही पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तुम्ही महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच हे अर्धवेळ अभ्यासक्रम करू शकता. संगणकीय पाश्र्वभूमी छायाचित्रणाच्या कलेसाठी अधिक पूरक ठरते. ही सर्व कौशल्ये तुमच्या ग्राहकाला ज्या प्रकारचे छायाचित्र हवे आहे, ते देता येण्यासाठी महत्त्वाची ठरतात. यात प्रामुख्याने कॅमेरा, प्रकाशयोजनेचे कौशल्य, डिजिटल इमेजविषयीचे कौशल्य, तांत्रिक सामग्रीचे कौशल्य यांचा समावेश असतो.
जेव्हा तुम्ही कामाला सुरुवात कराल तेव्हा एखाद्या प्रस्थापित छायाचित्रकारासोबत काम केल्याने तुम्हाला अनेक गोष्टी शिकता येतील. व्यापारविषयक दृष्टिकोनही विकसित व्हायला मदत होईल. ग्राहकांसोबत कसे वागावे, छायाचित्रकाराला कुठल्या समस्या उद्भवू शकतात आणि त्यावर मात कशी करायची हेही कळते. छायाचित्रणाच्या वेगवेगळ्या कार्यशाळांमध्ये सहभागी झाल्याने कामाचा उत्तम अनुभव मिळू शकतो.
प्रशिक्षण
तुमचे कौशल्य ऑनलाइन आल्बमद्वारे, फोरमद्वारे इतरांसमोर मांडलेत तर एका प्रकारे तुमच्या कामाचा परिचय इतरांना होऊ शकेल. तुमच्या आल्बमला भेट देणाऱ्यांच्या प्रतिक्रिया, टिपणे यांतून तुमच्या कौशल्यांना अधिक धार येईल. फ्रीलान्स काम करूनही तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे छायाचित्रण करू शकता. यातूनच या क्षेत्रात पूर्णवेळ काम करण्यासाठी इतर छायाचित्रकारांपर्यंत आणि संस्थांपर्यंत पोहोचण्याचा आत्मविश्वास तुमच्यात येतो.
तांत्रिक कामकाजाचे कौशल्य, एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि तुमच्या कामाचा उत्तम पोर्टफोलियो या गोष्टी तुमची कारकीर्द घडविण्यासाठी आवश्यक ठरतात. तुमच्या कौशल्यांचे मार्केटिंग करण्यासाठी या गोष्टींचा उपयोग करा.
करिअर संधी
तुम्ही तुमचा स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकता, तुमचा स्वत:चा स्टुडियो उभारू शकता किंवा काही फ्रीलान्स प्रकल्पकाम हाती घेऊ शकता. व्यावसायिक छायाचित्रकाराचे सहाय्यक म्हणून तुम्ही तुमची कारकीर्द सुरू करू शकता. तुम्हाला कुठल्या प्रकारच्या छायाचित्रणात कारकीर्द घडवायची आहे, त्यानुसार तुम्ही एखाद्या कला दिग्दर्शकासोबत अथवा बातमीदारांसोबत काम सुरू करू शकता.
वेतन
तुम्ही कितीही सृजनशील असलात तरी सुरुवातीच्या दिवसांत या क्षेत्रात पैसा मिळवणे अवघड आहे. उमेदवारीच्या काळात कठोर मेहनत आणि उत्तम व्यापारी कौशल्ये आत्मसात केली तर या क्षेत्रात तुम्हाला पाऊल रोवता येईल. एखाद्या ज्येष्ठ छायाचित्रकाराचा सहाय्यक म्हणून कामाला सुरुवात करताना महिन्याला १० ते १५ हजारांपर्यंतची कमाई तुम्हाला करता येईल. तुम्हाला काही फ्रीलान्स कामेही घेता येतील. जेव्हा तुम्ही या व्यवसायात पूर्णवेळ उतराल तेव्हा महिन्याकाठी २५ हजार ते ४० हजारांपर्यंत नक्की मिळवता येतील. फॅशन फोटोग्राफी या अनेकांना खुणावणाऱ्या क्षेत्रात मानधनाची रक्कमही अधिक आहे.
जर तुम्ही स्वतंत्रपणे छायाचित्रणाचा व्यवसाय करत असाल तर तुम्ही १० हजार ते ५० हजारांपर्यंतची कामं दिवसाला करू शकता. उदाहरणार्थ- जर तुम्ही वेडिंग फोटोग्राफर असाल आणि एखादं मोठं काम तुम्हाला मिळालं तर दिवसाकाठी उत्तम कमाई तुम्हाला करता येईल.
तुम्ही कुठे काम करता, तसेच तुमची सृजनशीलता आणि कामाचा अनुभव यावर तुमचे वेतन अवलंबून असते.

रंग, छटा आणि विविध गोष्टींद्वारे तुम्ही तुमची सृजनशीलता व्यक्त करणं ही मोठी आनंददायी गोष्ट आहे. मात्र छायाचित्रणाचं काम हे तणावाखाली आणि अत्यंत वेगवेगळ्या कामाच्या परिस्थितीत करायचे काम आहे. या कामात तुमच्याकडून मोठय़ा अपेक्षा असतात आणि कामाचे तासही आडनिडे असतात.
कामाचे विविध विभाग
* फोटोजर्नालिझम- हा पत्रकारितेचाच एक भाग आहे. ज्यात छायाचित्रकार आपल्या छायाचित्रांतून बातमी देत असतो. या क्षेत्रात काम करण्यासाठी अचूकता आणि कुठल्या चित्रांत बातमी दडलेली आहे हे जाणण्याची कल्पनाशक्ती आवश्यक आहे. फोटोजर्नालिस्टना अनेकदा आपला जीव धोक्यात घालून आपत्कालीन परिस्थितीत मग ती युद्धजन्य परिस्थिती असो, पूरग्रस्त वा दुष्काळग्रस्त स्थिती असो, दंगलग्रस्त परिस्थिती असो, आपले काम चोख बजावावे लागते. याच क्षेत्रात तुम्हाला फीचर फोटोग्राफीही करता येऊ शकते. त्यात एखाद्या संकल्पनेवर अथवा विषयावर आधारित छायाचित्र काढून त्यातील बातमीची गोष्ट छायाचित्रांतून उलगडत न्यायची असते. यात स्वतंत्रपणे अथवा न्यूजएजन्सीसाठी तुम्हाला काम करता येईल.
* फॅशन आणि जाहिरात- तुम्ही या क्षेत्रातील ग्लॅमरकडे आकर्षित होत असाल तर फॅशन आणि जाहिरात या दोन शाखांची निवड तुम्हाला करता येईल. ही नव्या कल्पनांना वाव देणारी, दिमाखदार आणि उत्तम मानधन देणारी अशी क्षेत्रे आहेत. जाहिरात एजन्सीज, फॅशन हाऊसेस आणि फॅशन मासिकांमध्ये तुम्हाला काम करता येईल.
* निसर्ग आणि प्राणीजीवनविषयक छायाचित्रण- जर तुम्हाला निसर्गात भटकंती करणं पसंत असेल आणि ते कॅमेऱ्याने टिपणं हे तुमचं पॅशन असेल तर नक्की तुम्ही या शाखेची निवड करू शकाल. तुम्हाला प्रवासविषयक मासिके, भौगोलिक माहिती देणारी मासिके, वन्यजीवविषयक मासिके, प्रकाशने यांच्यासोबत काम करता येईल.
* इव्हेन्ट फोटोग्राफी- लग्नसोहळे, क्रीडाविषयक तसेच सांस्कृतिक सोहळे, कौटुंबिक मेळावा आदी इव्हेन्ट्समध्ये छायाचित्रणाची संधी तुम्हाला मिळू शकते. यात फिल्म फोटोग्राफीलाही मोठी मागणी असते, कारण यातील बहुसंख्य ग्राहकांना निगेटिव्हज्ची कॉपी हवी असते.
* स्टील फोटोग्राफी- पोटर्र्ेट फोटोग्राफी हे या प्रकारच्या छायाचित्रणाचे एक उदाहरण आहे. ज्यात तुम्ही मुले, पाळीव प्राणी आदींचे फोटो काढता. तुम्ही तुमचा स्वत:चा स्टुडियो काढू शकता किंवा दुसऱ्या कुणासाठी काम करू शकता. पाककलाविषयक पुस्तकांसाठी फोटो काढणे हीदेखील कामाची एक उत्तम संधी आहे.
* ट्रॅव्हल फोटोग्राफी- जर तुम्हाला साहसी जीवनाची तसेच प्रवासाची आवड असेल, तर ट्रॅव्हल फोटोग्राफीचा उत्तम पर्याय तुम्हाला स्वीकारता येईल. आदरातिथ्यविषयक क्षेत्रात (हॉस्पिटॅलिटी), प्रवासविषयक मासिकांमध्ये तसेच वेबसाइटवर ट्रॅव्हल फोटोग्राफरना कामाची संधी मिळू शकते. या क्षेत्रात काम करण्यासाठी योग्य क्षण वेळीच क्लिक करण्याचे कौशल्य तुमच्या अंगी असायला हवे.
जर तुमच्यात छायाचित्रणाची आवड असेल तर हे क्षेत्र व्यवसाय म्हणून निवडण्यापासून तुम्हाला कोणतेही कारण रोखू शकत नाही. छायाचित्रणाच्या क्षेत्रात पाय रोवताना तुमच्यातील छायाचित्रणविषयक हुशारीला तांत्रिक कुशलतेची जोड मिळायला हवी. आज अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये छायाचित्रणाचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यातील काही उपयोजित कला अभ्यासक्रमांमध्ये वैशिष्टय़पूर्ण प्रशिक्षणही दिले जाते, तर काही ठिकाणी छायाचित्रणविषयक मूलभूत अभ्यासक्रम शिकवला जातो.
अनेक शिक्षण संस्थांमध्ये छायाचित्रणविषयक पूर्ण वेळ, तर काही ठिकाणी अर्धवेळ अभ्यासक्रम शिकवले जातात. संस्थांमध्ये पदवी, पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध असतात. त्यात क्रिएटिव्ह फोटोग्राफी, स्टील फोटोग्राफी, वेडिंग फोटोग्राफी, पोटर्र्ेट फोटोग्राफी यासारखे वैशिष्टय़पूर्ण अभ्यासक्रम अंशकालीन अथवा दीर्घ मुदतीसाठी उपलब्ध आहेत.

छायाचित्रणाचे प्रशिक्षण देणाऱ्या काही आघाडीच्या शिक्षण संस्था
* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फोटोग्राफी, मुंबई-  अर्धवेळ/पूर्णवेळ बेसिक आणि अ‍ॅडव्हान्स फोटोग्राफी अभ्यासक्रम.
वेबसाइट- http://www.focusnip.com
* झेवियर्स इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन, मुंबई- फोटोग्राफीचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम तसेच वेळोवेळी छायाचित्रणविषयक कार्यशाळांचे आयोजनही केले जाते.
वेबसाइट-  http://www.xaviercom
* फोटोग्राफी अ‍ॅकेडमी, दिल्ली- प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रम-
वेबसाइट-  apexindia.net
* श्री अरबिंदो इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन, नवी दिल्ली- अर्धवेळ तसेच पूर्णवेळ अभ्यासक्रम तसेच छायाचित्रणाचे अंशकालीन अभ्यासक्रम.
वेबसाइट – http://www.saimc.com
* शरी अ‍ॅकेडमी- हे एकमेव अ‍ॅडोबचे अधिकृत प्रशिक्षणकेंद्र असून यात व्यावसायिक छायाचित्रणासाठी विविध अभ्यासक्रम राबवले जातात. यात दोन वर्षांच्या पदविका अभ्यासक्रमाचा समावेश आहे. वेबसाइट- http://www.shariacademy.com
* हैदराबाद येथील जवाहरलाल नेहरू टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये फोटोग्राफीमध्ये फाइन आर्टस्ची पदवी प्राप्त करता येते तसेच फोटोग्राफी आणि व्हिज्युअल कम्युनिकेशनमधून फाइन आर्टस्ची पदव्युत्तर पदवी (अर्धवेळ अभ्यासक्रम) प्राप्त करता येते.
वेबसाइट- www. jntu.ac.in
* वाराणसी महात्मा गांधी काशी विद्यापीठ, जयपूर येथील रूपम नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन, कोलकाता येथील सत्यजित रे फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट येथे छायाचित्रण हा उपविषय म्हणून उपलब्ध आहे.
योगिता माणगांवकर