सुरेश वांदिले

शैक्षणिक गुणवत्ता हीच करिअर घडविण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे सध्याचे चित्र असल्याने अनेक गुणवंत खेळाडू नववीची परीक्षा संपली की पुढे केवळ अभ्यास एके अभ्यास करत बसतात. अशा गुणवंत खेळाडू वा त्यांच्या आई-बाबांनाही तसा दोष देता येत नाही. कारण खेळातील प्रावीण्य त्याला चांगली नोकरी वा चांगले आयुष्य जगण्याची कोणतीही हमी देते अशी एक समजूत आपल्या मनात घट्ट रुजली आहे. जी मुले खेळावर लक्ष केंद्रित करतात त्यांनाही उत्तम करिअर करता येते हे गेल्या काही वर्षांत दिसून येत आहे.

भारत सरकार आणि राज्य सरकार खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवत आहे. गेल्या वर्षीपासून खेलो इंडिया ही क्रीडा स्पर्धा आयोजित केली जात आहे. २०१९मध्ये पुण्यात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. साधारणत: दहा हजार खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील. यामधून सर्वोत्कृष्ट एक हजार खेळाडूंची निवड करून त्यांना पुढील आठ वर्षांसाठी प्रतिवर्षी पाच लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल. निवड झालेल्या खेळाडूंनी त्यांच्याशी संबंधित क्रीडा प्रकारात, क्षेत्रात सर्वोच्च यश प्राप्त करण्यासाठी पूर्णपणे लक्ष द्यावे, यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाईल. विविध क्रीडा प्रकारांना सध्या येत आलेले महत्त्व लक्षात घेतल्यास आपल्या मुलांच्या अंगी काही क्रीडा गुण दिसल्यास त्याला खेळण्यासाठी प्रोत्साहित करायला हवे.

स्कूल ऑफ स्पोर्ट्स

आपल्या देशात खेळ शिकविणारी एक स्वतंत्र शाळा आहे. मोतिलाल नेहरू स्कूल ऑफ स्पोर्ट्स या नावाने ती ओळखली जाते. हरयाणा सरकारने या संस्थेची स्थापना १९७३ साली केली. ही निवासी शाळा हरयाणा सरकारच्या वतीनं सोनपत जिल्हय़ातील राय या ठिकाणी चालवली जाते. आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असणाऱ्या कुटुंबातील प्रतिभावंत खेळाडूंना सर्व सुविधा पुरवण्याच्या हेतूने या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. क्रीडा विषयातील निवासी स्वरूपाच्या शाळांमध्ये या संस्थेने गेल्या काही वर्षांत सातत्याने सर्वोत्कृष्ट स्थान पटकावले आहे. ही शाळा २५० एकर परिसरात वसली असून दिल्लीच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन- सीबीएसई) संलग्न आहे.

या शाळेत मुख्यत्वे चौथ्या वर्गात प्रवेश दिला जातो. एकूण १०० विद्यार्थ्यांची (मुले/मुली) निवड केली जाते. यातील ८० टक्के मुले ही हरयाणा राज्यातील असतात तर इतर राज्यांतील २० टक्के मुले असतात. प्रवेश मिळालेल्या मुलांना अ‍ॅथेलेटिक्स, जिम्नॅस्टिक्स, पोहणे, बास्केटबॉल, हॉकी, लॉन टेनिस, बॉक्सिंग, क्रिकेट, फुटबॉल, घोडेस्वारी, व्हॉलीबॉल, रायफल शूटिंग या खेळांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. दहावी संपेपर्यंत विद्यार्थ्यांला एका तरी खेळात प्रावीण्य मिळवता यावे या अनुषंगाने त्यांना प्रशिक्षित केले जाते. त्यासाठी त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात. विविध राज्य आणि राष्ट्रीय स्तरांवरील क्रीडा स्पर्धामध्ये खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. विद्यार्थ्यांच्या खेळातील प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन केले जाते. ठरवलेल्या निकषानुसार कामगिरी करत नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित विद्यार्थ्यांस शाळेतून काढून टाकले जाते.

या संस्थेच्या परिसरात स्टेडियम, जलतरण तलाव, जिम्नॅशिअम सुविधा, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल कोर्ट, फुटबॉल मदान, क्रिकेट मदान, टेनिस कोर्ट, स्क्वॉश कोर्ट आणि रायफल नेमबाजीसाठीची सुविधा आहे. या ठिकाणी कृत्रिम गवतापासून तयार केलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकीचे मदानही आहे. खेळासोबतच विद्यार्थ्यांची दहावी आणि बारावी परीक्षेची उत्तम तयारी केली जाते. बारावीनंतरच्या एनडीए, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांची सुट्टय़ांमध्ये तयारी केली जाते. वेगवेगळ्या राज्य आणि राष्ट्रस्तरीय स्पर्धासाठी निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेगळे प्रशिक्षण आयोजित केले जाते.

अशी असते परीक्षा

या संस्थेत वर्ग चारमध्ये प्रवेशासाठी मुलांच्या निवडीसाठी शारीरिक क्षमता चाचणी आणि खेळ कल चाचणी(फिजिकल एफिशियन्सी अँड स्पोर्ट्स अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट- पीइसीएटी) आणि क्रीडा गुणवत्ता चाळणी (गेम स्पेसिफिक टॅलेन्ट टेस्ट) संस्थेच्या राय येथील कॅम्पसमध्येच घेतली जाते. पीईसीएटी उत्तीर्ण झालेल्या मुलांनाच क्रीडा गुणवत्ता चाळणी परीक्षेसाठी बोलावले जाते. या लेखी परीक्षेला ४० टक्के वेटेज देण्यात येते. या परीक्षेत इंग्रजी, गणित, िहदी या विषयांमध्ये प्रत्येकी ३० गुण आणि सामान्य ज्ञानाचे १० गुणाचेच प्रश्न विचारले जातात. एनसीईआरटी (नॅशनल  कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग)च्या तिसरीच्या पुस्तकातील अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातात. उपरोक्तनमूद दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलांना वैद्यकीय चाळणी परीक्षा द्यावी लागते. यात उत्तीर्ण मुलांचीच अंतिम निवड केली जाते. एखाद्या खेळात असामान्य प्रतिभा असलेल्या पाच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या मुलांचे वय ८ ते १८ वर्षे या दरम्यान असावे लागते. या मुलांनी कनिष्ठ वा वरिष्ठ राष्ट्रीय खेळांमध्ये सहभाग घेतलेला असावा किंवा राज्य खेळ स्पर्धामध्ये पहिला, दुसरा वा तिसरा क्रमांक मिळवलेला असावा. मात्र त्यांना लेखी परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा २१ जानेवारी ते २५ जानेवारी २०१९ या कालावधीत घेतली जाईल. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची दुसऱ्या टप्प्यातील लेखी परीक्षा संस्थेच्या राय येथील कॅम्पसमध्ये १७ फेब्रुवारी २०१७ रोजी घेतली जाणार आहे.

संपर्क

मोतिलाल नेहरू स्कूल ऑफ स्पोर्ट्स, राय (जिल्हा-सोनपत)- १३१०२९,

दूरध्वनी- ०१३०- २३६६५०१.

फॅक्स- २३६६२७१

संकेतस्थळ –  http://www.mnssrai.com

ईमेल –  mnssrai@rediffmail.com

Story img Loader