करिअरमंत्र

इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडेमी आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडेमीसाठी कोणत्याही विषयातील पदवीधराची निवड होऊ शकते.

*   मी औषधीनिर्माण शास्त्राच्या तिसऱ्या वर्षांला आहे. मला भारतीय सैन्य दलात अधिकारी पदासाठी काय संधी आहे?

– स्वप्निल काळे, नाशिक

आपण, पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर किंवा बी.फार्मच्या शेवटच्या वर्षांला असताना कम्बाईन्ड डिफेन्स सर्विस एक्झामिनेशन ही परीक्षा देऊन भारतीय सैन्य दलात जाऊ  शकता. संघ लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या या परीक्षेद्वारे इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडेमी, इंडियन एअर फोर्स अ‍ॅकॅडेमी, इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडेमी आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडेमीसाठी निवड केली जाते. इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडेमी आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडेमीसाठी कोणत्याही विषयातील पदवीधराची निवड होऊ  शकते. इंडियन एअर फोर्स अ‍ॅकॅडेमीच्या निवडीसाठी कोणत्याही विषयातील पदवीधर पात्र ठरत असला तरी त्याने बारावीपर्यंत भौतिकशास्त्र आणि गणिताचा अभ्यास केलेला असावा. इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडेमी, इंडियन नॅव्हल अ‍ॅकॅडेमी आणि इंडियन एअर फोर्स अ‍ॅकॅडेमीच्या प्रवेशसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत प्रत्येकी दोन तासांचे व बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीचे इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि अंकगणित हे तीन पेपर्स उमेदवारांना द्यावे लागतात. तिन्ही पेपरमध्ये प्रत्येकी १०० गुणांचे प्रश्न विचारले जातात. इंग्रजी, सामान्य ज्ञान पेपरच्या प्रश्नांचा दर्जा हा पदवीस्तरीय आणि अंकगिणत पेपरचा दर्जा हा बारावीच्या परीक्षेसारखा असतो. मुलाखतीसाठी प्रत्येकी ३०० गुण असतात. ऑफिसर्स ट्रेनिंग कोर्स अ‍ॅकॅडेमीच्या प्रवेशसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत प्रत्येकी दोन तासांचे व बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीचे इंग्रजी आणि सामान्य ज्ञान हे दोन पेपर्स उमेदवारांना द्यावे लागतात. दोन्ही पेपरमध्ये प्रत्येकी १०० गुणांचे प्रश्न विचारले जातात. इंग्रजी, सामान्य ज्ञान पेपरच्या प्रश्नांचा दर्जा हा पदवीस्तरीय परीक्षेसारखा असतो. मुलाखतीसाठी २०० गुण असतात. महाराष्ट्रात परीक्षेची केंद्रे- मुंबई व नागपूर. महत्वाचे म्हणजे संबंधित उमेदवाराने या परीक्षेसाठी अर्ज भरण्यापूर्वी तो वैद्यकीय, मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा सक्षम आहे किंवा नाही याची खात्री करून घेणे आवश्यक ठरते. यासाठी कोणती मानके
(स्टँडर्डस )आवश्यक आहेत, त्याची माहिती यूपीएससीच्या संकेतस्थळावर नमूद आहेत. अर्ज ऑनलाइन भरावा लागतो-
http://www.upsconline.nic.in,

दूरध्वनी- ०११-२३३८५२७१/२३३११२५

*   वैद्यकीय विद्यार्थ्यांना एमपीएससी व यूपीएससी तसेच इतर स्पर्धा परीक्षा कितव्या वर्षी देता येतात? चौथ्या वर्षी की इंटर्नशिपला असताना?

धनश्री देसाई

पदवीच्या अंतिम वर्षांला यूपीएससीची परीक्षा देता येते. मात्र यूपीएससी व एमपीएससीने निर्धारित केलेल्या कालावधीतपर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Best career tips

ताज्या बातम्या