मला बारावीमध्ये ५५ टक्के गुण मिळाले आहेत. मी आता बीएस्सीच्या प्रथम वर्षांला असून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणी व वनस्पतीशास्त्र हे विषय शिकत आहे. मला रसायनशास्त्र शिकण्यात रस वाटतो. त्या दृष्टीने मार्गदर्शन करावे तसेच कोणती परदेशी भाषा शिकणे उपयोगी
पडू शकेल?    – संकेत निंबाळकर
रसायनशास्त्रात एमएस्सी केल्यास विविध रसायननिर्मितीच्या कंपन्यांमध्ये संधी मिळू शकते. अधिक गुणवत्ता प्राप्त केल्यास संशोधन, अध्यापन या क्षेत्रांतही करिअर करता येईल. इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी तसेच इंडियन  इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स यांसारख्या नामवंत संस्थांमधून हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यास प्लेसमेंटच्या वेळी उत्तमोत्तम संधी मिळू शकतात.
तुम्हाला परदेशी भाषा कशासाठी शिकायची आहे, हे आधी पक्के मनात ठरवावे. त्यानुसार भाषा शिकणे सोईचे होईल. केवळ भाषा शिकून उपयोगाचे नाही. त्याचा व्यवहारात उपयोग करता आला पाहिजे. सध्या जर्मन, जॅपनीज, फ्रेंच भाषा शिकण्याकडे विद्यार्थ्यांचा कल दिसून येतो.

 मी बीकॉमच्या दुसऱ्या वर्गात शिकत आहे. सीएस व्हायचे असल्यास काय करू?
    – प्रकाश नरवणे, नांदेड</strong>
द इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने बारावीनंतर आठ महिने कालावधीचा कंपनी सेक्रेटरीजचा फाऊंडेशन कोर्स हा व्यावसायिक अभ्यासक्रम चालविण्यात येतो. या अभ्यासक्रमाला कोणत्याही विद्याशाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. या अभ्यासक्रमांतर्गत इंग्लिश आणि बिझनेस कम्युनिकेशन, इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड स्टॅटिस्टिक्स, फायनान्शियल अकाऊंटिंग आणि एलिमेंट ऑफ बिझनेस लॉज अ‍ॅण्ड मॅनेजमेंट हे विषय शिकवले जातात. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅम या नऊ महिने कालावधीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. त्यानंतर कंपनी सेक्रेटरी प्रोफेशनल प्रोग्रॅॅम या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तो पात्र ठरू शकतो. या शिवाय ५० टक्के गुणांसह पदवी अभ्ययासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी तीन वष्रे कालावधीचा एकात्मिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतली आहे. फाऊंडेशन कोर्स केलेल्या उमेदवारांनासुद्धा ही परीक्षा देता येते.
पत्ता- द इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया १३, जॉली मेकर चेम्बर्स क्र. २, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई- ४०००२१.
वेबसाइट- http://www.icsi.edu
ई-मेल- wiro@icsi.edu

मी सूक्ष्मजीवशास्त्र या विषयासह बी.एस्सीच्या दुसऱ्या वर्षांत शिकत आहे. एमएसस्सी केल्यानंतर कोणत्या संधी मिळतील?
    – सचिन पठाण
सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना कृषी प्रक्रिया, औषधीनिर्माण क्षेत्र, अन्नप्रक्रिया क्षेत्र यामध्ये संधी मिळू शकते. कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रीसर्चच्या अंतर्गत येणाऱ्या विविध प्रयोगशाळांमध्ये संशोधक म्हणून संधी मिळू शकते. कृषी सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, सागरी सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आदी पदांवर कॉर्पोरेट कंपन्या आणि परदेशातील संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते.

मला परदेशात एमएस्सी करण्यासाठी शिष्यवृत्ती हवी आहे. काय करावे लागेल?    – शिवप्रसाद  
परदेशातील उच्च शिक्षणासाठी अनुसूचित जाती-जमाती संवर्गातील उमेदवारांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागामार्फत शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र, त्याकरता प्रारंभी संबंधित उमेदवाराला परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळणे आवश्यक आहे. खुल्या संवर्गातील उमेदवारांना पुढील संधी उपलब्ध आहेत-
१. अमेरिकेतील उच्चशिक्षणासाठी नेहरू – फुलब्राइट शिष्यवृत्ती : संपर्क- http://www.usied.org.in / http://www.education.nic.in
२. ब्रिटनमधील उच्चशिक्षणासाठी ग्रेट शिष्यवृत्ती : संपर्क- bit.ly/cscuk-scholarship-developing-cw
३. के. सी. मिहद्रा संपर्क एज्युकेशन ट्रस्ट : संपर्क- http://www.kcmet.org
४. श्री बृहद भारतीय समाज ट्रस्ट  : संपर्क – सचिव, श्री बृहद भारतीय समाज, १७८, एन. के. मेहता इंटरनॅशनल हाऊस, एलआयसी योगक्षेम कार्यालयाच्यामागे, बाबूभाई चिनाई मार्ग, बॅकबे रिक्लेमेशन, चर्चगेट, मुंबई- ४०००२० या संस्था शिष्यवृत्ती देतात.

मला जॉइंट अ‍ॅडमिशन टेस्टद्वारे आयआयटीमध्ये गणित विषयात एमएस्सी करण्यासाठी प्रवेश घ्यायचा आहे. त्याविषयी माहिती हवी होती.    – प्रीतिश गुरमेर
पुढील शैक्षणिक सत्रासाठी ही परीक्षा
८ फेब्रुवारी २०१६ रोजी घेतली जाणार आहे. ही परीक्षा ऑनलाइन आहे. तुमच्या विषयातील पेपरचा कालावधी तीन तासांचा असतो. राज्यातील परीक्षा केंद्रे- मुंबई, पुणे, नागपूर, नांदेड, नाशिक. आयआयटीतील प्रवेशासाठी खुल्या संवर्गातील उमेदवारांना पदवी परीक्षेत किमान ५५ टक्के आणि राखीव संवर्गातील उमेदवारांना ५० टक्के गुण मिळायला हवे. संपर्क- http://www.iitg.ernet.in/2015

  मी बारावी विज्ञानशाखेत शिकत असून मला वैमानिक व्हायचे आहे. त्यासाठी कोणत्या परीक्षा द्याव्या लागतील?      – प्रतीक गोरे
केंद्र सरकारच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकॅडमीचा अभ्यासक्रम हा ‘अ‍ॅब इनिशिओ टू कमíशअल पायलट लायसन्स कोर्स’ या नावाने ओळखला जातो. या अभ्यासक्रमाचा कालावधी दीड वर्षे आहे. यात प्रामुख्याने सैद्धान्तिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना कमíशअल पायलट लायसन्स प्रदान केले जाते.  अर्हता- हा अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्या खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांला बारावी विज्ञान परीक्षेत गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांमध्ये सरासरी ५५ टक्के गुण मिळणे आवश्यक ठरते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग संवर्गातील विद्यार्थ्यांना ५० टक्के गुण मिळायला हवे. सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात स्वतंत्रपणे उत्तीर्ण व्हावे लागेल. विद्यार्थ्यांनी वयाची किमान १७ वर्षे पूर्ण केलेली असावी.
पत्ता- द डायरेक्टर, इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकॅडमी, फुरसतगंज एअर फिल्ड, रायबरेली- २२९३०२.
वेबसाइट-  http://www.igrua.gov.in
ई-मेल-igrua.exam@gmail.com/admissions@igrua.in

मी २००८ साली इतिहास विषयात पदवी घेतली. २००९ साली पर्यटन पदविका घेतली आहे. मी सध्या जॅपनीज भाषेचा अभ्यासक्रम करीत आहे. मला भविष्यात कुठल्या करिअर संधी मिळू शकतील?    – स्नेहा पटवर्धन
वेगवेगळ्या प्रवासी कंपन्यांमध्ये तुमच्या शैक्षणिक अर्हतेवर आधारित विविध करिअर संधी मिळू शकतात. मात्र, त्याकरता आपल्याला अशा कंपन्यांकडे स्वत:हून जाऊन प्रयत्न करावा लागेल. जॅपनीज भाषेवर प्रभुत्व मिळवल्यास दुभाषा म्हणूनही आपल्याला काम करता येईल. जपानी पर्यटकांची टूर गाइड म्हणूनही आपण काम करू शकाल.

माझे वय २६ असून मला ‘एमबीए इन टॅक्सेशन’ करता येईल का?      – अमर जाधव
तुम्हाला ‘एमबीए इन टॅक्सेशन’ या विषयात नक्कीच एमबीए करता येईल.  मात्र, तुम्हाला प्रवेश घेण्यापूर्वी त्या संस्थेत ग्राह्य़ मानली जाणारी प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. त्याशिवाय पदवी परीक्षेतही किमान ५० टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक ठरते.

मी अकरावी वाणिज्य शाखेत शिकत असून मला यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस व्हायचे आहे. मी बीए करू का? मुंबईच्या ‘एसआयएएस’ या संस्थेत प्रशिक्षणाकरता प्रवेश मिळवण्यासाठी काय करावे लागेल?    – राहुल वाघ
तुम्हाला यूपीएससी परीक्षा देण्यासाठी प्रारंभी कोणत्याही विद्याशाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल. पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांला असलेले विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. आपल्याला नेमक्या कोणत्या विद्याशाखेत आणि कुठल्या विषयांमध्ये गती व स्वारस्य आहे हे लक्षात घेऊनच पुढील शिक्षण घेणे उचित ठरेल. यूपीएससीची परीक्षा  उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमध्ये बीए पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांचाही समावेश   आहे. मुंबईतील एसआयएएस म्हणजेच स्टेट  इन्स्टिटय़ूट फॉर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स या संस्थेमार्फत नागरी सेवा परीक्षेसाठी निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेतून प्रशिक्षण घेतलेले अनेक उमेदवार या परीक्षेत यशस्वी ठरले आहेत. या संस्थेतील प्रवेशासाठी स्वंतत्ररीत्या प्रवेशपरीक्षा घेतली जाते.
संपर्क- http://www.siac.org.in

मी सध्या पुणे विद्यापीठातून बी.एस्सी द्वितीय वर्षांत शिकत आहे. मला व्हिडीओ प्रॉडक्शन या विषयात प्रशिक्षण घ्यायचे आहे. हमखास नोकरीची संधी देऊ शकणाऱ्या प्रशिक्षण संस्थांचे नाव सांगाल का?    – मनोज डोके
आपल्या देशातील कोणतीही शिक्षण संस्था अशी हमखास खात्रीची नोकरी मिळवून देण्याची हमी देत नाही. विद्यार्थी किती ज्ञान प्राप्त करतो आणि त्याचे कौशल्यात रूपांतर करतो हे महत्त्वाचे. त्यासाठी संबंधित विषयात मनापासून रस हवा आणि खूप परिश्रम करण्याची तयारी असावी. इंडियन  इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन- दिल्ली, फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन  इन्स्टिटय़ूट- पुणे, व्हिसिलग वूड- मुंबई या संस्थांमधील अभ्यासक्रमांचा विचार करायला हरकत नाही.

मी गणितात एमएस्सी केले आहे. त्यात मला ४९ टक्के गुण मिळाले आहेत. करिअरच्या संधी कुठल्या क्षेत्रात उपलब्ध होतील?
    – राहुल पाटील
आपण वयोमर्यादा ओलांडली नसल्यास सार्वजनिक बँका, राज्य लोकसेवा आयोग आणि लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेस बसून नोकरी मिळवता
येऊ शकते. नेट/सेट करून अध्यापनाच्या क्षेत्रातही प्रवेश करता येईल. स्वत:चा शिकवणी वर्गही सुरू करता येईल.
खासगी शिकवणीवर्गामध्ये आपल्याला संधी मिळू शकेल.