व्यवस्थापन अभ्यासक्रमाची प्रवेशचाचणी असलेल्या ‘कॅट’च्या लेखी परीक्षेत यंदापासून महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
या फेरफारांचा आढावा घेतानाच ‘कॅट’ देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करावी, याचे मार्गदर्शन-
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या इंडियन इन्स्टिटय़ूट्स ऑफ मॅनेजमेंट तसेच आणखी काही नामांकित संस्थांमधील व्यवस्थापन अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा, अशी अनेक विद्यार्थ्यांची मनीषा असते. या संस्थांमधील प्रवेश निश्चित होण्याकरता सामायिक प्रवेश परीक्षेत (CAT-Common Admission Test) उत्तम गुण प्राप्त करणे अत्यावश्यक ठरते. लेखी प्रवेश परीक्षेनंतर व्यक्तिगत मुलाखतीच्या फेरीतही विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी बजावणे गरजेचे असते. मात्र, प्रवेशाच्या विविध फेऱ्यांमध्ये लेखी परीक्षा हा महत्त्वाचा टप्पा
मानला जातो.
‘कॅट’ परीक्षेत यंदापासून मोठे बदल करण्यात आले आहेत. ‘कॅट’ची तयारी करणाऱ्या आणि
यंदा ही परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी हे
बदल समजावून घेत परीक्षेची तयारी करणे आवश्यक आहे.
यंदाची ‘कॅट’ परीक्षा २९ नोव्हेंबर २०१५ रोजी देशभरातील प्रमुख शहरांमध्ये घेतली जाईल. यंदाच्या परीक्षेतील एक महत्त्वाचा बदल म्हणजे परीक्षेचे तीन विभाग असतील.  याआधी या परीक्षेत केवळ दोन विभाग असायचे. नव्या बदलानुसार, संख्यात्मक कल (क्वान्टिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड), दिलेल्या माहितीचा अर्थ लावणे व तार्किक क्षमतेवर आधारित प्रश्न (डेटा इंटरप्रिटेशन आणि लॉजिकल थिंकिंग), शाब्दिक व वाचन क्षमतेवर आधारित प्रश्न (व्हर्बल आणि रीडिंग) असे या परीक्षेचे स्वरूप राहणार आहे. सुधारित ‘कॅट’ परीक्षेची वैशिष्टय़े पुढीलप्रमाणे आहेत-
* ‘कॅट’ ही संपूर्णपणे ऑनलाइन परीक्षा असून परीक्षेचा कालावधी या वर्षांपासून १७० मिनिटांवरून १८० मिनिटे म्हणजेच तीन तास इतका वाढवण्यात आला आहे. म्हणजेच आधीच्या कालावधीपेक्षा परीक्षेच्या कालावधीत यंदा १० मिनिटांची वाढ करण्यात आली आहे.
* ‘कॅट’च्या नव्या स्वरूपानुसार, या परीक्षेत एकूण १०० प्रश्न असतील. सांख्यिकी विभाग आणि शाब्दिक क्षमता विभागावर प्रत्येकी ३४ प्रश्न विचारले जातील.
* माहितीचा अर्थ लावणे तसेच तार्किक क्षमतेवर आधारित असे ३२ प्रश्न असतील.
* प्रत्येक विभागातील प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी प्रत्येकी ६० मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे. परीक्षार्थीना एकावेळी एकाच विभागातील प्रश्न सोडवता येतील.
* यावेळी प्रथमच परीक्षार्थीना संगणकाच्या पडद्यावर असलेला कॅलक्युलेटर वापरता येईल.
* ‘कॅट’ परीक्षेतील आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे आतापर्यंत सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे- विविध पर्यायांपैकी एका योग्य पर्यायाची निवड करणे या प्रकारचे होते (मल्टिपल चॉइस बेस्ड). मात्र, यंदापासून काही प्रश्नांच्या उत्तरांसाठी बहुपर्याय उपलब्ध नसतील (नॉन मल्टिपल चॉइस बेस्ड क्वेश्चन्स). या प्रकारच्या प्रश्नांच्या अचूक उत्तरासाठी प्रत्येकी ३ गुण मिळतील. मात्र, चुकीच्या उत्तरांना किंवा प्रश्नच सोडवला नसेल तर
गुण वजा होणार नाहीत (निगेटिव्ह मार्किंग नाही).
* जे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे आहेत,  त्या प्रश्नांचे उत्तर अचूक आल्यास प्रत्येकी
३ गुण मिळतील आणि चुकीच्या उत्तरासाठी प्रत्येकी १ गुण वजा होईल. मात्र, ‘नॉन मल्टिपल चॉइस बेस्ड क्वेश्चन्स’ किती असतील व कोणत्या विभागात असतील यासंबंधी स्पष्टीकरण दिलेले नाही. म्हणजेच असे प्रश्न कितीही असू शकतील व कोणत्याही विभागात असू शकतील.
* हेही लक्षात ठेवायला हवे की, प्रश्नपत्रिकेतील तीन विभागांपैकी कोणता विभाग आधी सोडवावा याचे स्वातंत्र्य परीक्षार्थीना दिलेले नाही. त्यांना ठरावीक क्रमानुसारच प्रश्नपत्रिका सोडवावी लागेल.
* या परीक्षेचा अभ्यास करताना सांख्यिकीविषयक  प्रश्नांचा नियमित सराव करणे अत्यंत
आवश्यक आहे.
* शाब्दिक क्षमतेवरील आधारित प्रश्नांसाठीही नियमित वाचन करणे गरजेचे आहे.
शाब्दिक क्षमता ही एका दिवसात वाढवता येत नाही. त्यासाठी वृत्तपत्रे, पुस्तके, जर्नल्स अशा अनेक मार्गानी प्रयत्न करावा लागतो.
* जो विभाग डेटा इंटरप्रिटेशन व तार्किक  सुसंगतीवर (लॉजिकल रिझनिंग) आधारित आहे अशा विभागातील प्रश्नांसाठीसुद्धा नियमित सराव आवश्यक असतो. या परीक्षेत ऑन स्क्रीन कॅलक्युलेटर वापरण्याची परवानगी जरी दिली असली तरी त्यासाठीसुद्धा सराव लागतो. कॅलक्युलेटरचा वापर करण्यातही बराच वेळ दवडू शकतो, म्हणून सराव करायला हवा. मात्र, त्याचबरोबर कॅलक्युलेटर कमीत कमी वापरावा लागेल अशी तयारी करायला हवी.
अंतिमत: असे म्हणता येईल की, ‘कॅट’ची तयारी करताना अधिकाधिक सराव फायदेशीर ठरतो. अलीकडे सराव परीक्षाही (टू‘ ळी२३२) उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त सराव परीक्षा दिल्याने वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरे जायचा सराव विद्यार्थ्यांना मिळू शकतो.
व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय स्तरावरील सवरेत्कृष्ट शिक्षणसंस्थेत प्रवेश घेता यावा याकरता विद्यार्थ्यांनी कसून प्रयत्न करायला हवेत. ‘कॅट’मध्ये यश मिळविण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही, कठोर मेहनतीला पर्याय नाही आणि मेहनत करणाऱ्यांना यश मिळणे अशक्य नाही यावर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायला हवा.
नचिकेत वेचलेकर
nmvechalekar@yahoo.co.in