सायबर कायदा

वाढत्या संधीएखाद्या गुन्ह्य़ाच्या तपासाची काही तंत्रे सर्वसामान्यांनाही एव्हाना माहिती झाली आहेत

Cyber law in mumbai,मुंबई विद्यापीठ

वाढत्या संधीएखाद्या गुन्ह्य़ाच्या तपासाची काही तंत्रे सर्वसामान्यांनाही एव्हाना माहिती झाली आहेत. त्यात रक्ताचे डाग, हस्ताक्षर, वस्तूवरील गुन्हेगाराचे ठसे या बाबींची गुन्ह्य़ाच्या तपासात कशी मदत होते, हेही आपल्याला ठाऊक झाले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत सायबर जगतातील गुन्ह्य़ांचे स्वरूप जसे बदलू लागले, तसे या गुन्ह्य़ाच्या तपासासाठी आगळीवेगळी तंत्रे अंगिकारावी लागली. या दृष्टिकोनातून सायबर फॉरेन्सिक ही नवीन शाखा आता विकसित होत आहे.
सायबर तपासामध्ये पुरावा गोळा करणे महत्त्वाचा ठरतो. सायबर गुन्ह्यांमधील पुरावा हा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड (शब्द, आवाज आणि चलचित्र) अशा स्वरूपाचा असतो. गुन्हा घडला त्या ठिकाणी हा पुरावा; संगणक, मोबाइल फोन, सीडी अशा स्वरूपात सापडतो. हा पुरावा काळजीपूर्वक गोळा करावा लागतो, जेणेकरून त्यातील सत्यता नष्ट होणार नाही. पुराव्याचे पृथक्करण करावे लागते. मिळालेल्या उपकरणांमधून आपल्या हवी असणारी फाईल शोधणे हेही तसे अवघडच काम! एका यंत्रामध्ये हजारो फायली असतात. त्यातून चोरी झालेली फाइल मिळवणे हे कापसाच्या ढिगाऱ्यातून सुई शोधण्यासारखे आहे. वेगवेगळ्या उपकरणांतून माहिती कशी शोधायची याची वेगवेगळी सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. ती वापरण्याचे नैपुण्य उमेदवारामध्ये असणे आवश्यक ठरते.
फॉरेन्सिक सायन्स या विषयाचा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, गुजरात विद्यापीठ, बुंदेलखंड विद्यापीठ, मदुराई कामराज विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांत उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमामध्ये तुम्ही सायबर फॉरेन्सिक हा विषय विशेष विषय म्हणून घेऊ शकता. ‘सीडॅक’तर्फे सायबर फॉरेन्सिक संदर्भातील विशेष अभ्यासक्रम उपलब्ध आहे. अनेक खासगी संस्थांची मागणी लक्षात घेऊन त्याबरहुकूम वैशिष्टय़पूर्ण अभ्यासक्रम तयार केले आहेत. आपण अभ्यासक्रम कुठलाही केला तरी त्या व्यक्तीची आणि त्या पुराव्याची पारख म्हणजे त्याची विश्वासार्हता; ती तुम्हाला मिळवता आली तर सायबर फॉरेन्सिक हे कार्यक्षेत्र तुम्हाला कामाची मोठी संधी आणि यश निश्चितच मिळवून देईल.
सायबर फॉरेन्सिकमध्ये काम करणाऱ्या सरकारी फॉरेन्सिक प्रयोगशाळा आहेत. राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या ठिकाणी त्यांची केंद्रे आहेत. काही खासगी प्रयोगशाळादेखील आता सुरू झाल्या आहेत. सायबर फॉरेन्सिकचा अभ्यास केलेल्या मुलांना या प्रयोगशाळांमध्ये संधी मिळू शकते.
वेगवेगळ्या विधी महाविद्यालयांत अलीकडे सायबर लॉसंदर्भात प्रशिक्षणवर्ग चालवले जातात. याचे कारण म्हणजे माहिती-तंत्रज्ञानाचा कायदा राबविण्यासाठी जसा कायदा माहिती हवा तसेच तंत्रज्ञानाचे उपयोजित्वही ठाऊक असायला हवे. अलीकडे कौटुंबिक कायदे अथवा जमिनीचे व्यवहार आज संगणकीय व्यवस्थेत उपलब्ध असतात आणि त्यामुळे वकील, पोलीस आणि न्याययंत्रणा ही संगणकाद्वारे उपलब्ध होणाऱ्या पुराव्यांवर बव्हंशी विसंबून असते. अशा वेळी न्यायव्यवस्था राबविणाऱ्या या घटकांनाही प्रशिक्षित करणे गरजेचे ठरते. या दृष्टीने वकील, पोलीस आणि न्यायाधीश यांच्याकरताही प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जाते. या अध्ययनामुळे कायदा अमलात आणण्यात येऊ शकणाऱ्या अडचणींवर मात करता येते आणि सोकावलेल्या गुन्हेगाराला जेरबंद करणे शक्य होते.
वेगवेगळ्या विधी महाविद्यालयांत सायबर लॉसंदर्भातील प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात, त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी जरूर घ्यावा.
सायबर गुन्हेगार कुठल्याही देशाचे असू शकतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायदे कोणते, तिथली पोलीस यंत्रणा कशा प्रकारची आहे या साऱ्याचा अभ्यास करणाऱ्या वकिलांची आणि पोलीसांची नक्कीच गरज आहे. सायबर गुन्ह्य़ांना आळा घालणारी यंत्रणा सज्ज होण्याकरता आवश्यक त्या तज्ज्ञांची गरज संगणकीय यंत्रणा कार्यान्वित असणाऱ्या विविध
क्षेत्रांत भासते.
आपल्या देशात इतर रुळलेल्या क्षेत्रांच्या तुलनेत सायबर कायदा, सायबर गुन्हेगारी विश्व हा तुलनेने नवा विषय आहे. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना कामाच्या नवनव्या संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात शिकण्यासारख्या, विकसित करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत.
करिअर संधी
आगामी काळात सायबर कायद्याच्या कक्षा अधिकाधिक रुंदावणार आहे. इंटरनेटच्या सर्वदूर संचारामुळे ते न्यायमंडळाच्या कक्षेत येते. इंटरनेट गुन्हेगारीसंबंधीची सर्व प्रकरणे सायबर कायद्याच्या माध्यमातूनच सोडवली जातात. एकीकडे इंटरनेटच्या माध्यमातून जग जवळ आले असले तरी हे माध्यम गुन्हेगारी जगतासाठीही फळले आहे. याची दखल न्यायप्रक्रियेलाही घ्यावी लागत आहे.
संगणकाच्या माध्यमातून गुन्हेगारी करणाऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कायद्याचा एक नवा अध्याय लिहिला गेला आणि त्याला सायबर लॉ असे नाव देण्यात आले.
या क्षेत्रात करिअर करण्यासाठी आपल्याला संगणकीय ज्ञान आणि आवड असणे आवश्यक आहे. अनेकांना सायबर वकील म्हणूनही कारकीर्द घडवता येऊ शकेल.

सायबर कायद्याविषयीचा अभ्यासक्रम उपलब्ध असणाऱ्या आघाडीच्या शिक्षण संस्था
० नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया, बंगळुरू विद्यापीठ.
वेबसाइट- http://www.nis.ac.in
० सरकारी विधि महाविद्यालय, मुंबई.
० नॅशनल अकादमी ऑफ लीगल स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्च युनिव्हर्सटिी ऑफ लॉ, हैदराबाद. वेबसाइट- www.nalsaroro.org
० द इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फम्रेशन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, इलाहाबाद. वेबसाइट-www.iiita.ac.in
० सिम्बॉयसिस सोसायटी लॉ कॉलेज, पुणे.
० एशियन स्कूल ऑफ सायबर लॉज, पुणे.
वेबसाइट- http://www.asianlaws.org
० सायबर लॉ कॉलेज (एनएएवीआय), चेन्नई, म्हैसूर, हुबळी, मंगळुरू आणि बंगळुरू.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cyber law

ताज्या बातम्या