वेगळय़ा वाटा : जर्मन भाषेतील संधी

इतिहास विषय शिकणाऱ्यांसाठी तर दुसरे जागतिक महायुद्ध हा आवडीचा विषय असतो.

जर्मन लोक, जर्मन ऑटोमोटिव्ह्ज आणि जर्मन भाषा यांच्याबद्दल भारतीयांमध्ये इतर भाषांच्या आणि देशांच्या तुलनेत पहिल्यापासून थोडे जास्त कुतूहल आहे. इतिहास विषय शिकणाऱ्यांसाठी तर दुसरे जागतिक महायुद्ध हा आवडीचा विषय असतो. जर्मनीच्या सध्याच्या चॅन्सेलर अ‍ॅन्गेला मर्केल यांच्या स्थलांतरितांबद्दलच्या भूमिकेनंतर जर्मनी खूपच काळ चर्चेत राहिला आहे. कोणत्याही देशाबद्दल अधिक माहिती करून घ्यायची असेल तर त्याची पहिली पायरी म्हणजे भाषा. जर्मन लोक त्यांच्या देशाला जर्मनी असे म्हणत नाहीत. त्यांच्यासाठी त्यांचा देश म्हणजे ‘फाटरलांड’ (पितृभूमी) आहे आणि ते त्याला ‘डॉईचलांड’ म्हणतात. तसेच त्यांची भाषाही ‘डॉईच’ याच नावाने ओळखली जाते. आपल्याकडे अनेक इंटरनॅशल स्कूल्स आणि महाविद्यालयांमध्ये जर्मन भाषा शिकवली जाते ती तिची ओळख होण्यापुरतीच आणि विद्यार्थी ती निवडतात ती केवळ भरपूर गुणांसाठी. पण हीच भाषा आपल्याला उत्तम करिअरही देऊ शकते, हे अनेकांना माहिती नसते.

कुठे शिकाल?

* ग्योथं इन्स्टिटय़ुट (मॅक्सम्युलर भवन) – पुणे आणि मुंबई व उपनगरांमध्ये गेली ४० वर्षे सातत्याने जर्मन भाषेचे शिक्षण देणारी ही संस्था! मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीच्या बाजूच्या इमारतीतच या संस्थेचे मुंबईतील मुख्यालय आहे. तसेच विलेपार्ले व ठाणे येथेही या संस्थेच्या शाखा आहेत, तर पुण्यात बंडगार्डन भागात ही संस्था आहे.

* मुंबई विद्यापीठ (रानडे भवन) – मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलात जर्मन भाषेचे नियमित वर्ग होतात.

* पुणे विद्यापीठ (रानडे इन्स्टिटय़ूट) – पुणे विद्यापीठातर्फे फग्र्युसन महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या रानडे इन्स्टिटय़ूटमध्येही जर्मन भाषा शिकवली जाते.

* जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली (जेएनयू) – दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात जर्मन भाषेचा अभ्यास करता येईल.

कुठली संस्था निवडाल?

दर १२ मैलांवर भाषा बदलते, असे म्हणतात. जर्मनच्या बाबतीतही वेगवेगळ्या प्रांतातली बोलीभाषा शिवाय, स्वित्र्झलड, ऑस्ट्रिया या प्रदेशांत बोलली जाणारी जर्मन भाषाही वेगवेगळी आहे. ज्याप्रमाणे मराठी भाषेत वऱ्हाडी, कोकणी, शासकीय भाषा, प्रमाण भाषा असा फरक असतो अगदी तसेच. त्यामुळे संस्थेची निवड करताना तुमची गरज कोणती आहे, ते लक्षात घ्या. म्हणजेच तुम्हाला व्यवसायासाठी ही भाषा शिकायची आहे, शिक्षणासाठी की तिकडे काही काळ वास्तव्य करण्यासाठी, हे लक्षात घेऊन संस्था, अभ्यासक्रम निवडा.

जर्मन भाषेतील साहित्य, देशाचा इतिहास, भूगोल आणि राजकीय परिस्थिती यांचा अभ्यास करायचा असेल, तर विद्यापीठातील जर्मन भाषेच्या वर्गाची निवड करता येईल.

जर्मनीत वास्तव्य, नोकरी, उच्चशिक्षण आदी कारणांसाठी जाणाऱ्यांना किंवा भारतातील करिअरच्या दृष्टीने जर्मन शिकणाऱ्यांसाठी मॅक्सम्युलर भवन हा चांगला पर्याय असेल. या संस्थेतर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आंतरराष्ट्रीय पातळीच्या असतात. तसेच सर्व देशांमध्ये या परीक्षांचा दर्जा समान असतो. या संस्थेत कॉमन युरोपियन फ्रेमवर्क ऑफ रेफरन्स फॉर लँग्वेजेस या भाषेसाठी तयार केलेल्या नियमावली व मानकांनुसारच भाषा शिकवली जाते. तरीही उच्च शिक्षणाच्या क्षेत्राप्रमाणे भाषेच्या अपेक्षित पात्रतेत फरक पडतो. उदा. वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षणासाठी जर्मनीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्योथं इन्स्टिटय़ूटमधील सी-१ (अ‍ॅडव्हान्स लेव्हल) ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. तसेच या विद्यार्थ्यांना जर्मनीत गेल्यानंतरही वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित शब्दसंपदा शिकण्यासाठी भाषेचा खास अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. यासंबंधी माहिती पुरवणारे व मार्गदर्शन करणारे अनेक भाषातज्ज्ञ ग्योथं इन्स्टिटय़ूट व विद्यापीठांमध्ये कार्यरत आहेत.

करिअरच्या संधी

जर्मन शिकल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या करिअरच्या संधी खालीलप्रमाणे आहेत. पण त्यासाठी जर्मन भाषेच्या किमान चार परीक्षा उत्तीर्ण होणे, आवश्यक असते.

*आज भारतात डॉईच बँक, मर्सिडिज, सिमेन्स, बायर अशा अनेक बलाढय़ जर्मन कंपन्या कार्यरत आहेत. या कंपन्यांसारख्या इतर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये जर्मन भाषा शिकलेल्यांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे. त्यासाठी लागणारी पात्रता ही कामाच्या स्वरूपानुसार बदलते.

* भाषांतरकार म्हणून या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये तसेच फ्रीलान्सर म्हणूनही घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. भाषांतरासाठीचा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठातून पूर्ण करता येईल.

* बहुराष्ट्रीय कंपन्या, काही वकिलाती तसेच पर्यटन क्षेत्रात दुभाषी म्हणूनही जर्मन भाषा शिकलेल्यांसाठी रोजगाराच्या मुबलक संधी आहेत.

* इतर शिक्षणाच्या जोडीने जर्मन भाषेचे ज्ञान परदेशातील संधींसाठी उपयुक्त ठरते. इमिग्रेशनच्या दृष्टीने आजकाल कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांसारख्या देशांमध्ये जर्मन भाषातज्ज्ञांची, भाषांतरकारांची मागणी आहे.

अर्थात जर्मन शिकण्याची आणि त्यात करिअर करण्याची इच्छा असेल तर तूर्तास तरी मुंबई-पुण्यासारख्या मोठय़ा शहरांशिवाय पर्याय नाही.

जर्मन भाषा शिकतानाचा अभ्यासक्रम आणि साधारण त्या पातळीचा आपल्याकडील अभ्यासक्रम

अदिती धुपकर

(हे अभ्यासक्रम तुलनात्मक नाहीत. ते फक्त माहिती आणि सामान्य आकलनासाठी आहेत.)
car03

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: German language job opportunity