श्रीकांत जाधव

मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर पहिला

आजच्या लेखामध्ये भारतीय स्थापत्यकला आणि शिल्पकला यावर २०१३-२०१८ मध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा आकलनात्मक आढावा घेणार आहोत. तसेच प्रश्नाला अनुसरून नेमके व समर्पक उत्तर कसे लिहावे याची मार्गदर्शनपर चर्चा करणार आहोत. २०१७ व २०१८ मध्ये या घटकावर थेट प्रश्न विचारण्यात आलेला नाही.

* प्र. १. Chola architecture represents a high watermark in the evolution of temple architecture. Discuss.

(मंदिर स्थापत्यकलेमध्ये चोल स्थापत्यकला उच्च विकास दर्शिविते. चर्चा करा.)

(२०१३, ५ गुण आणि १०० शब्दमर्यादा).

या प्रश्नाचा विचार करताना दक्षिण भारतातील मंदिर शैली आणि या शैलीची कालखंडनिहाय वैशिष्टय़ याची सामान्य समज सर्वप्रथम असणे गरजेचे आहे. दक्षिण भारतातील मंदिर शैलीचा विकास हा पल्लव काळापासून सुरू झालेला होता आणि या शैलीला द्राविड शैली असे म्हणतात तसेच पल्लव ही राजकीय सत्ता चोल यांच्या अगोदर येते.

हा प्रश्न विशिष्ट काळातील मंदिर स्थापत्याशी संबंधित आहे म्हणून चोलकालीन मंदिर स्थापत्याची वैशिष्टय़ं नमूद करून कशा प्रकारे चोल स्थापत्यकला ही मंदिर स्थापत्यकलेमध्ये उच्च विकास दर्शिविते याची चर्चा करावी लागते. (या पलूवर उत्तरामध्ये अधिक चर्चा करणे अपेक्षित आहे.)

* प्र. s.  Gandhara sculpture owed as much to the Romans as to the Greeks. Explain.

(गांधार शिल्पकला जशी ग्रीकांची ऋणी लागते तशीच रोमनांचीही लागते. स्पष्ट करा.)

(२०१४, १० गुण आणि १५० शब्दमर्यादा).

या प्रश्नाचे आकलन करताना गांधार शिल्पकला ही कशी अस्तित्वात आलेली होती आणि ही  कला भारतातील कोणत्या प्रदेशात होती व याचा कार्यकाळ या संदर्भातील निश्चित माहिती असणे गरजेचे आहे.

इ. स.पूर्व चौथ्या शतकात अलेक्झांडरच्या आक्रमणानंतर प्राचीन भारताचा प्राचीन युरोपसोबत संबंध प्रस्थापित झालेला होता व पुढे चालून इ. स.पूर्व दुसऱ्या शतकात गांधार शिल्पकलेचा उदय झालेला होता व हा मौर्योत्तर कालखंड होता. गांधार हा प्रदेश वायव्य भारतात येत असे म्हणजेच सध्याच्या पाकिस्तानमध्ये. या प्रदेशातून प्राचीन भारतातील व्यापारासाठी प्रसिद्ध असणारा रेशीम मार्ग गेलेला होता. हा मार्ग युरोप आणि चीन यांना जोडणारा होता. तसेच या कालखंडात भारताच्या याच प्रदेशात परकीय सत्ता इंडो-ग्रीक, कुशाण या सत्ता स्थापन झालेल्या होत्या व त्यांनी या कलेला राजाश्रय दिलेला होता. (ही माहिती फक्त या प्रश्नाची योग्य उकल होण्याच्या दृष्टिकोनातून आहे)

ग्रीक आणि रोमन यांच्या हेलेनिस्टिक (Hellenistic) कलेचा प्रभाव हा गांधार शिल्पकलेवर पडलेला होता म्हणून या हेलेनिस्टिक कलेची महत्त्वाची वैशिष्टय़ं नमूद करून या गांधार शिल्पकलेची निर्मिती होत होती हे सोदाहरण दाखवून गांधार शिल्पकला ही जशी ग्रीकांची ऋणी लागते तसेच रोमनांचीही लागते, हे स्पष्ट करावे.  (या पलूवर उत्तरामध्ये अधिक चर्चा करणे अपेक्षित आहे.)

*  प्र. t. To what extent has the urban planning and culture of the Indus Valley Civilization provided inputs to the present day urbanization? Discuss.

(सिंधू संस्कृतीमधील नगर नियोजन आणि संस्कृतीने वर्तमान स्थितीमधील नागरीकरणामध्ये किती योगदान (input) दिलेले आहे? चर्चा करा.)

(२०१४, १० गुण आणि १५० शब्दमर्यादा)

या प्रश्नाचे आकलन करताना सिंधू संस्कृतीमधील नगर नियोजनाची वैशिष्टय़े काय होती याची सर्वप्रथम माहिती असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वर्तमान स्थितीमधील नागरीकरणाची वैशिष्टय़े काय आहेत याची माहिती असणे गरजेचे आहे.

सिंधू संस्कृतीमधील नगर नियोजनाची वैशिष्टय़े नमूद करून, त्याआधारे वर्तमान स्थितीमधील नागरीकरणाच्या वैशिष्टय़ांचे मूल्यमापन करावे आणि सिंधू संस्कृतीकालीन नगर नियोजन व संस्कृती याचे योगदान कशा प्रकारे वर्तमान स्थितीमधील नागरीकरणामध्ये राहिलेले आहे हे अधोरेखित करून चर्चा करणे अपेक्षित आहे. (या पलूवर उत्तरामध्ये अधिक चर्चा करणे अपेक्षित आहे.)

*  प्र. ४. Early Buddhist Stupa-art, while depicting folk motifs and narratives, successfully expounds Buddhist ideals. Elucidate.

(सुरुवातीची बौद्ध स्तूपकला, लोकांची तत्त्वं आणि कथानकाबरोबरच बौद्ध आदर्शाची यशस्वीरीत्या व्याख्या करते. स्पष्टीकरण द्या.)

(२०१६, १२.५ गुण आणि २०० शब्दमर्यादा)

साधारणत: मौर्य काळापासून भारतात स्तूप निर्मितीला प्रारंभ झालेला होता आणि यापुढील काळात भारतातील विविध ठिकाणी अनेक स्तुपांची निर्मिती करण्यात आलेली होती.

बौद्ध धर्माशी संबंधित प्रसिद्ध स्तुपांची यादी द्यावी. तसेच या स्तुपामध्ये निर्माण करण्यात आलेल्या स्थापत्य व शिल्पकलाकृतीद्वारे अभिव्यक्त करण्यात आलेली बौद्ध धर्माशी संबंधित माहिती नमूद करावी आणि सुरुवातीची बौद्ध स्तूपकला बौद्ध धर्माच्या आदर्शाची यशस्वीरीत्या व्याख्या कसे करते याचे सोदाहरण स्पष्टीकरण द्यावे लागते. (या पलूवर उत्तरामध्ये अधिक चर्चा करणे अपेक्षित आहे.)

सराव प्रश्न

Q1. Since the ancient times, Indian architecture represents synthesis of indigenous and foreign elements. Elaborate. (15 Marks and 250 Words)

Q2. Indian Architecture and Indian Sculpture, both bears the testimony of religious as well as secular influences. Comment (15 Marks and 250 Words)

या पुढील लेखामध्ये भारतीय वारसा आणि संस्कृतीमधील चित्रकला, साहित्य, धार्मिक चळवळ व परकीय प्रवासी यावर विचारण्यात आलेले प्रश्न याचा आढावा उपरोक्त पद्धतीने घेण्यात येईल.