अवांतर वाचन हा प्रकार विद्यार्थी जणू विसरतच चाललेत. जिथे पालकांवरच मोबाइल, टीव्हीने कब्जा केलाय, तिथे विद्यार्थ्यांची काय कथा? पण जालना जिल्ह्य़ातल्या गुंडेवाडी जि.प. शाळेतले चित्र वेगळे आहे. या शाळेतल्या संतोष मुसळे या शिक्षकाच्या धडपडीमुळे शाळेकडे तब्बल १२०० पुस्तकांचा संग्रह असलेले मुक्त वाचनालय आहे.

गेली १२-१३ वर्षे संतोष मुसळे जि.प. शाळेत सहशिक्षक म्हणून काम करतात. ते स्वत: गरीब घरातून आलेले हुशार विद्यार्थी. क्षमता असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना वैद्यकीय शिक्षण घेता आले नाही. मग त्यांनी शिक्षकी पेशा पत्करला. पण यातही काहीतरी करून दाखवायचे ही जिद्द कायम होती. त्याचमुळे त्यांनी कायमच विद्यार्थ्यांसाठी नवनवे उपक्रम राबवले. संतोषच्या कामाची सुरुवात झाली जालना जिल्ह्य़ातल्या मंठा तालुक्यातील हेलस गावातल्या जि.प. शाळेपासून. या शाळेत त्यांनी अनेक उपक्रम राबवले. लोकसहभागाने ई-लर्निगची गंगा शाळेत आणली. गटसाधना केंद्रात शिक्षक वाचनालयाची स्थापना केली. हे सगळे उपक्रम रंगात असतानाच जून २०१५मध्ये त्यांची बदली झाली गुंडेवाडी शाळेत. ही नवी शाळा छानच होती पण विद्यार्थी वाचत नव्हते. पाठय़पुस्तकाच्या पलीकडचे पुस्तकविश्व त्यांना माहिती नसल्याने विद्यार्थी व्यक्त होण्यात कमी पडत होते. हे चित्र बदलण्यासाठी संतोषनी आपल्यापरीने प्रयत्न करायचे ठरवले. त्यांनी वाचनालय करायचे ठरवले. मुक्त वाचनालय. जिथे विद्यार्थ्यांना कसलेही बंधन नसेल. त्यांना हवी तेव्हा पुस्तके अगदी नि:संकोचपणे नेता येतील. सुरुवातीला संतोषनी स्वखर्चाने पुस्तके आणली. या पुस्तकांमध्ये मजकुरापेक्षा चित्रांचे प्रमाण जास्त होते. त्यात मजेदार गोष्टी होत्या. उपदेशाचे डोस नव्हते. पुस्तके विद्यार्थ्यांना आपलीशी वाटावीत, हा हेतू यामागे होता. याला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. परीक्षा घेणाऱ्या पाठय़पुस्तकांपेक्षा ही नवी पुस्तके वेगळी होती. ती मुक्तपणे वाचण्याची मुभा होती. त्यांच्यावर प्रश्न येणार नव्हते. त्यातल्या व्याख्या कोणी विचारणार नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या पुस्तकपेढीचे आनंदाने स्वागत केले. विद्यार्थ्यांना हे आवडते आहे, असे समजल्यावर संतोष अधिक उत्साहाने कामाला लागले. त्यांनी समाजमाध्यमांवरून आपल्याला पुस्तके पाठवण्याची विनंती केली. त्याला भरभरून प्रतिसादही मिळाला. अगदी प्रकाश आमटेंपासून अनेक व्यक्तींपर्यंत त्यांचा हा उपक्रम पोहोचला. त्यांना भरभरून पुस्तके मिळाली.

संतोष म्हणतात, ‘विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी दिल्या तर ते नक्की वाचतात. अर्थात ते सलग एका जागी बसून वाचत नाहीत, वयाप्रमाणे आधी १५ मिनिटे, मग ३० मिनिटे मग तासभर असे ते पुस्तकात रमतात.’

वाचनालय हा शाळेतला महत्त्वाचा वर्ग. पण बहुतांश शाळात असे दिसते की, इथल्या पुस्तकांशी दोस्ती होण्याऐवजी त्यांची भीतीच वाटते. कारण जडजड सुविचारांनी लगडलेल्या भिंती आणि कपाटांतून पुस्तक शोधायचे. ते वेळेतच परत करायचे, या कठोर दंडकाच्या अमलाखाली कसेबसे वाचायचे.

संतोष सरांचे वाचनालय मात्र मुक्त आहे. इथे विद्यार्थी स्वत:च्या आवडी आणि सवडीनुसार पुस्तके घेतात. मोठे विद्यार्थी त्याची नोंद ठेवतात. मुले स्वत:च्या जबाबदारीवर पुस्तके नेतात आणि चांगल्या स्थितीत आणूनही देतात. या वाचनालयात संतोष स्वत:च्या घरची मासिके, साप्ताहिकेही आणून ठेवतात. त्यांना एकदा दिसले की, त्यातील काही पाने फाटलेली होती. चौकशी केल्यावर कळले, की त्या ठिकाणी छानसा पक्ष्याचा, फुलाचा फोटो होता. त्यामुळे अगदी पहिलीतल्या कुणीतरी तो आवडल्याने सरळ फाडून नेला होता. यावर आपली सर्वसाधारण प्रतिक्रिया रागाचीच असेल, पण संतोष रागावले नाहीत. फाडून नेल्याने का होईना, पुस्तक विद्यार्थ्यांच्या जवळ तर राहील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. लहान मुले असल्याने पुस्तके फाडणारच;  एकदा वाचनाची गोडी लागली की पुस्तकेही आपोआप सांभाळली जातील, हा संतोषचा विचार. आजही एखाद्या विद्यार्थ्यांकडून पुस्तक फाटले तर संतोष कधीही रागवत नाहीत. पण याच विश्वासाला जागून विद्यार्थी पुस्तक जिवापाड जपतात. कुणी शनिवारी अर्ध्या दिवसाची शाळा झाल्यावर पुस्तक नेते तर कुणी मोकळ्या तासाला पुस्तकात रमते. पहिलीतली मुले पहिले ६ महिने फक्त कुतूहलाने या वाचनालयात डोकावतात आणि एकदा छान वाचायला जमू लागले की, मग पुस्तके सोडतच नाही, असा संतोषचा अनुभव आहे.

मुक्त वाचनालयाचा मोठा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये वाचनवेग वाढला. सुरुवातीला वर्गात जरी वाचन घ्यायचे म्हटले तरी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नाराजीच्या रेषा उमटत. अवांतर वाचनामुळे त्यांना ही प्रक्रिया किती छान आहे, हे लक्षात येऊ लागले. अनेक विद्यार्थी आता पुस्तके वाचून व्यक्त होऊ लागले आहेत. पूर्वी फारसे न बोलणारे कुणी आपल्या शब्दांत गोष्ट सांगण्यासाठी हिरिरीने पुढे येऊ लागले आहेत. विद्यार्थ्यांची अभिरुची घडवण्यामध्ये पुस्तके मोठा हातभार लावत आहेत, हेच तर संतोषसारख्या उपक्रमशील शिक्षकाचे ध्येय आहे.

या सगळ्या उपक्रमामध्ये संतोषना  केंद्रीय मुख्याध्यापक बबनराव बोरुडे, मुख्याध्यापक गणेश महाजन, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रा. अर्जुन गजर, नारायण गजर, बबनराव गजर, सहशिक्षक मंगेश जैवाळ, शामल सुरवसे, मंगल धानुरे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात, उपशिक्षणाधिकारी नागेश मापारी आणि अनेक सुहृदांची साथ लाभली आहे.

स्वाती केतकर- पंडित swati.pandit@expressindia.com