• मी बी.कॉम.च्या शेवटच्या वर्षांला आहे. मला मार्केटिंग मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम करायचा आहे. यानंतर मला कोणत्या संधी आहेत? मला व्यवसाय सुरू करायचा आहे. मार्केटिंग किंवा फायनान्सपैकी कोणता विषय उपयुक्त ठरेल?

– प्रदीप अहिरे

तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करू शकता. त्या अंतर्गत मार्केटिंग किंवा फायनान्स यापैकी एक विषय स्पेशलायझेशनसाठी निवडता येईल.  कोणत्याही व्यवसायाचा महत्त्वाचा घटक असतो, मार्केटिंग. त्यामुळे तू या विषयात अभ्यासक्रम केल्यास करिअरच्या चांगल्या संधी मिळू शकतात. वेलिंगकर्स इन्स्टिटय़ूटचा पीजीडीएम हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे. त्याच्या प्रवेशासाठी एमएच-सीईटी ही परीक्षा द्यावी लागेल. त्यात किमान ९८ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पर्सेटाइल प्राप्त करावे लागतील. तुम्हाला स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा आहे, यासाठी मार्केटिंग आणि फायनान्स हे दोन्ही विषय सारखेच महत्त्वाचे आहेत. ज्यामध्ये तुम्हाला अधिक गती आणि रस वाटतो त्या विषयात तुम्ही स्पेशलायझेशन करायला हरकत नाही.

  • मी मेकॅनिकल इंजिनीअर आहे. पण मला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे.

– अक्षय कारंडे

तुम्हाला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे असल्यास चार पद्धतीने करता येईल.

(१) स्टेट बँक ऑफ इंडियाची प्रोबेशनरी ऑफिसर्ससाठी होणारी परीक्षा

(२) आयबीपीएस- इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनद्वारे भारतातील विविध सार्वजनिक बँकांच्या प्रोबेशनरी ऑफिसर्ससाठी घेण्यात येणारी परीक्षा

(३) रिझर्व बँकेच्या अधिकारीपदासाठी घेण्यात येणारी परीक्षा

(४) एमबीए फायनान्स करून आयसीआयसीआय/येस बँक यांसारख्या बँकांमध्ये थेट नियुक्ती

 

  • मी सध्या अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षांला आहे. मला आतापासूनच यूपीएससीची तयारी करायची आहे. त्यासाठी काय करावे, सुरुवातीला कोणती पुस्तके वापरावी?

– अशोक केदार

यूपीएससीच्या तयारीसाठी बारावीपर्यंतच्या बहुतेक सर्व विषयांची एनसीईआरटीने (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग) तयार केलेली पुस्तके अभ्यासल्यास इतिहास, भूगोल, गणित, सामान्य विज्ञान आदी विषयांचा पाया पक्का होऊ  शकतो. त्याचा उपयोग सामान्य अध्ययनाच्या पेपरसाठी होऊ  शकतो. भारत सरकारच्या प्रकाशन विभागाची निर्मिती असलेल्या इंडिया इयर बुकचा अभ्यास करायला हवा. चांगल्या दैनिकांचे वाचन, स्वत:च्या नोंदी काढून ठेवणे, आकाशवाणी व दूरचित्रवाणीवरील वृत्तविषयक कार्यक्रम बघणे आदी गोष्टींवर भर द्यायला हवा. मुख्य परीक्षेत ऐच्छिक विषय कोणता घेणार याचा ठाम निर्णय घेऊन त्याचे दर्जेदार साहित्य वाचायला हवे.

 

  • मी अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आहे. मला विज्ञानाची आवड आहे. त्यातच पुढे शिकायचे आहे, पण मला एमपीएससीसुद्धा द्यायची आहे. मी ती देऊ शकतो काय?

-भूषणकुमार गहूकार, चंद्रपूर</p>

तुम्ही विज्ञान विषयात बी.एस्सी. /एम.एस्सी. या पदवी मिळवल्यास तुम्हाला पर्यायी करिअर करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. शिवाय तुला विज्ञान विषयातच आवड असल्याचे आत्ताच लक्षात आल्याने तुला विज्ञान विषयात चांगली प्रगती करता येणे शक्य आहे. कोणत्याही पदवीधराला एमपीएससी देता येत असल्याने तू बी.एस्सी.ची पदवी घेतल्यानंतर एमपीएससीची परीक्षा देऊ  शकतोस.

 

  • मी बी.एस्सी. (आयटी) ६० टक्के गुणांसह २०१६ साली केले आहे. या क्षेत्रात कोणत्या संधी आहेत?

– विनायक मोरे

बी.एस्सी. आयटी ही पदवी घेतलेल्या उमेदवारांना आयटी सपोर्ट एक्झिक्युटिव्ह, सॉफ्टवेअर डेव्हलपर, टेक्निकल सपोर्टर, अ‍ॅप्लिकेशन प्रोग्रॅमिंग, मेंटेनन्स, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर, डेटा बेस प्रोग्रॅमर, वेबबेस्ड अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, जावा ट्रेनर, ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनीअर, एचटीएमएल डेव्हलपर, वेब डिझायनर, टेक्निकल रायटर अशा संधी उपलब्ध होऊ शकतात. विविध कंपन्यांना अशा उमेदवारांची गरज भासते. तथापि उमेदवाराने आयटीच्या क्षेत्रातील ज्ञान उत्तमरीत्या मिळवलेले असावे, तसेच त्याचा उत्कृष्टरीत्या वापर करता येणे गरजेचे आहे.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.