सीएसआयआर म्हणजे कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल रिसर्चतर्फे शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या संशोधन पुरस्कारांसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.

आवश्यक पात्रता- अर्जदार शालेय विद्यार्थी असावेत व त्यांचे वय १ जानेवारी २०१८ रोजी १८ वर्षांहून कमी असावे.

विशेष सूचना- अर्जदार विद्यार्थ्यांची संशोधन संकल्पना नवी, नावीन्यापूर्ण, उपयुक्त व अंमलबजावणी करण्याजोगी असावी.

अर्ज करण्याची पद्धत- अर्जदार विद्यार्थ्यांनी त्यांच्या संशोधन संकल्पनेचे संपूर्ण विवरण ५००० शब्दांमध्ये लिहून ते आपल्या शाळेच्या प्राचार्यामार्फत पाठविणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया- अर्जदार विद्यार्थ्यांच्या प्रवेशिकांपैकी सुरुवातीला सर्वोत्तम ५० प्रवेशिकांची निवड करण्यात येईल. या निवडक विद्यार्थ्यांना नवी दिल्ली येथे त्यांच्या शिक्षकांसह सीएसआयआरच्या तज्ज्ञांतर्फे प्रशिक्षण देण्यात येऊन त्याआधारे विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात येईल.

पुरस्कारांची संख्या व तपशील- योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे संशोधन पुरस्कार देण्यात येईल.

  • एक लाख रुपयांचा प्रथम सर्वोत्तम पुरस्कार.
  • पन्नास हजार रुपयांचे दोन पुरस्कार.
  • तीस हजार रुपयांचे तीन पुरस्कार.
  • वीस हजार रुपयांचे चार पुरस्कार.
  • दहा हजार रुपयांचे पाच पुरस्कार.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वरील पुरस्कार एका विशेष समारंभात २६ सप्टेंबर २०१८ रोजी देण्यात येईल.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- वरील पुरस्कारांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली सीएसआयआरची शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या संशोधन पुरस्काराची जाहिरात पहावी अथवा सीएसआयआरच्या www.csir.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

प्रवेशिका पाठविण्याची पद्धत व शेवटची तारीख- संपूर्णपणे भरलेल्या प्रवेशिका व संशोधन संकल्पनेचे प्रारूप संबंधित शाळेच्या प्राचार्याच्या माध्यमातून हेड इनोव्हेशन प्रोटेक्शन युनिट सीएसआयआर, एनआयएससीएआयआर संबंधित, १४, सत्संग विहार मार्ग, स्पेशल इन्स्टिटय़ूशनल एरिया, नवी दिल्ली- ११००६७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०१८ आहे.