अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची मान्यता प्राप्त असलेल्या संस्थांमध्ये २०१५-२०१६ या चालू शैक्षणिक सत्रात अभियांत्रिकीच्या पदवी अथवा पदविका अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थिनी व अपंग विद्यार्थ्यांना  नवी दिल्ली येथील राष्ट्रीय तंत्रशिक्षण परिषदेतर्फे विशेष शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासंबंधित अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे.
शिष्यवृत्तीविषयी..
* विद्यार्थिनीसाठी प्रगती योजनेअंतर्गत उपलब्ध असणाऱ्या ४,००० शिष्यवृत्तींसाठी अर्जदार विद्यार्थिनीनी २०१५-१६ या शैक्षणिक सत्रात ‘एआयसीईटी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतील अभियांत्रिकी विषयातील पदवी अथवा पदविका, अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला असावा. त्यांचा शैक्षणिक आलेख उत्तम असावा.
* सक्षम शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत खास अपंग विद्यार्थ्यांना १००० शिष्यवृत्ती देण्यात येणार असून त्याकरता अर्हताप्राप्त  विद्यार्थ्यांनी २०१५-२०१६ या शैक्षणिक सत्रात एआयसीईटी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतील अभियांत्रिकी विषयातील पदवी अथवा पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला असावा तसेच त्यांचा शैक्षणिक आलेख उत्तम असावा.
या सर्व उपलब्ध शिष्यवृत्तींपैकी १५ टक्के शैक्षणिक शिष्यवृत्ती अनुसूचित जातीच्या, ६.५ टक्के शिष्यवृत्ती अनुसूचित जमातीच्या तर २६ टक्के शिष्यवृत्ती इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव स्वरूपात उपलब्ध आहेत.
अर्जदार विद्यार्थ्यांची पात्रता व गुणांच्या टक्केवारीच्या आधारे त्यांची निवड करण्यात येऊन त्यांना संबंधित योजनेअंतर्गत शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात येईल.
अधिक माहिती
योजनेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्यकेशन, नवी दिल्लीच्या दूरध्वनी क्र. ०११- २३६२४१५० वर संपर्क साधावा अथवा कौन्सिलच्या http://www.aicte-india.org  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची मुदत
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २३ नोव्हेंबर २०१५ पर्यंत अर्ज करावेत.