पुढील वर्षी- २०१६ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी राज्य सरकारच्या मुंबई येथील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेतर्फे विशेष मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात येतात. या मार्गदर्शन सत्रांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे.
जागांचा तपशील
या मार्गदर्शन सत्रांसाठी उपलब्ध जागांची संख्या १२० असून यामध्ये अल्पसंख्याक आयोगाद्वारे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणेद्वारा अनुदानित प्रत्येकी १० जागांचा समावेश आहे.

आवश्यक पात्रता
अर्जदार महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असावेत. त्यांनी कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा
अर्जदार सर्वसाधारण गटातील असल्यास १ ऑगस्ट २०१६ रोजी त्यांचे वय ३२ वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम आहे.
निवडपद्धती
अर्जदारांपैकी अर्हताप्राप्त उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही निवड परीक्षा मुंबई येथे २९ नोव्हेंबर २०१५ रोजी घेण्यात येईल.
उमेदवारांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी आणि निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०१६ सत्रासाठी ११ महिने कालावधीसाठी विनामूल्य मार्गदर्शन प्रशिक्षण देण्यात येईल.
अर्जासह भरायचे शुल्क
अर्जासह सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांनी ३०० रुपये (राखीव वर्ग- उमेदवारांसाठी १५० रुपये) रोखीने स्टेट बँक ऑफ इंडिया अथवा सहयोगी बँकेच्या कुठल्याही शाखेत भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती
मार्गदर्शन सत्राच्या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेची जाहिरात पाहावी अथवा  संस्थेच्या http://www.siac.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची मुदत
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ९ ऑक्टोबर २०१५  पर्यंत अर्ज करावेत.