गेल्या दोन लेखांमध्ये आपण संग्रहालय, त्यासंबंधीचे करिअर आणि संधी याची माहिती घेतली. आज आपण आणखी एका करिअरबद्दल चर्चा करणार आहोत. मानव हजारो वर्षांपासून प्राण्यांची शिकार करतो आहे, त्याच्या मृत शरीराची साफसफाई, त्याचे अनेक भाग सुटे करणे. त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, शस्त्र, दागिने, कोरीव काम अशा अनेक उपयोगांसाठी साठवणे, टिकवणे याचे ज्ञान झाले. ते आज एक शास्त्र म्हणून विकसित झाले आहे. संग्रहालयात जेव्हा अनेक प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती आदींच्या संग्रह केला जातो. त्यावेळी त्यांच्या प्रजातीप्रमाणे त्यांची एक माहिती व्हावी, ज्ञान व्हावं आणि अभ्यास करता यावा, यासाठी मांडणी केली जाते. यामुळे सभोवतालच्या नैसर्गिक साधन संपत्तीचे भान यावे आणि आपली सामान्य समज ते शास्त्रीय ज्ञान यातील दरी भरून काढता यावी याकरता संग्रहालय नैसर्गिक साधन संपत्तीचं प्रदर्शन करताना खूप काळजी घेत असते. यामध्ये नैसर्गिक विशिष्ट जीव (प्राणी, पक्षी आदी)मांडताना त्यांच्या विशिष्ट नैसर्गिक निवासस्थान आणि त्याची परिस्थिती यासह ती मांडणी करत असते. ही मांडणी करताना शास्त्रीयदृष्टय़ा अचूक प्रदर्शन करणे गरजेचे असते. इथे चित्रकार, शिल्पकार याचे काम खूप महत्त्वाचे असते. एखादा प्राणी एखाद्या ठिकाणी मांडायचा असेल तर पहिल्यांदा त्याला माऊंट करावे लागते. याचा अर्थ त्याची कातडी स्वच्छ करून ती टिकण्यासाठी त्यावर प्रक्रिया कराव्या लागतात. त्यानंतर मूळ प्राण्याच्या मोजमापानुसार त्याचा सांगाडा निर्माण करून त्यावर ती कातडी चढवावी लागते. हे सर्व करताना तो प्राणी, त्याची बसण्याची किंवा उभं राहण्याची ढब, शरीराचे बारकावे, भाव, डोळे, जीभ, कान, शेपटी यांसह त्या कृतीमध्ये दिसणारी प्रजातीची लक्षणे हे सर्व टिपायचे असते. या तपशिलातच कलाकाराची खरी गरज भासते. हे सर्व काम करणाऱ्या व्यक्तीला टॅक्सिडर्मिस्ट म्हणतात. टॅक्सिडर्मी हा शब्द मूळ ग्रीक शब्द टॅक्सिस आणि देरमी वरून आला आहे. टॅक्सिस म्हणजे हलवणे आणि देरमी म्हणजे स्किन, टॅक्सिडर्मी म्हणजे कातडीची रचना. हे शास्त्र आहे, त्यात कलेचाही तितकाच वापर होतो. हे काम करताना प्राणी, पक्षी, कीटक, मासे किंवा सरपटणारे प्राणी यांचा तपशिलात्मक अभ्यास गरजेचा असतो. एखादा विशिष्ट जीव कोणत्या प्रजातीत आहे, त्याची वैशिष्टय़े कोणती हे लक्षात घेऊन अभ्यास आणि योग्य ते चित्रण करण्याची योजना तयार करावी लागते. उदा. पक्षी असेल तर त्याचे पंख, चोच, रंग, पाय या सगळ्याचा रंग कसा आहे, आकार कसा आहे, वैशिष्टय़ काय आहे, याची माहिती असावी लागते. यात आधी म्हटल्याप्रमाणे नैसर्गिक निवासस्थानाचाही विचार करावा लागतो आहे. चित्रकला आणि शिल्पकलेच्या विद्यार्थ्यांनी जर तपशिलांचा बारीक अभ्यास करून वास्तवाचे चित्रण करण्याची सवय लावली असेल शिवाय ते करताना त्या विशिष्ट प्राण्यासारखा किंवा त्याच्या जवळपास जाणारा प्राणी चितारण्याची सवय असेल तर हे काम करण्यासाठी ही करिअर वाट आहे. वन्यजीवांचा तपशिलात्मक अभ्यास म्हणजे एक ध्यास असतो. लिओनाडरे दा विंची या चित्रकाराने काढलेल्या चित्रातील वनस्पती, फुले हे काल्पनिक नसतात. ती कोणत्या प्रजातीतील आहेत हे एखादा वनस्पती शास्त्रज्ञ सहज सांगू शकतो. याचे कारण म्हणजे लिओनाडरे दा विंचीला त्या प्रजातींसह सर्व माहिती होती, त्यामुळेच तो ते तसेच्या तसे चितारू शकला. वन्य जीवांचे चित्रण हा अनेक चित्रकार, शिल्पकार यांना आकर्षून घेणारा विषय आहे. त्यात अनेकदा शास्त्रीय अभ्यासापेक्षा आकर्षकतेचा भाग असतो. परंतु टॅक्सिडर्मीमध्ये करिअर करायचे झाले तर आकर्षकतेच्या पलीकडे त्यातील शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचा विचार करावा लागतो. यासाठी संग्रहालये आणि संवर्धनाचे शिक्षण तर घ्यावेच लागेल, पण जर टॅक्सिडर्मिस्ट व्हायचे असेल तर त्यासाठी शिक्षण देणाऱ्या संस्था, अभ्यासक्रम आपल्याकडे नाहीत. त्यामुळे संग्रहालयशास्त्रातील पदवी घेऊन त्यानंतर यातील शिक्षण घ्यावे लागेल. हे शास्त्र माहिती असलेल्या व्यक्ती आपल्याकडे कमी आहेत. त्यामुळे अर्थातच करिअरच्या संधी भरपूर आहेत.