किशोरवयीन विद्यार्थ्यांना अभ्यासाखेरीज अनेक समस्या सतावत असतात. त्यांच्यातले शारीरिक बदल, मानसिक आंदोलने या सगळ्याबद्दल त्यांना कुणाशीतरी बोलायचे असते. योग्य महिती हवी असते. नाशिक जिल्ह्य़ातील इगतपुरी तालुक्यातील जि.प. प्रा. शाळा बेलगाव तऱ्हाळे इथल्या विद्यार्थ्यांसाठी अशी व्यक्ती म्हणजे त्यांच्या शिक्षिका ज्योती कदम.

शिक्षकांचा  विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर  एक वेगळा प्रभाव पडत असतो. अनेकदा एखादी गोष्ट इतर कुणी सांगितल्यापेक्षा शिक्षकांनी सांगितली तर ती जास्त पटते. ज्योती कदम या सुजाण शिक्षिकेनेही हेच ओळखले आणि त्याचा अतिशय उत्तम वापर केला.  त्यांच्या शाळेतील किशोरवयीन विद्यार्थ्यांना ज्योतीताईंच्या रुपात एक मार्गदर्शक मैत्रीणच मिळाली आहे.  गेली १३ वर्षे त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या ज्योती  सध्या त्या जि.प. प्रा. शाळा बेलगाव तऱ्हाळे इथे काम करतात. ही शाळा सातवीपर्यंतची आहे. याआधीच्या शाळेमध्ये ज्योती प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना शिकवायचे काम करत असत. या शाळेत आल्यावर त्यांच्याकडे सहावी-सातवीचे वर्ग आले. हळूहळू ज्योतींच्या लक्षात आले की, प्राथमिकच्या वर्गात एकमेकांशी गप्पा मारणारी, हसणारी, खिदळणारी ही मुले सहावी-सातवीत आल्यावर एकदम बदलतात. म्हणजे मुलगे-मुली एकमेकांशी बोलायचेच बंद होतात.  त्यांच्यात एक अघोषित स्पर्धाच जणू निर्माण होते.  बोलणे नाही, त्यामुळे संवाद नाही. संवाद नाही त्यामुळे ओळख नाही आणि  ओळख नसल्याने एकमेकांबद्दल आदर, आपुलकी  नाही. हे चित्र ज्योतींना बदलायचे होते. म्हणूनच त्यांनी ठरवले की, आपण या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधायचा.  या विद्यार्थ्यांना घरातून गरजेच्या गोष्टी मिळत होत्या. शाळेतून शिक्षण मिळत होते, पण शरीरात होणारे बदल, मानसिक आंदोलने या गोष्टींची काहीच माहिती मिळत नव्हती. त्याविषयी बोलायला त्यांच्याकडे कुणी नव्हते. जी माहिती होती, ती अतिशय चुकीची आणि विपरीत मार्गाने येणारी होती.

सगळ्यात प्रथम ज्योती यांनी वर्गातल्या मुलींशी संवाद साधला. अगदी एकत्र डबा खाण्यापासून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली.  मॅडम म्हणजे एक मार्गदर्शक मैत्रीण आहेत, ही खात्री मुलींना वाटू लागली. मग ज्योतींनी त्यांच्या मनातल्या भावभावना, प्रेमभावना, मासिक पाळी, शरीरस्वच्छता, शरीरातील बदल अशा बऱ्याच गोष्टींबद्दल बोलायला सुरुवात केली. सुरुवातीला बुजणाऱ्या, विषय बदलणाऱ्या किंवा फक्त गालातल्या गालात हसणाऱ्या मुलींनी आपली मने मोकळी करायला सुरुवात केली. मग ‘प्रेमभावना वाईट नाही, पण या वयात फक्त अभ्यासाचाच विचार करायचा हं!’ असे बाईंनी सांगितल्यावर मुलींना ते पटू लागले.

वर्गातल्या मुलग्यांशी बोलताना मात्र ज्योतींनी  मुद्दामच थेट विषयाला हात घातला नाही. कारण अशा प्रकारे बोलण्याने कदाचित विद्यार्थ्यांच्या मनातील गुंता वाढला असता किंवा त्याला  वेगळे वळण लागले असते. ज्योतींनी वर्गातील मुलग्यांशी गप्पा मारायला सुरुवात केली.  अभ्यासाबद्दलची भीती, ते मुलगा असल्याने त्यांच्यावर समाजाने लादलेल्या अपेक्षा या सगळ्याबद्दल त्या बोलू लागल्या. विद्यार्थ्यांशी होणाऱ्या गप्पांतून घरी आईला मदत करणे, वर्गातल्या मुलींचा आदर करणे अशा गोष्टी त्यांच्याही नकळत ज्योती त्यांना शिकवू लागल्या. याच वेळी त्यांना मिळाली दिशाह्ण या संस्थेची साथ. या संस्थेने मुलामुलींची मोकळी मैत्री व्हावी, त्यांच्यावर लिंगभेदाचे संस्कार होऊ नये, यासाठी एक प्रकल्प हाती घेतला होता. या प्रकल्पामध्ये ज्योतींची शाळाही होतीच. या उपक्रमांतून ज्योतीच्या प्रयत्नांना एक सकारात्मक साथ मिळणार होती. त्यांनी ‘संवाद किशोर वयाशी’ हा उपक्रम हाती घेतला. घरगुती गप्पांमधून विद्यार्थ्यांच्या मनात शिरून मग हळूहळू त्यांना शारीरिक, मानसिक बदलांची, टप्प्यांची माहिती देणे, असा तो उपक्रम होता. याची सुरुवात  साफसफाईपासून झाली. मुलींच्या बरोबरीने मुलग्यांनाही हातात झाडू देऊन साफसफाई करायला लावली गेली. यामुळे मुलीची कामे नि मुलाची कामे वेगळी नाहीत. कोणतेही काम हीन नाही, ही जाणीव हळूहळू विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली. मुलामुलींचे एकत्रित अभ्यासाचे गट केले गेले. त्यातून एकमेकांकडे केवळ  मुलगा किंवा मुलगी म्हणून न पाहता मित्र म्हणून पाहण्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली.

याचसोबत मॅजिक बससारखा उपक्रमही ज्योतींनी दिशा संस्थेच्या साहाय्याने सुरू केला. त्यात मुलामुलींचे एकत्र खेळ घेतले गेले. याआधी मुले वेगळी आणि मुली वेगळ्या खेळत, त्यामुळे एकमेकांच्या स्पर्शासंबंधी अत्यंत विचित्र गोष्टी मुलांच्या मनात असत. एकत्र खेळू लागल्यामुळे हा भेद गळून पडला. संघभावना जागृत झाली. याच उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रश्नावल्या दिल्या जातात. त्यातून त्यांच्या मनातील भावनांचे कल्लोळ समजून घ्यायला मदत होते. एकमेकांच्या पेहरावाविषयी काय वाटते, काय वाटायला हवे अशा अनेक मुद्दय़ांची चर्चा केली जाते.

याच दरम्यान शाळेमध्ये किशोर-किशोरी मेळावा घेतला गेला. बालआनंद मेळाव्याच्या दरम्यानच हा मेळावा झाला. यामध्ये किशोरवयीन मुला-मुलींमध्ये होणारे बदल, त्यांना गरजेचे असणारे लैंगिक शिक्षण याविषयी अत्यंत शास्त्रीय माहिती दिली गेली, तीही चित्रांच्या स्वरूपात, त्यामुळे ती समजायलाही सोपी गेली. चांगला स्पर्श, वाईट स्पर्श याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली गेली. खरे तर मुलींना याची थोडी फार तरी माहिती घरातून दिली जाते; पण मुलगे मात्र या प्रक्रियेत कुठेच नसतात. त्यामुळे त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा उपक्रम होता.

या सगळ्यामध्ये गावातील अंगणवाडी ताईंची ज्योतींना खूप मदत मिळाली. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांनाही आमंत्रित केले जाते. वयात येणाऱ्या मुलांशी त्यांनी कशा प्रकारे संवाद साधावा, याची माहिती दिली जाते. ज्योती सांगतात, या उपक्रमानंतर अनेक मातांनी त्यांना येऊन सांगितले, ‘‘मॅडम, तुम्ही हा उपक्रम सुरू केलात हे फार चांगले केले. आम्ही आमच्या मुलांशी याबद्दल बोलू शकलो नसतो, पण तुम्ही त्यांना योग्य वाट दाखवत आहात.’’ ज्योतींसाठी ही सगळ्यात मोठी पावती होती.

ज्योती म्हणतात, ‘‘मुलामुलींचा संवाद व्हायला हवा, निखळ मैत्री व्हायला हवी. विद्यार्थ्यांच्या अज्ञानाचा फायदा कुणी घेऊ नये, यासाठी तरी त्यांना शास्त्रीय पद्धतीने ज्ञान मिळालेच पाहिजे.’’ याच दिशेने सुरू असलेल्या त्यांच्या प्रयत्नांना  शुभेच्छा!

स्वाती केतकर पंडित  swati.pandit@expressindia.com