मधुरा राजवंशी यांचा शिक्षक म्हणून प्रवेश थोडासा अपघातानेच झाला. विद्यार्थीदशेमध्ये पुणे विद्यापीठात वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करताना त्यांना डिप्रेशनचा त्रास होऊ लागला. परंतु पालक सजग असल्याने त्या वेळीच यातून बाहेर आल्या. त्यानंतर काही विधायक कार्य करावे, हा विचार करताना आपल्याच शाळेसाठी काम करण्याची कल्पना पुढे आली. मधुरा स्वत: कमला निंबकर बालभवन शाळेच्या विद्यार्थिनी. विद्यार्थ्यांसाठी काही भाषांतरे करणे, शैक्षणिक साहित्य करण्यात मदत करणे, असे काम सुरू झाले. शाळेच्या संस्थापिका आणि शिक्षणतज्ज्ञ मॅक्सीन बर्नसन त्या वेळी इंग्रजीचे तास घेत. त्यांच्यासोबतचे एक शिक्षक शाळा सोडून गेल्यानंतर त्यांनी थेट मधुरानाच इंग्रजीचे तास घेण्याबद्दल विचारणा केली. थोडय़ाशा गडबडलेल्या असूनही मधुरांनी हे आव्हान स्वीकारले. मॅक्सीन मावशींनाही त्यांचे काम आवडले आणि २००८पासून त्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवू लागली. शिक्षिका म्हणून आपली कौशल्ये अधिक विकसित व्हायला हवीत या उद्देशाने मधुरांनी २०१०-१२ या दोन वर्षांत शिक्षणशास्त्राची समज येण्यासाठी टाटा इन्स्टिटय़ूट ऑफसोशल सायन्सेस, मुंबई या संस्थेतून एम.ए. एलिमेंटरी एज्युकेशन हा अभ्यासक्रम केला. या अभ्यासक्रमाने त्यांना कामाची दिशा दाखवली. काय करायला हवे, याची जाण दिली.
कमला निंबकर बालभवन या शाळेत पाठय़पुस्तकाची बंधने नाहीत. केवळ अभ्यासक्रमातील आशय विद्यार्थ्यांना समजायला हवा. त्यामुळे मग शिक्षकांनाही पाठय़पुस्तकापलीकडे जात विद्यार्थ्यांसाठी काही अधिक करण्याची संधी मिळते. मधुरानी या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा ठरवला. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना इंग्रजीही तितकेच उत्तम यायला हवे, हा आग्रह. त्यामुळेच एक भाषा म्हणून त्यांना इंग्रजी कशी आवडेल, ते त्यामध्ये काय काय प्रयोग करू शकतील याचा विचार मधुरा यांनी सुरू केला.
या शाळेत खरोखरच विद्यार्थ्यांच्या कलाने शिक्षण दिले जाते. त्यामुळे एखाद्या दिवशी काय करायचे, ते विद्यार्थी सुचवतात. त्यांच्या ताई म्हणजे शिक्षिका ते नक्की करतात. एकदा विद्यार्थ्यांना प्रकल्प करायला द्यायचे होते. त्यावर त्यांचे गुण अवलंबून असणार होते. एका विद्यार्थ्यांने प्रकल्पासाठी क्रिकेट हा विषय घेतला तर दुसऱ्याने सिनेमाचा विषय घेतला. मधुरानी मग दोघांच्याही प्रकल्पांचा अभ्यास करून त्यावर वेगवेगळे प्रश्न काढले आणि त्यांची परीक्षा घेतली.
कोणतीही भाषा ही तेव्हाच सोपी वाटू लागते जेव्हा ती आपल्या रोजच्या जगण्याचा भाग होते. मग त्यासाठी मदतीला येतात, गाणी गोष्टी. सिनेमा ही विद्यार्थ्यांच्या आवडीची गोष्ट मग मधुरानी मुलांसोबत एक प्रकल्प असा घेतला की ज्यामध्ये प्रसिद्ध सिने संवादांचे इंग्रजीमध्ये भाषांतर करायचे होते. हा प्रकल्प करता करताच आपण पाहिलेल्या सिनेमाची इंग्रजीतून कथा लिहायची, हा नवा प्रकल्पही मिळाला. शांतता हा विषय घेऊन मधुरानी विद्यार्थ्यांसोबत त्याच्याशी संबंधित गाणी शोधली. चित्रेही शोधली आणि मग शाळेतल्या कम्प्युटरवर त्याचा व्हिडीओ विद्यार्थ्यांनी तयार केला. यातून त्यांचे शिक्षण तर झालेच पण धम्मालही आली.
पुस्तकाच्या आवडीतून आपणच गोष्टी लिहायच्या अशी कल्पना पुढे आली. मग माध्यमिकमधल्या विद्यार्थ्यांनी बालवाडीच्या मुलांकरता चित्रमय गोष्टींची पुस्तके लिहावीत असा प्रकल्प तयार झाला. या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांनी कल्पकतेने गोष्टी लिहिल्या, चित्रे काढली. त्याची पुस्तके तयार केली आणि ती बालवाडीच्या मुलांना वाचूनही दाखवली. ही अनोखी भेट दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरली. मधुराताईने विद्यार्थ्यांना एकमेकांच्या पुस्तकांचे परीक्षणही करायला लावले. यातून विद्यार्थ्यांची परीक्षणक्षमता विकसित झाली.
मधुरा कधीही वर्गात आज अमुकइतकी स्पेलिंग पाठ करा, उद्या तमुक असा कंटाळवाणा अभ्यास देत नाहीत. त्या म्हणतात, शब्द पाठ करण्याऐवजी त्यांचा वापर करून वाक्ये लिहिली, छोटेसे परिच्छेद लिहिले तर त्यातून शब्दही पक्के होतात आणि त्यांचा अर्थही. म्हणजे ‘माय संडे’ हा निबंध लिहिताना सहज सिंपल प्रेझेंट टेन्सचा अभ्यास होऊन जातो.
मधुराच्या विद्यार्थ्यांनी केलेला आणखी एक धम्माल प्रकल्प म्हणजे तिकोना रॅप. रॅप गाणी त्यांच्या ठेक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आवडीची होऊन जातात. तिकोना गडावर सहलीला गेलेले असताना काय काय केले, याचे मराठी, हिंदी आणि मुख्यत्वेकरून इंग्रजीतून वर्णन करत विद्यार्थ्यांना ‘तिकोना चढ गए ओए’ हे रॅप गाणे तयार केले. अशाच प्रकारे ट्रेजर हंट या खेळातही मनोरंजक इंग्रजी वाक्यांचा वापर करून खजिन्यापर्यंत जाणारे कोडे विद्यार्थ्यांना तयार करायचे होते. मधुराच्या या शाळेमध्ये मिनी भाजी बाजारही भरतो. एकदा आठवीतल्या विद्यार्थ्यांनी बाग तयार करण्याचा उत्साह दाखवला. मधुरांनी लगेचच त्याला मान्यता देत, बिया, भाज्यांची नावे मराठी-इंग्रजीत लिहायला लावली. तसेच बागेचा नकाशाही विद्यार्थ्यांकडून बनवून घेतला. गार्डन डायरी हा आणखी एक प्रकल्प तयार झाला.
प्रकल्प करताना प्रत्येकवेळी तो अभ्यासविषयकच असेल, असा कधीच आग्रह नसतो. एकदा विद्यार्थ्यांनी ‘स्वप्न’ या विषयावर प्रकल्प करायचा ठरवला. मग त्यासाठी गाणी शोधली. एका ‘अइइअ’ नावाच्या बॅण्डचे ‘आय हॅव अ ड्रीम’ हे गाणे शोधले. मार्टिन ल्यूथर किंग यांचे प्रसिद्ध ‘आय हॅव अ ड्रीम’ हे भाषण शोधले. हा प्रकल्प विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक माहितीपर ठरला.
मधुरा म्हणतात, प्रत्येक इयत्तेत वाचणे, लिहिणे आणि ऐकणे ही कौशल्ये विकसित होण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांवर आम्ही काम करतो. त्यातूनच असे प्रकल्प आकाराला येतात. या सर्वच शिक्षणात महत्त्वाची गोष्ट असते, आपले संतुलित मत तयार करणे आणि ते प्रभावीपणे मांडणे. आपले मत मांडण्याला अत्यंत महत्त्व आलेल्या या काळात ही गोष्ट खूपच गरजेची नाही का?..
swati.pandit@expressindia.com