कृषी घटकाची तथ्यात्मक बाजू हा अर्थव्यवस्था क्षेत्राच्या विश्लेषणाचा महत्त्वाचा भाग आहे हे लक्षात घेऊन अभ्यास करणे आवश्यक आहे.

*  कृषिक्षेत्राची वैशिष्टय़े व महत्त्व –

कृषिक्षेत्राचे भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्व समजून घेण्यासाठी केंद्र व राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून GDP, GNP, रोजगार, आयात-निर्यात यातील कृषिक्षेत्राचा वाटा (टक्केवारी) पाहायला हवा. याबाबत उद्योग व सेवा क्षेत्राशी कृषिक्षेत्राची तुलना लक्षात घ्यावी. कृषी व इतर क्षेत्रांचा आंतरसंबंध पाहताना कृषी आधारित व संलग्न उद्योगांचे स्वरूप, समस्या, कारणे, उपाय, महत्त्व या बाबींचा आढावा घ्यावा.

महत्त्वाच्या पिकांच्या उत्पादनात व उत्पादकतेमध्ये अग्रेसर असलेली पहिली ३ राज्ये व क्रमवारीतील महाराष्ट्राचा क्रमांक तसेच महाराष्ट्रातील प्रमुख पिकांच्या उत्पादनात अग्रेसर असेलेले पहिले ३ जिल्हे, माहीत करून घ्यावेत.

कृषी क्षेत्रासाठी होणारा जमिनीचा वापर लक्षात घ्यायला हवा. एकूण जमिनीपकी शेतीसाठी होणाऱ्या वापराची टक्केवारी, सिंचित क्षेत्राची टक्केवारी व क्षेत्रफळ, कोणत्या पिकासाठी किती जमीन वापरली जाते, त्याची टक्केवारी माहीत हवी.

महत्त्वाच्या पिकांसाठी राज्यातील उत्पादकता कमी/जास्त का आहे, याची कारणे तसेच त्याचे सामाजिक, आर्थिक परिणामही समजून घ्यावेत. त्यावरील विविध उपाययोजना माहीत करून घ्याव्यात. यामध्ये शासकीय योजनांवर भर द्यावा. त्याचप्रमाणे कउअफ, टउअएफ अशा संस्थांचे कार्य समजून घ्यावे या संस्थांची रचना, स्थापना, वर्ष, कार्य, उद्दिष्ट समजून घ्यावे.

कृषी उत्पादकतेमध्ये पशुधन संपत्तीचाही महत्त्वाचा वाटा असतो. पशुधनाच्या संख्येबाबत, टक्केवारीबाबत व उत्पादकतेबाबत अग्रेसर असलेली राज्ये व जिल्हे यांची माहिती असायला हवी. पशुधनाची उत्पादकता वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, धवलक्रांती, रजतक्रांती, गुलाबीक्रांती इत्यादींचा आढावा घ्यायला हवा. यामधील तरतुदी, असल्यास लाभार्थी व त्यांचे निकष, मूल्यमापन इत्यादी पलू लक्षात घ्यावेत. कृषी उत्पादनांच्या निर्यातीबाबत GATT  व  WTO चे महत्त्वाचे करार व त्यातील तरतुदी व संबंधित चालू घडामोडी व्यवस्थित समजून घ्यायला हव्यात. या तरतुदी व घडामोडींचा भारतीय कृषी क्षेत्रावरील व निर्यातीवरील परिणाम समजून घ्यावा. शेतकरी व पदासकारांचे हक्क व त्यांचे स्वरूप व अंमलबजावणी यांचा आढावा घ्यायला हवा.

* कृषी पारंपरिक मुद्दे

वेगवेगळ्या पंचवार्षकि योजनांमध्ये कृषी विकासासाठी ठरविण्यात आलेली धोरणे व योजनांचा थोडक्यात आढावा घ्यावा व त्यांचे यशापयश लक्षात घ्यावे. १०व्या, ११व्या व १२ व्या पंचवार्षकि योजनांमधील कृषीविषयक धोरणे, योजना यांचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक आहे. याचबरोबर ग्रामीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील योजनांचाही आढावा घेणे आवश्यक आहे. यामध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात आलेल्या योजनांचाच विचार करायला हवा.

कृषी उत्पादनांचे वितरण व मूल्यांकन करणाऱ्या संस्थांची माहिती असणे आवश्यक आहे. महत्त्वाच्या पिकांच्या किमान आधारभूत किमती तसेच कृषी उत्पादनांच्या विपणनासाठीच्या व किंमत स्थिरीकरणासाठीच्या शासकीय योजना माहीत असायला हव्यात. साठवणुकीतील समस्या व त्यावरील उपाय यांचाही आढावा घ्यायला हवा. या दृष्टीने सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा आढावा घेणे अवाश्यक आहे. कृषी क्षेत्रासाठी पतपुरवठा उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांचा स्थापना, रचना, कार्ये, उद्दिष्टे इत्यादी बाबींच्या अनुषंगाने आढावा घ्यावा. ग्रामीण कर्जबाजारीपणाचा अभ्यास कारणे, स्वरूप, उपाय व परिणाम या मद्दय़ांच्या अनुषंगाने विचार करायला हवा.

* अन्न व पोषण आहार

भारतातील अन्न उत्पादन व खप यामधील कल समजून घ्यायला हवा. अन्न स्वावलंबन, अन्नसुरक्षा या संकल्पना समजून घ्यायला हव्यात. अन्न सुरक्षा अधिनियम, अन्न सुरक्षिततेमधील समस्या व उपाय, व त्या दृष्टीने अन्नाची आयात व निर्यात या बाबी समजून घ्याव्यात. अन्नाचे कॉलरी मूल्य व त्याची मोजणी, चांगले आरोग्य व समतोल आहार, मानवी शरीरास आवश्यक ऊर्जा व पोषणमूल्य यांचा टेबलमध्ये अभ्यास करता येईल. भारतातील पोषणविषयक समस्या, त्याची कारणे व परिणाम, याबाबतची शासनाची धोरणे, कामासाठी अन्न, दुपारचे भोजन इत्यादी योजना व इतर पोषणविषयक कार्यक्रमांचा उद्दिष्टे, स्वरूप, लाभार्थी अशा मुद्दय़ांच्या आधारे आढावा घ्यावा.