prashasan3मागील दोन लेखांमध्ये आपण यूपीएससीच्या बदललेल्या पूर्वपरीक्षेच्या संरचनेची ओळख करून घेतली. तसेच उताऱ्याचे आकलन व त्यावरील प्रश्न या घटकाबद्दल सविस्तर चर्चा केली. आजच्या लेखामध्ये आपण तार्किक अनुमान आणि विश्लेषणात्मक चाचणी (Logical Reasoning and Analytical Ability) या घटकाचा विचार करणार आहोत.
या घटकामध्ये संपूर्णपणे तर्कशास्त्रावर आधारित तसेच काही गणितीय संकल्पना व तर्कशास्त्र यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. या घटकाचे वैशिष्टय़ म्हणजे- प्रश्नप्रकारांची विविधता. अशा सर्व प्रश्नप्रकारांमधून प्रशासकीय सेवेत आवश्यक असणारी कोणती कौशल्ये तपासली जातात, हा प्रश्न काही जणांना पडू शकतो. परंतु, आपण हे लक्षात घ्यायला हवे की, या सर्व घटकांचे आणि त्यात अंतर्भूत असलेल्या कौशल्यांचे आपल्या निर्णयप्रक्रियेत महत्त्वाचे स्थान आहे. निर्णयप्रकियेमध्ये अशा प्रकारची तार्किक अनुमाने व परिस्थितीचे विश्लेषण करण्याची हातोटी हे कळीचे मुद्दे आहेत. या घटकांतील सर्व प्रश्न प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे उमेदवाराचे हे कौशल्य तपासून बघत असतात, तसेच प्रशासकीय कामांमध्ये अतिशय गरजेची असलेली वस्तुनिष्ठता उमेदवारामध्ये किती प्रमाणात विकसित झाली आहे, हेदेखील बघितले जाते.
या घटकातील प्रश्न व्यक्तीच्या सामाजिक, कार्यालयीन अथवा प्रशासकीय वर्तुळात निर्माण होणाऱ्या दैनंदिन घडामोडींवर व त्यात अंतर्भूत असलेल्या तर्कशास्त्राच्या वापरावर आधारित असतात. ठरावीक शैक्षणिक पाश्र्वभूमी अथवा पात्रतेची हे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यकता नसते. सर्वसामान्यपणे दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या अनेक अडचणींना केवळ  तर्काच्या आधारे व स्पष्ट विचारशक्तीची जोड देऊन प्रश्न सोडवले जाऊ शकतात. अशा प्रकारची कौशल्ये उमेदवाराकडे आहेत की नाहीत हे तपासून बघणारा हा घटक आहे. या घटकामध्ये खालील प्रश्नप्रकारांचा अंतर्भाव असतो –

आकृत्यांमधील समान सूत्र ओळखणे –
या घटकात आकृत्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात. पहिल्या प्रश्नआकृतीत कोणते बदल झाल्यामुळे दुसरी प्रश्नआकृती तयार झाली, याचे निरीक्षण केल्यास दोन प्रश्न आकृत्यांमधील संबंध लक्षात येतो. तिसऱ्या प्रश्नआकृतीत असेच बदल केल्यास, राहिलेली प्रश्नआकृती मिळते.
(१) या घटकातील प्रश्न सोडवत असताना आकृतीचा बाह्याकार तसेच आकृतीमधील इतर बारकावे तपासून बघणे गरजेचे आहे. जसे की, त्रिकोणामधील ठिपके, वर्तुळामधील त्रिकोण अशा प्रकारे बदलत जाणाऱ्या आकृत्यांची बारकाईने नोंद घ्यावी.
(२) आकृत्यांमधील रेषांची संख्या, ठिपक्यांची संख्या, चिन्हांची संख्या यातील बदलांकडे बारकाईने लक्ष द्यावे.
(३) चिन्हांचे बदलणारे स्थान उजवीकडून डावीकडे किंवा डावीकडून उजवीकडे तसेच रेषा, भौमितिक आकार बदलत असताना होणाऱ्या कोनांमधील बदल इत्यादी गोष्टींचे निरीक्षण करावे.
(४) आकृतीची आरशातील प्रतिमा/ पाण्यातील प्रतििबब या प्रश्नांकरता पुरेसा सराव आवश्यक आहे.

Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
Analysis on Environmental Component in Gazetted Civil Services Joint Pre Examination and State Services Pre Examination
Mpsc मंत्र: पर्यावरण घटक
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…

संख्यांमधील समान सूत्र ओळखणे आणि संख्यांमधील क्रम शोधणे
या घटकातील प्रश्नांत पहिले व दुसरे पद यांत कशा प्रकारचा गणिती संबंध आहे, हे शोधून त्याच प्रकारचा गणिती संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांत ठरवायचा असतो. संख्यामालिकेतील घटक लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायांतून शोधायची असते. या प्रकारच्या प्रश्नांमध्ये मालिकेतील अधलीमधली संख्या किंवा सगळ्यात शेवटची संख्या शोधणे अपेक्षित असते. बऱ्याच वेळा शेवटच्या दोन संख्या शोधण्यासाठीचे प्रश्नदेखील विचारले जातात. अचूक पर्याय निवडण्यासाठी सर्व संख्यांच्या क्रमांमधील समान सूत्र शोधणे अपेक्षित आहे. असे करत असताना केवळ दोन किंवा तीन असे संख्याचे गठ्ठे करून संबंध प्रस्थापित करू नयेत. सर्व संख्यांना समान लागू होणारा तर्कसंगत क्रम शोधणे अपेक्षित आहे. हा संबंध बेरीज, वजाबाकी, वर्ग, घन इत्यादी कोणत्याही प्रकारे ठरवलेला असू शकतो. तसेच अपूर्णाकांमध्ये अंशांची तुलना करावी. अशीच तुलना छेदांचीही करावी. बऱ्याच वेळा संख्यांच्या पहिल्या अंकांमधील चढता/उतरता क्रम तपासून तशाच प्रकारे दुसऱ्या/ तिसऱ्या अंकांमध्येही संबंध प्रस्थापित करावेत.

सामग्री जोडणी
( Data Arrangement)
या घटकामध्ये एका ठरावीक परिस्थितीकरता लागू असणाऱ्या काही अटी दिलेल्या असतात. त्या सर्व अटींत बसणारी एक तर्कसंगत जोडणी तयार करून, त्या जोडणीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. बहुतेक वेळा पाच किंवा पाचपेक्षा कमी घटकांसाठी हे प्रश्न तयार केले गेलेले असतात. या पाच घटकांकरता प्रत्येकी दोन किंवा तीन वेगवेगळे निकष लक्षात घेऊन ही तर्कसंगत जोडणी करणे अपेक्षित आहे. जसे की, पाच मुली पाच वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालून पाच वेगवेगळी पुस्तके वाचत आहेत. यामध्ये पाच मुलींची नावे दिलेली असतात व रंग व पुस्तकाचे नाव या इतर दोन निकषांवर जोडणी करणे अपेक्षित असते.
तार्किक अनुमान व विश्लेषणात्मक चाचणी घटकामध्ये जरूर अभ्यास करावेत असे आणखीही काही घटक आहेत. मात्र एक गोष्ट नक्की की, सर्वच उपघटकांसाठी भरपूर सरावाची आवश्यकता आहे. या घटकाच्या सरावासाठी विविध प्रकारचे अभ्याससाहित्य बाजारामध्ये उपलब्ध आहे. मात्र, जे अभ्याससाहित्य यूपीएससीच्या परीक्षापद्धतीला डोळ्यासमोर ठेवून तयार केले गेले आहे, अशाच अभ्याससाहित्याचा
वापर करणे योग्य ठरते. तार्किक अनुमान व विश्लेषणात्मक चाचणी या घटकात अंतर्भूत असलेल्या अजून काही उपघटकांची माहिती व त्यासंबंधीच्या काही बाबी यांचा विचार आपण पुढील लेखात करणार आहोत.
(पूर्वार्ध)