देशाच्या सुरक्षेसंदर्भातील प्रत्येक बाबींसंदर्भात संशोधन आणि विकास करणाऱ्या डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) या संस्थेच्या कार्यपरिघाचा सविस्तर परिचय करून देणारी लेखमाला सुरू
करत आहोत. यात संस्थेचे स्वरूप, कार्यपद्धती, करिअर संधींची ओळख करून देण्यात येईल.
अत्यंत महत्त्वपूर्ण, प्रचंड कार्यपरीघ असलेल्या आणि देशाच्या सुरक्षेसारख्या संवेदनशील विषयाला वाहिलेल्या डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) या संस्थेची आणि त्यांच्या संशोधन कार्याची आपण ओळख करून घेऊ.
भारताच्या सुरक्षा मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या देशाच्या सुरक्षा यंत्रणेबाबतचे संशोधन आणि विकसन यासाठी कार्यरत असलेली ही संस्था १९५८ साली स्थापन झाली. सुरक्षा उत्पादनांची संरचना आणि विकसन यांतील संशोधनाद्वारा भारताच्या सुरक्षा यंत्रणेची स्वयंपूर्णता आणि जागतिक गुणवत्ता टिकवून ठेवणे हे संस्थेच्या स्थापनेमागील प्रमुख उद्दिष्ट राहिले आहे.
संस्थेचे ध्येय आणि उद्दिष्टे
शस्त्रास्त्रनिर्मिती आणि सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करणे,  अत्युत्तम तांत्रिक उपाययोजनांच्या आधारे सन्यबळाची परिणामकारकता वाढवणे आणि सुरक्षा यंत्रणेत गुणवत्तापूर्ण मनुष्यबळाचा विकास करणे ही या संस्थेची उद्दिष्टे आहेत.
या ध्येयपूर्तीसाठी ‘डीआरडीओ’ अनेक शैक्षणिक संस्था, देशांतर्गत संशोधन संस्था, सरकारी संस्था, सेनासामग्री निर्मिती कारखाने यांच्या संयुक्त विद्यमाने काम करते.
‘डीआरडीओ’ द्वारा होणाऱ्या संशोधन आणि विकास कार्यक्रमांतून सुरक्षा तंत्रज्ञानाच्या विविध विषयांचा अंतर्भाव होतो. उदाहरणार्थ- अ‍ॅरोनॉटिक्स, कॉम्बॅट व्हेइकल्स, इलेक्ट्रॉनिक, इन्स्ट्रमेंटेशन इंजिनीअिरग, क्षेपणास्त्र, लाइफ सायन्सेस, सागरी सुरक्षा यंत्रणा इत्यादी.
या सर्व विषयांतर्गत होणाऱ्या संशोधन आणि विकास कार्याची आपण ओळख करून घेऊयात. यावरून संस्थेचा आवाका आणि उपयोजन याची पुरती माहिती मिळू शकेल.

हवाई उड्डाणशास्त्र (अ‍ॅरोनॉटिक्स)
या विषयातील संशोधनासाठी संस्थेची खालील केंद्रे आहेत-
‘डीआरडीओ’ च्या संशोधन आणि विकसन कार्यातील अविभाज्य अंग म्हणजे अ‍ॅरोनॉटिक्स. संस्थेच्या या विभागाची स्थापना १९५९ मध्ये झाली. भारतीय सशस्त्र सेनादलात उपयोगात आणल्या जाणाऱ्या अनेक सुरक्षा यंत्रणा, मानवरहित-मानवचलित लढाऊ विमाने व त्यांची प्रतिरूपके (सिम्युलेटर्स) यांची रचना आणि विकास या विभागातर्फे करण्यात आला.
कार्यक्षेत्र- भारतीय सन्यदलाच्या गरजेनुसार वेळोवेळी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधाराने वेगवेगळ्या प्रकारची लढाऊ विमान यंत्रणा या विभागातर्फे विकसित केली जाते.
मानवरहित लढाऊ विमाने, कमी वेगवान, दूर पल्ल्याची मानवरहित लढाऊ विमान यंत्रणा, वेगवान मानवरहित लढाऊ विमाने (लक्ष्यवेधी, आकाश परिभ्रमण करणारी विमाने- यू.ए.व्ही), लढाऊ विमान यंत्रणा (कॉम्बॅट एअरक्राफ्ट सिस्टीम), मानवरहित हवाई वाहने (मायक्रो एअर व्हेइकल्स), विमान प्रतिरूपके (फ्लाइट सिम्युलेशन), हवाई शस्त्रास्त्रे (एअर वेपन इंटिग्रेशन), हवाई चित्रीकरणाचा उपयोग (एरिअल इमेज एक्सप्लोयटेशन).
या विषयातील संशोधनासाठी संस्थेतील केंद्रे खालीलप्रमाणे आहेत-

सेंटर फॉर एअरबोर्न सिस्टीम्स (सी.ए.बी.एस.)
हवाई निरीक्षणादरम्यानच्या तांत्रिक अडचणी हाताळणे आणि वाजवी दरात, कार्यक्षम निरीक्षण यंत्रणा तयार करणे हे या केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या कार्यप्रणालीवर सतत संशोधन करून गरज लागेल त्यानुसार यंत्रणेत बदल घडवणे किंवा नवीन उत्पादनाचे विकसन करणे यासाठी हा विभाग प्रयत्नशील असतो.

डिफेन्स एव्हिऑनिक्स रिसर्च एस्टॅब्लिशमेंट (डी.ए.आर.ई.)
भारतीय सन्यदलातील वायुसेनेची (एअर फोर्स) कार्यक्षमता, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वृिद्धगत करण्याच्या उद्देशाने या प्रयोगशाळेची स्थापना १९८६ साली बंगळुरू येथे झाली. ही संस्था प्रामुख्याने, इलेक्ट्रॉनिक वारफेअर िवग आणि मिशन एव्हिऑनिक्स िवग या दोन शाखांद्वारे कार्यरत असते.

गॅस टर्बाइन रिसर्च एस्टॅब्लिशमेंट (जी.टी.आर.ई.)
देशाच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या अनेक अग्रणी संशोधन विकास संस्थांपकी एक म्हणून ही संस्था गणली जाते. सेनादलांतील सामुद्री, हवाई सुरक्षा यंत्रणेत आवश्यक असलेली गॅस टर्बाइन इंजिनांचे डिझाइन (रचना आरेखन) आणि त्यांचे विकसन हे यामागील प्रमुख उद्दिष्ट आहे. संस्थेच्या या शाखेत सुमारे १२०० विविध अभ्यासशाखांतील प्रशिक्षित व्यक्ती कार्यरत आहेत (एरोनॉटिक्स, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक, कॉम्प्युटर सायन्स, मटेरिअल सायन्स, अप्लाइड मॅथेमॅटिक्स).
(भाग पहिला)