महेंद्र दामले

आपण हे संपूर्ण वर्षभर फाइन आर्ट्सचे शिक्षण म्हणजे काय, त्याच्या शाखा कोणत्या, त्यांचा अर्थ काय याचा अनेक अंगांनी विचार करायचा प्रयत्न केला. त्यांच्याशी संबंधित असलेल्या अनेक शंकांचे निरसन आणि त्याच्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. हे करताना फाइन आर्ट्सचे शिक्षण, त्याच्याशी संबंधित पारंपरिक शाखा, त्यांच्याशी संबंधित परंतु आत्तापर्यंत उपलब्ध नसलेल्या शाखा यांचीही चर्चा केली. या नवीन शाखांशी संबंधित शिक्षण आणि करिअर या दोन्ही गोष्टींबाबत आपली भूमिका, मानसिकता कशी हवी याबद्दल चर्चा केली. या सगळ्या चर्चेचा वर्षांअखेर विचार करताना काही मुद्दे येतात.

त्यातील पहिला मुद्दा जो पालक आणि विद्यार्थी यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, तो असा की फाइन आर्ट्सच्या शिक्षणाच्या परंपरागत पद्धती, स्वरूप आता हळूहळू कालबाह्य़ होत चालले आहे. पण म्हणजे त्याचा अर्थ कालबाह्य़ झाला असे नव्हे. एकेकाळी व्यक्तीला समोर बसवून तिचे चित्र बनवणे किंवा शिल्प बनवणे याला कला मानले जायचे. या चित्रांचा अर्थ हा त्याच्या उपयोजनेवर ठरला होता. आज आपण सारेच स्वत:चे अनेक फोटो काढत असतो. त्यामुळे असे चित्र काढण्याचे औपचारिक स्वरूप सोडल्यास त्याचे प्रयोजन आता फारसे राहिलेले नाही. त्यामुळेच तशी व्यक्तींची चित्रे काढणे, याचा कला जगतात त्या व्यक्तीबद्दल काही सांगायचे असेल तर कला म्हणून विचार होतो. त्यामुळे अशी चित्रे काढणे हे केवळ एक कौशल्य राहिले आहे. त्यामुळे शिक्षण घेताना त्याकडे केवळ कलेचे शिक्षण म्हणून न बघता, एका तंत्राचे शिक्षण म्हणून पाहिले पाहिजे. तेही एक कौशल्य म्हणून शिकणे गरजेचे आहे. अशा प्रकारची वैचारिक स्पष्टता आपण बाळगली पाहिजे. याचे कारण म्हणजे राजकीय, आर्थिक, सामाजिक स्थित्यंतरे होऊन समाजातील संपूर्ण मूल्य व्यवस्था, त्याच्याशी संबंधित वस्तूनिर्मिती आणि दृश्यभाषाही बदलली असे फार अपवादाने घडले आहे. परिणामत: एका पारंपरिक स्वरूपाच्या कलेचा अर्थ किंवा अर्थहीन होणे किंवा अर्थहीन होण्याची प्रक्रिया स्पष्ट स्वरूपात समजणे शक्य होत नाही. ज्यामुळे फाइन आर्टच्या शिक्षणाबद्दल निर्णय घेताना आपली मानसिकता बदलणे शक्य होत नाही. अगदी पूर्वीपासूनच आपला समाज फाइन आर्ट्सचे शिक्षण आणि पैसे न कमावता येणे, या गोष्टींना जोडत आला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे समाजात उपयोजन असणारे चित्र प्रकार मर्यादित असल्याने पैसे कमावण्याच्या संधी कमी असणे, हे वास्तव होते. पण आज काळ बदलला आहे. फाइन आर्ट्समधील अनेक शाखांमध्ये आता कौशल्य शिकताना त्यामुळे होणारे वैचारिक बदल, त्यामागील मेंदूच्या प्रक्रिया, त्या बदलांमुळे कलेकडे एक भाषा म्हणून पाहणे विचार करणे, यातील होणारा बदल अशा अनेक अंगांनी फाइन आर्ट्सच्या शिक्षणाचा अर्थ बदलला आहे. परिणामी या शिक्षणाकडे डिझाइन, व्यवस्थापन, क्रिएटिव्हिटी थेरपी अशा अनेक अंगांनी पाहिले जाऊ शकते. त्यामुळे त्याच्या करिअर शक्यताही अधिक आहेत.

फाइन आर्ट्सचे शिक्षण घेताना पुढील काही गोष्टी स्पष्ट समोर ठेवल्या पाहिजेत.

१)  हे शिक्षण कौशल्य आणि विचार करण्याची क्षमता या दोन्हीचं आहे.

२) यातील करिअर संधी दोन प्रकारच्या आहेत-

अ) त्यातील कौशल्यांचा वापर करून पैसे  कमावणे

ब)  त्यातील वैचारिक क्षमतेवर आधारित संधी मिळणे

३) या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर टिपिकल कलाकार या मानसिकतेतून बाहेर यायला हवे आणि आपल्या क्षमता, कौशल्य यांकडे वस्तूनिष्ठपणे पाहून त्यांच्या उपयोजनाच्या संधींची क्षेत्रे पाहायला हवीत. त्याचा सहसंबंध कळणे, ही महत्त्वाची गोष्ट आहे.

४) त्याच अर्थी फाइन आर्ट्सचे पदवी शिक्षण झाल्यानंतर त्यासंबंधात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यास करिअरला अधिक चांगला आकार देता येतो.

५) केवळ नोकरी आणि शिक्षण असा संबंध लावणे, या क्षेत्रात शक्य नाही. त्यापेक्षा काही नवनिर्मिती, निर्मिती व्यवस्था आणि त्याआधारे अर्थार्जन किंवा करिअर शक्य होते.

या गोष्टी लक्षात ठेवल्यास फाइन आर्ट्सचे शिक्षण घेऊन एक यशस्वी करिअर करता येते.