केंद्र सरकारद्वारा संचालित सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरीज नॉटिकल अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग ट्रेनिंग, कोची येथे उपलब्ध असणाऱ्या बॅचलर ऑफ फिशरी सायन्स (नॉटिकल सायन्स) या विशेष अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
उपलब्ध जागा
या अभ्यासक्रमासाठी उपलब्ध असणाऱ्या एकूण जागांची संख्या २० आहे.
अभ्यासक्रमाचा कालावधी
या अभ्यासक्रमाचा एकूण कालावधी ४ वर्षांचा असून, त्यामध्ये ८ सहामाही शैक्षणिक सत्र व प्रत्यक्ष मत्स्यपालनविषयक सराव सत्रांचा समावेश आहे.
शैक्षणिक अर्हता
उमेदवारांनी १० अधिक दोन शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा इंग्रजी व गणित हे विषय घेऊन व ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी अथवा ते या विषयांसह बारावीच्या परीक्षेला बसलेले असावेत. वरील पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी राखीव गटातील उमेदवारांसाठी शिथिलक्षम आहे.
वयोमर्यादा
अर्जदारांचे वय १ ऑक्टोबर २०१५ रोजी १६ ते २० वर्षांच्या दरम्यान असावे.
निवड पद्धती
अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा ६ जून २०१५ रोजी कोची, चेन्नई व विशाखापट्टणम या परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल.
अर्जदारांची बारावीच्या परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना १४ जुलै २०१५ रोजी मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांना २० जुलै २०१५ रोजी मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांना अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यात येईल.
करिअर संधी
बॅचलर ऑफ फिशरी सायन्स (नॉटिकल सायन्स) हा पदवी अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना मत्स्योद्योग, मत्स्यपालन केंद्र, मच्छीमार सोसायटय़ा, सहकारी संस्था, मत्स्यप्रक्रिया क्षेत्रात काम करणाऱ्या सरकारी व खासगी संस्थांमध्ये काम करण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
अर्जासाठी पाठवायचे शुल्क
अर्जासाठी पाठवायचे शुल्क म्हणून सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांनी ५०० रु.चा (राखीव गटातील अर्जदारांनी २५० रु.चा) सीनिअर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, सीआयएफएनईटी यांच्या नावे असणारा व एर्नाकुलम येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्ज व स्वत:चे नाव आणि पत्ता लिहिलेल्या विनंती अर्जासह इन्स्टिटय़ूटच्या कार्यालयात पाठविणे आवश्यक आहे.
अधिक माहिती
अभ्यासक्रमाच्या संदर्भात तपशिलासाठी सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरीज नॉटिकल अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग ट्रेनिंगच्या  http://www.cifnet.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याची मुदत
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज डायरेक्टर, सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरीज नॉटिकल अँड इंजिनीअरिंग ट्रेनिंग, फाइन आर्ट्स एव्हेन्यू कोच्ची ६८२०१६ (केरळ) या पत्त्यावर १५ मे २०१५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.