केंब्रिज विद्यापीठातर्फे दरवर्षी भारतीय विद्यार्थ्यांना गणित विषयात संशोधन शिष्यवृत्ती देण्यात येते. त्याविषयीची माहिती..
केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये गणितात असामान्य संशोधन करून अल्पावधीतच जगभर प्रसिद्धी मिळवलेले थोर भारतीय गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आणि त्यांचे व ट्रिनिटी कॉलेजचे असलेले गहिरे संबंध अधोरेखित करण्यासाठी त्यांच्या नावाने फक्त भारतीय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी केंब्रिजमध्ये गणितातील संशोधन शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी केंब्रिज विद्यापीठाकडून यंदा १५ जानेवारी २०१४ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
शिष्यवृत्तीबद्दल..
मूलभूत गणित किंवा उपयोजित गणितात व्यापक संशोधन व्हावे, या हेतूने भारतीय विद्यार्थ्यांना पीएच.डी. पूर्ण करण्यासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते. रामानुजन शिष्यवृत्तीचा एकूण कालावधी तीन वर्षांचा असून या कालावधीतच विद्यार्थ्यांला त्याचे पीएच.डी.चे संशोधन पूर्ण करावयाचे आहे. या शिष्यवृत्तीअंतर्गत विद्यार्थ्यांला विद्यापीठाचे शिकवणी शुल्क, भारतातून येण्याजाण्याचा संपूर्ण विमानप्रवास, निवासासहित इतर खर्च व मासिक भत्ता इत्यादी लाभ मिळणार आहेत. शिष्यवृत्तीचा एकूण वार्षकि भत्ता १३ हजार युरोएवढा असून विद्यार्थ्यांला त्यामध्ये त्याचा विमानप्रवास, निवासासहित इतर खर्च व त्याला तिथे घ्याव्या लागणाऱ्या नऊ महिन्यांच्या अतिरिक्त अभ्यासक्रमाच्या फीचा समावेश आहे. अर्थातच, शिष्यवृत्तीधारकाच्या या अभ्यासक्रमाच्या गुणवत्तेवरच त्याची शिष्यवृत्ती पुढील वर्षांसाठी सुरू राहील.
आवश्यक अर्हता : ही शिष्यवृत्ती फक्त भारतीय विद्यार्थ्यांसाठीच खुली आहे. भारतातील कोणत्याही विद्यापीठातील किंवा समकक्ष दर्जाच्या संस्थेतून गणितातील पदवी अथवा पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रथमश्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांला या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येईल. अर्जदाराला अगोदरच केंब्रिज विद्यापीठात किंवा विद्यापीठाशी संलग्न कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश मिळालेला असू नये. अर्जदाराची शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्यावर त्याला  पीएच.डी. अभ्यासक्रम सुरू करण्याअगोदर नऊ महिन्यांचा पदव्युत्तर दर्जाचा ‘मास्टर ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड स्टडी इन मॅथेमॅटिक्स’ हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. या अभ्यासक्रमाच्या गुणवत्तेवरच विद्यार्थ्यांला ही शिष्यवृत्ती त्याच्या पीएच.डी.च्या पुढील वर्षांसाठी सुरू ठेवता येईल. इतर अर्हतांमध्ये मग विद्यार्थ्यांची शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय
उत्तम असावी आणि त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच त्याने टोफेल अथवा आयईएलटीएस या इंग्रजी भाषेच्या दोन्हींपकी एका परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया :  रामानुजन शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून ट्रिनिटी कॉलेजच्या खाली दिलेल्या वेबसाइटवर जमा करावा. ज्या विद्यार्थ्यांना प्रक्रियेद्वारे अर्ज पाठवता येणार नाही, ते अर्ज आंतरराष्ट्रीय कुरिअर किंवा पोस्टानेदेखील पाठवू शकतात. शिष्यवृत्तीच्या या अर्जप्रक्रियेमध्ये एकूण दोन भाग आहेत. पहिला भाग अर्जदाराने पूर्ण करावयाचा आहे, तर दुसरा भाग त्याच्या तज्ज्ञ प्राध्यापक किंवा संशोधन मार्गदर्शकाने. अर्ज पूर्ण करून वेळेअगोदर पाठवणे आवश्यक आहे. त्यामध्ये मग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक किंवा संशोधन पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापक किंवा तज्ज्ञांची शिफारसपत्रे हीसुद्धा वेळेत येणे अपेक्षित आहे. अर्जाबरोबर विद्यार्थ्यांने त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीबद्दल विस्तृतपणे माहिती देणारा त्याचा सी.व्ही., विद्यार्थ्यांला या शिष्यवृत्तीला का अर्ज करावासा वाटतो हे थोडक्यात सांगणारे एस.ओ.पी., आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्सच्या अधिकृत विद्यापीठीय प्रती इत्यादी कागदपत्रेदेखील जोडावीत.
निवड प्रक्रिया : शिष्यवृत्तीच्या निवडीची संपूर्ण प्रक्रिया गुणवत्तेवर आधारित असून अर्जदारांना त्यांच्या निवडीबद्दल मार्च किंवा मेपर्यंत कळवले जाईल.
अंतिम मुदत : या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ जानेवारी २०१४ आहे.
महत्त्वाचा दुवा : http://www.trin.cam.ac.uk                
 itsprathamesh@gmail.com