मुलाखतीचा सराव

मागील काही लेखांमध्ये मुलाखत तयारीशी निगडित विविध पलूंविषयी आपण चर्चा केली.

मागील काही लेखांमध्ये मुलाखत तयारीशी निगडित विविध पलूंविषयी आपण चर्चा केली. तयारी करताना मुलाखतीशी निगडित अनेक महत्त्वाच्या बाबी आपण अभ्यासतो, वाचतो किंवा ऐकतो, पण अभ्यासाला प्रत्यक्ष सरावाची जोड मिळाली नाही तर सहज-स्वाभाविक प्रकारे मुलाखतीला सामोरे जाणे सोपे ठरत नाही. म्हणूनच मुलाखतीच्या तयारीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मुलाखतीचा सराव अर्थात ‘मॉक इंटरव्ह्य़ू’.
सध्या विविध शिकवणी वर्गामध्ये सराव मुलाखती आयोजित केल्या जातात. अशा ठिकाणी सराव मुलाखती जरूर द्याव्यात. मुलाखतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी मित्रांसमवेत मुलाखतीची तयारी करायला हवी. सरावासाठी मित्रांचा गट तयार करा. एक जण मुलाखत पॅनल अध्यक्षाची भूमिका बजावेल. दोघे-तिघे मुलाखत पॅनल सदस्याच्या भूमिकेत असतील. परस्परांमधील ‘मत्री’ थोडा वेळ बाजूला ठेवून तटस्थपणे मुलाखत घ्या आणि मुलाखत द्या. प्रत्येक लहानसहान बाबींकडे लक्ष द्या. आपल्याकडून घडलेल्या चुकीची अथवा त्रुटीची नोंद करा. प्रत्यक्ष मुलाखत सुरू आहे, अशा मानून गांभीर्याने सराव करा. प्रत्येकाने आपापली भूमिका चोखपणे पार पाडायचा प्रयत्न करा.
सराव मुलाखतीनंतर सर्वानी एकत्र बसून चर्चा करा. प्रत्येक लहानसहान गोष्टीचे विश्लेषण करा. मुलाखत पॅनल सदस्यांना उमेदवारांकडून ज्या अपेक्षा असतात, त्या अपेक्षांची पूर्ती उमेदवाराकडून होते का हे तपासा. उमेदवाराची देहबोली कशी आहे, त्याचा पेहराव कसा आहे, कोणत्या रंगाचा पेहराव केल्याने व्यक्तिमत्त्व उठावदार दिसेल याचा विचार करा. नजरानजर (Eye contact), चच्रेदरम्यान राखावा लागणारा आवाजाचा पोत, संवादकौशल्य यांत कोणत्या सुधारणांची गरज आहे, याबाबत निरीक्षण करा. सराव मुलाखतीदरम्यान तुम्ही कसे वागता, बोलताना दबाव जाणवतो की तुम्ही सहज या वातावरणाशी एकरूप होता का, उत्तर देता न आलेल्या स्थितीत तुमची देहबोली कशी असते, मुलाखत कक्षात आत येताना किंवा मुलाखत संपल्यानंतर कक्षाबाहेर जातानाची देहबोली कशी असते, अशा सर्व बारीकसारीक बाबी तपासाव्यात. सराव मुलाखतींचे रेकॉर्डिग करून तपासल्यास त्याचा बराच फायदा होतो. विविध शिकवणी वर्गामध्ये सराव मुलाखतींच्या रेकॉìडगचीसुद्धा सोय असते. याचा फायदा घ्यावा. वेगवेगळ्या पॅॅनेलसमोर सलगपणे सराव मुलाखती द्याव्यात.
सराव मुलाखतींमुळे उमेदवारांच्या मनातील भीती कमी होते. व्यक्तिमत्त्वातील उणिवांची जाणीव होते. त्यावर मात करायला वेळ मिळतो. अशा सरावामुळे प्रत्यक्ष मुलाखतीस सामोरे जाणे सोपे ठरते, आत्मविश्वास वाढतो. म्हणून सराव मुलाखती गांभीर्याने द्यायला हव्या.
० पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मुख्य परीक्षेचा विचार करू, मुख्य परीक्षेनंतर मुलाखतीचे बघू, असे नियोजन गांभीर्याने परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवाराचे असू शकत नाही. स्पर्धा परीक्षांद्वारे शासकीय सेवांमध्ये करिअर करायचे ठरवले असेल तर, अभ्यास व तयारीही आपली जीवनशैली बनायला हवी.
० व्यक्तिमत्त्वाचे सुयोग्य पोषण होणे आवश्यक असते, त्यासाठी दर्जेदार पुस्तकांचे वाचन, चांगल्या विचारांचे श्रवण, वैज्ञानिक, तौलनिक दृष्टिकोनातून विचार करण्याची सवय, मुद्दय़ानुसार लिहिण्या-बोलण्याची सवय, यासाठी प्रामाणिक प्रयत्न
केले पाहिजेत.
० उमेदवाराचा नम्रपणा व त्यामागची सच्चाई ही खरी भूषणे आहेत.
लक्षात ठेवा, ‘You could be wrong if you are politically right, but you are always right if you are socially right’ तेव्हा खोटी उत्तरे देण्याचे नेहमी टाळावे.
० एखादी विशिष्ट बाब उचलून धरत तिला ताíकक आधार देता आला तर तुमच्या सादरीकरणात भरच पडते, पण त्या भरात राजकीय वा कोणत्याही व्यक्तीबाबत, सरकारच्या धोरणाबाबत टीका करू नये. राजकीय घडोमोडींबाबत जागरूक असणे आवश्यक असले तरी उघडउघड एखाद्या राजकीय पक्षाची बाजू घेऊन किंवा विरोधात अजिबात बोलू नये. हे लक्षात घ्या की, भारतीय नागरी सेवेतील अधिकारी त्याचे राजकीय मत सार्वजनिकरीत्या मांडू शकत नाहीत.
० मुलाखत चालू असताना स्वत:च्या कामगिरीबाबत विचार करायला सुरू करूनका. तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील तरी तुम्ही ‘हरला’ आहात असा त्याचा अर्थ होत नाही. आयोग संवेदनशील, जबाबदार व व्यवहारी तरुणांच्या शोधात आहे. ज्याअर्थी तुम्ही इथवर पोचला आहात त्याअर्थी तुमच्यामध्ये ती बुद्धिमत्ता असणार हे मंडळालाही माहीत असते. तेव्हा धीर सोडू नका.
० तुमच्या यापूर्वीच्या क्षेत्रातील यशाबाबत, सन्मानाबाबत बोलताना नम्र राहावे. भरभरून बोलत राहू नये.
० मंडळाच्या सदस्यांकडून तुमच्या दृष्टीने चांगल्या असलेल्या उत्तराबाबत प्रतिक्रियेची अपेक्षा करू नका. तुमच्या चांगल्या-वाईट उत्तराबाबतच्या तुमच्या मन:स्थितीचे प्रदर्शन तुमच्या देहबोलीतून मांडू नका.
० मुलाखतीदरम्यान फोन वाजला अथवा सदस्य ये-जा करत असतील तर तुमच्या चेहऱ्यावर नापसंती दर्शवू नका. तिकडे लक्ष देऊन बोलण्यात खंड पडू देऊ नका. तुमचे म्हणणे समोरच्यापर्यंत नीट पोचणार नाही इतका जास्त व्यत्यय असेल तर पॉज घ्यायला हरकत नाही, पण व्यत्यय आणणाऱ्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका.
० मंडळ सदस्य हसले तरी तुम्ही मोठय़ाने हसण्याऐवजी चेहऱ्यावर फक्त स्मित ठेवावे. यातून तुमचे वेगळेपण व व्यक्तिमत्त्वाची खोली जाणवते.
पूर्व आणि मुख्य परीक्षेत तयारी करून आपण मनासारखी कामगिरी बजावू शकतो, एखादे उत्तर लिहू शकतो, खोडू शकतो, परत लिहू शकतो, मुलाखतीत मात्र ‘री-टेक’ नसतो. समोर बसलेले पॅनेल त्यांचा ‘मूड’ आणि आपली ‘वेळ’ यांची उभी-आडवी बेरीज-वजाबाकी म्हणजे आपली मुलाखत.
तुम्ही मुलाखत कक्षातून बाहेर आलात की एक स्वप्न, एका ध्येयाची सोबत घेऊन प्रयत्नांच्या वाटेवर चालत चालत आज पूर्व- मूख्य- मुलाखतीचे वर्तुळ पूर्ण करता. या क्षणी यशापयशाचं ओझं मनावर घेऊन येऊ नका. प्रयत्नांच्या वाटेवर चालताना तुम्ही तुमचे कर्तव्य बजावले आहे. जे तुमच्या हातात होते ते तुम्ही केले आहे.
ही वाट नवी नाही. अगम्य, अशक्य तर नक्कीच नाही, तुम्ही तुमची पावले चाला, नवी वाट, नवा इतिहास निर्माण करा. आम्हाला वाटतं तुम्ही हे करू शकता. स्वत:च्या क्षमतांवर विश्वास ठेवा. शुभेच्छा!

– फारुक नाईकवाडे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: How to practice of interview