आजच्या लेखात, आपण १८व्या शतकाची सुरुवात ते १८५७पर्यंतचा कालखंड या विषयाची पूर्व परीक्षेसाठी तयारी कशी करावी याची चर्चा करणार आहोत. या विषयावर २०११ ते २०१७ मध्ये एकूण ६ प्रश्न विचारण्यात आले होते. पूर्व परीक्षेमध्ये १८व्या शतकाची सुरुवात ते १८५७ पर्यंतचा कालखंड यावर साधारणत: कमी प्रश्न विचारले जातात. प्रश्नांचा कल हा संकीर्ण माहितीच्या अनुषंगाने अधिक असतो.

  • या घटकाचे स्वरूप व अभ्यासाचे नियोजन

या कालखंडाअंतर्गत आपणाला युरोपियनांचे आगमन आणि ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना, ब्रिटिश सत्तेचा भारतावरील परिणाम, ब्रिटिशांची प्रशासकीय रचना आणि धोरणे, ब्रिटिश सत्तेच्या विरोधातील बंड आणि उठाव, १९व्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी, शिक्षण आणि वृतपत्रे व ब्रिटिशकालीन घटनात्मक विकास इत्यादी महत्त्वपूर्ण घडामोडींची माहिती अभ्यासावी लागणार आहे. या कालखंडाची तीन महत्त्वाची वैशिष्टय़े होती, यातील पहिले वैशिष्टय़ म्हणजे १८व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच मुघल सत्तेच्या ऱ्हासाला सुरुवात झालेली होती, दुसरे वैशिष्टय़, भारताच्या विविध प्रदेशांत प्रादेशिक देशी सत्ता उदयाला आलेल्या होत्या. (या सत्तांचे वर्गीकरण साधारणत: तीन प्रकारांत केले जाते- मुघलसाम्राज्यात कार्यरत असणाऱ्या प्रांतीय सुभेदारांनी स्थापन केलेल्या सत्ता – बंगाल, अवध, हैद्राबाद; मुघल साम्राज्याच्या विरोधात उठाव करून स्थापन झालेल्या सत्ता – मराठे, शीख, जाट व अफगाण आणि स्वतंत्ररीत्या स्थापन झालेल्या सत्ता – म्हैसूर, राजपूत आणि केरळ) आणि तिसरे वैशिष्टय़ भारतात व्यापार करण्यासाठी आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतातील विविध प्रांतांत अस्तित्वात असणाऱ्या प्रादेशिक सत्तांच्या अंतर्गत तसेच एकमेकांत असणाऱ्या संघर्षांचा फायदा घेऊन स्वत:ला एका राजकीय प्रतिस्पध्र्याच्या भूमिकेत स्थापन केलेले होते. त्यानंतर सर्व प्रादेशिक देशी सत्तांचा निर्णायक पराभव करून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपले अधिराज्य मान्य करण्यास भाग पाडले. संपूर्ण भारतभर स्वत:चा राजकीय अंमल प्रस्थापित केला.

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
NCERT tweaks Class 12th History book: Harappans indigenous, doubts over Aryan migration
एनसीईआरटी अभ्यासक्रमात बदल; ‘आता आर्य भारतातलेच’, काय सांगते नवे संशोधन?
how to choose healthy breakfast health expert told
७० टक्क्यांपेक्षा जास्त भारतीयांच्या नाश्त्यात पौष्टिकतेचा अभाव; पौष्टिक नाश्ता कसा निवडावा? आहारतज्ज्ञ सांगतात…
shree ram mandir
१२वीच्या पुस्तकातून बाबरी पतनाचा उल्लेख गायब…

आपल्याला १७५७ च्या प्लासीच्या लढाईपासून ब्रिटिश गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल याच्याविषयी त्यांनी केलेली युद्धे याचबरोबर, त्यांच्याद्वारे राबविण्यात आलेली सामाजिक आणि आíथक तसेच प्रशासकीय धोरणे आणि या धोरणांचा भारतीयांवर झालेला परिणाम आणि याला भारतीयांनी दिलेला प्रतिसाद याचा अभ्यास करावा लागणार आहे. यामध्ये ब्रिटिश सत्तेच्या विरोधातील बंड आणि उठाव, प्रबोधनपर्वाला झालेली सुरुवात आणि याच्या परिणामस्वरूप सुरू झालेल्या सामाजिक आणि धार्मिक चळवळी व या चळवळीचा भारतीयांवर झालेला परिणाम, याच्या जोडीला शिक्षण आणि वर्तमानपत्रे यांची जनजागृती निर्माण करण्यामध्ये असलेली निर्णायक भूमिका यांचाही अभ्यास करावा लागेल. तसेच १७७२ च्या रेग्युलेटिंग कायद्यापासून ब्रिटिश संसदेने पारित केलेले कायदे व त्यातील तरतुदी, ज्याला आपण ब्रिटिशकालीन घटनात्मक विकास म्हणून पाहतो इत्यादींशी संबंधित मूलभूत माहिती सर्वप्रथम अभ्यासावी लागणार आहे. परिणामी, या विषयाचे व्यापक आणि परीक्षाभिमुख आकलन करणे अधिक सुलभ होऊ शकते.

  • गतवर्षीय परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न व त्यांचे स्वरूप –

२०११मध्ये, लॉर्ड कॉर्नवालीसने १७९३ ला सुरू केलेल्या जमीन समझोता पद्धतीमुळे खटल्यामध्ये अधिक वाढ झालेली होती. याचे महत्त्वाचे कारण काय होते, असा प्रश्न विचारलेला होता. त्यासाठी पर्याय होते – १)रयतेपेक्षा जमीनदार पद अधिक मजबूत झाले, २) जमीनदारावर ईस्ट इंडिया कंपनीचे स्वामित्व निर्माण झाले, ३)न्यायिक पद्धत अधिक सक्षम झाली आणि ४)यापकी एकही नाही असे पर्याय दिलेले होते.

२०१२मध्ये, रयतवारी पद्धती संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला होता, ज्यामध्ये शेतकऱ्यांमार्फत थेट शेतसारा सरकारला दिला जात असे, रयतेला सरकारने पट्टा दिलेला होता आणि महसूल लावण्याअगोदर जमिनीचे सर्वेक्षण आणि मोजमाप केले जात असे अशा प्रकारची तीन विधाने दिलेली होती आणि यातील योग्य विधाने निवडायची होती.

२०१४ मध्ये, १८५८ च्या राणीच्या जाहीरनाम्याचा उद्देश काय होता? असा प्रश्न विचारण्यात आलेला होता तसेच २०१२ मध्ये ब्राह्मो समाजावर आणि २०१६ मध्ये सत्यशोधक समाजावर प्रश्न विचारण्यात आलेला होता.

२०१७ मध्ये, ब्रिटिश सत्तेच्या काळात भारतात खालीलपकी कोण रयतवारी पद्धतीची सुरुवात करण्याशी संबंधित होते व यासाठी लॉर्ड कॉर्नवॉलिस, अलेक्झांडर रीड, थॉमस मन्रो हे पर्याय देण्यात आलेले होते.

उपरोक्त प्रश्नांवरून आपणाला या घटकाचा अभ्यास करताना संकीर्ण माहितीसह विश्लेषणात्मक पद्धतीचाही आधार घ्यावा लागतो, हे स्पष्ट होते. या घटकावर कमी प्रश्न विचारण्यात आलेले असले तरी हा घटक मुख्य परीक्षेलाही आहे. त्यामुळे या घटकाचे सखोल आकलन असणे अपरिहार्य आहे. या विषयावर बाजारामध्ये अनेक संदर्भग्रंथ उपलब्ध आहेत. मात्र या विषयाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी बिपीन चंद्रलिखित आधुनिक भारतावरील जुने एनसीईआरटीचे पुस्तक अभ्यासावे आणि त्यानंतर या विषयाचा अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी बी. एल. ग्रोवर आणि एस. ग्रोवर लिखित आधुनिक भारताचा इतिहास हे पुस्तक वाचावे. या पुढील लेखामध्ये आपण आधुनिक भारताअंतर्गत येणाऱ्या ‘भारतीय स्वातंत्र्य चळवळ’ या घटकाचा आढावा घेणार आहोत.