इंडियन काऊन्सिल ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्चतर्फे देशांतर्गत विविध विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांमध्ये घेण्यात येणाऱ्या पदवी, पदव्युत्तर व संशोधनपर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश पात्रता परीक्षांसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत-
पदवी अभ्यासक्रमासाठी आवश्यक पात्रता : अर्जदार सर्वसाधारण गटातील असल्यास त्यांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा कृषी विज्ञान, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र हे विषय घेऊन व कमीतकमी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. गुणांच्या टक्केवारीची अट राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी ४०टक्क्य़ांपर्यंत शिथिलक्षम.
वयोमर्यादा : २३ वर्षे. राखीव गटातील
विद्यार्थ्यांसाठी शिथिलक्षम.
पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी आवश्यक पात्रता : अर्जदार विद्यार्थ्यांनी कृषी, पशुविज्ञान, कृषी-अभियांत्रिकी, मत्स्यपालन, फलोत्पादन, गृह-विज्ञान, दुग्ध व्यवसाय, वन-व्यवस्थापन, कृषी विपणन, सहकार, अन्न प्रक्रिया, बायोटेक्नॉलॉजी यांसारख्या विषयांतील पदवी परीक्षा कमीतकमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी ५० टक्के शिथिलक्षम आहे.
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय १९ वर्षांहून कमी नसावे.
वरिष्ठ संशोधक परीक्षा, पात्रता : अर्जदार विद्यार्थ्यांनी वर नमूद केलेल्या विषयांमधील पदव्युत्तर पदवी परीक्षा कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. राखीव गटातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेची अट ५०% पर्यंत शिथिलक्षम आहे.
वयोमर्यादा : ३० वर्षे. राखीव गटातील उमेदवारांसाठी शिथिलक्षम.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. पदवी अभ्यासक्रमासाठी निवड परीक्षा देशांतर्गत विविध केंद्रांवर
१२ एप्रिल २०१४ रोजी तर पदव्युत्तर व संशोधक पात्रता परीक्षेसाठी १३ एप्रिल २०१४ रोजी घेण्यात येईल.
अर्जदारांची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व लेखी निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यात येईल.
अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून खालीलप्रमाणे शुल्क भरावे लागेल-
पदवी अभ्यासक्रम : सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांनी ५०० रु. तर राखीव गटातील उमेदवारांनी २५० रु. भरावेत.
पदव्युत्तर अभ्यासक्रम : सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांनी ६०० रु. तर राखीव गटातील उमेदवारांनी ३०० रु. भरावेत.
वरिष्ठ संशोधक पात्रता परीक्षा : सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांसाठी १२०० रु. तर राखीव गटातील उमेदवारांसाठी ६०० रु.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अर्जाचा नमुना व तपशिलासाठी इंडियन काऊन्सिल ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्चच्या http://www.icar.org.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : संपूर्णपणे भरलेले प्रवेश अर्ज कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन्स (एज्युकेशन), रूम नं. २१६, इंडियन काऊन्सिल ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल रिसर्च, कृषी अनुसंधान भवन, २, पुसा, नवी दिल्ली ११००१२ या पत्त्यावर ७ फेब्रुवारी २०१४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.