MBAएमबीए अभ्यासक्रम पूर्ण करतानाच विद्यार्थ्यांनी आपल्या भावी करिअरचा आराखडा निश्चित करायला हवा आणि त्या दृष्टीने स्वत:ला तयार करायला हवे. नोकरी अथवा व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी विषयासंबंधित मूलभूत ज्ञानासोबत  इतर कौशल्यांचा विकास साधणे आणि संबंधित क्षेत्रातील घडामोडींबाबत चौकस राहणे अत्यावश्यक ठरते.
व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम शिकताना विद्यार्थ्यांनी योग्य दृष्टिकोन बाळगणे त्यांच्या पुढील कारकीर्दीसाठी महत्त्वाचे ठरते. पदवी अभ्यासक्रम आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रम यामध्ये निश्चितच फरक आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला हवे.  केवळ कसाबसा अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यापेक्षा एमबीए होऊन नोकरीमध्ये किंवा स्वत:च्या व्यवसायामध्ये चांगले करिअर करणे हे प्रत्येक विद्यार्थ्यांचे ध्येय असायला हवे.  
व्यवस्थापन क्षेत्रात उत्तम करिअर घडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी काही चांगल्या सवयी अंगी बाणवायला हव्यात.  अभ्यासक्रम पूर्ण करताना ठोस उद्दिष्टेही नजरेसमोर ठेवायला हवीत. या उद्दिष्टांमध्ये प्रवेश परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन दर्जेदार संस्थेमध्ये प्रवेश घेण्याचा विचार प्राधान्याने करायला हवा. या वर्षीच्या व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या बहुतेक प्रवेश परीक्षा (काही अपवाद वगळता) पार पडल्या आहेत. या परीक्षेत मिळालेल्या गुणांवर संस्थेमधील प्रवेश अवलंबून असतो. प्रवेश घेताना संस्थेची नीट चौकशी करून नंतरच प्रवेश घेणे योग्य ठरेल.
अभ्यासक्रम शिकायला सुरुवात केल्यानंतर आपण शिकत असलेल्या व्यवस्थापनाच्या तत्त्वांचा उपयोग आपल्या वैयक्तिक जीवनात करायला विद्यार्थ्यांनी शिकायला हवे. यामध्ये वेळेचे व्यवस्थापन हा घटक अतिशय महत्त्वाचा  ठरतो. व्यवस्थापन अभ्यासक्रमाची ही दोन वर्षे म्हणजे करिअरमधील एक महत्त्वाचा कालखंड असल्यामुळे या दोन वर्षांचा वेळ जास्तीत जास्त कसा उपयोगात आणता येईल याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायला हवे. या दोन वर्षांत विद्यार्थ्यांची अवस्था ‘रात्र थोडी, सोंगे फार’ अशी असते. त्यामुळे मर्यादित असलेला उपलब्ध वेळ योग्य पद्धतीने कसा वापरायचा याचे नियोजन, व्यवस्थापन विद्यार्थ्यांनी करायला हवे. त्याकरता अनावश्यक  गोष्टींना फाटा द्यायला हवा तसेच केव्हाही मोकळा वेळ मिळाला-  एखादी मोकळी तासिका मिळाली तरीसुद्धा तिचा वापर स्वत:ची अर्हता वाढवण्यासाठी कसा करता येईल हे विद्यार्थ्यांनी पाहायला हवे.  याचा उपयोग करिअरच्या भावी वाटचालीमध्ये निश्चितच होतो.
व्यवस्थापन क्षेत्रातील आपल्या करिअरचे नियोजन करताना, आपण एमबीए झाल्यानंतर नोकरी करणार की स्वत:चा व्यवसाय करणार हे विद्यार्थ्यांनी ठरवायला हवे. स्वत:चा व्यवसाय करायचा असेल तर त्यासंबंधीची माहिती जमा करता येईल आणि पूर्वतयारीला लागता येईल. कोणता व्यवसाय करायचा, त्याला भांडवल किती लागेल, हे भांडवल कशा पद्धतीने उभे करता येईल, व्यवसायासाठी लागणारी जागा कशी उपलब्ध करता येईल अशा अनेक संबंधित मुद्दय़ांचा विचार करून त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी या दोन वर्षांमध्ये करायला हवा. एमबीए अभ्यासक्रमाचे विषय समजून घेताना या विषयांचा उपयोग स्वत:च्या व्यवसायामध्ये कसा करता येईल, हा विचार विद्यार्थ्यांनी समांतर पातळीवर करायला हवा. चांगला उद्योजक बनण्यासाठी कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल याकडेही लक्ष द्यावे. जगातील नामवंत उद्योजकांची चरित्रे वाचल्यास त्याचा निश्चितच उपयोग होतो.
एमबीएनंतर नोकरी करण्याची इच्छा असल्यास त्यादृष्टीनेही तयारी करायला हवी. ‘प्लेसमेंट’ आणि प्लेसमेंटचे ‘पॅकेज’ हा एमबीएच्या प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनींचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे.  एमबीए झाल्यानंतर चांगली नोकरी मिळावी ही अपेक्षा रास्त असली तरी प्लेसमेंटची सर्व जबाबदारी संस्थेची नसून त्यामध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींचाही मोठा वाटा आहे, हे लक्षात ठेवायला हवे. चांगली प्लेसमेंट मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी चांगली तयारी करणे आवश्यक आहे. यासाठी अभ्यासक्रमातील सर्व विषयांचा सविस्तर अभ्यास करणे, संवादकौशल्ये वाढवणे इत्यादी गोष्टी अपरिहार्य ठरतात. याशिवाय आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती, सामाजिक- राजकीय- आर्थिक  परिस्थिती,  सरकारी धोरणे इत्यादी अनेक गोष्टींची माहिती करून घेणे आवश्यक ठरते. ही सर्व माहिती मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रांविषयीची माहितीसुद्धा विद्यार्थ्यांनी जमवायला हवी. आपल्या विद्याशाखेनुसार कोणकोणत्या उद्योगक्षेत्रांमध्ये नोकरी मिळण्याची शक्यता आहे तसेच नोकरी मिळवण्यासाठी कोणती पूर्वतयारी करणे आवश्यक आहे याची पडताळणी करायला हवी. आगामी दोन वर्षांमध्ये नोकरीची कोणकोणती क्षेत्रे उपलब्ध होणार आहेत याचाही अंदाज बांधायला शिकले पाहिजे. याखेरीज नामवंत कंपन्यांमधील अधिकाऱ्यांना आपल्या शिक्षणसंस्थेत भाषणासाठी आमंत्रित करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. अशा पद्धतीचे अनेक परिसंवाद, कार्यशाळा सतत आपल्या भोवताली होत असतात. या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहावे. अशा कार्यक्रमांमध्ये संबंधित क्षेत्रांतील कार्यरत व्यक्तींचा परिचय होतो, कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कंपन्यांच्या काय अपेक्षा आहेत हेही समजायला मदत होते आणि त्यानुसार नोकरी मिळवण्यासाठी योग्य पूर्वतयारी करता येते.
नोकरीच्या तयारीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे नोकरीकरता घेतली जाणारी प्रवेश परीक्षा आणि नंतर घेतली जाणारी मुलाखत. या व्यतिरिक्त काही कंपन्यांमधून मुलाखतीआधी गटचर्चाही घेतली जाते. या सर्व टप्प्यांवर यशस्वी होण्यासाठी सराव करणे अत्यावश्यक असते.
या चाचण्यांचा सराव करण्यासाठी अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टचे अनेक प्रश्नसंच बाजारामध्ये, वेबसाइटस्वर तसेच शैक्षणिक संस्थांमध्येही उपलब्ध असतात. प्रश्नसंच सोडवायची पुरेशी तयारी विद्यार्थ्यांनी करायला हवी. कंपनीने गटचर्चा आयोजित केली तर त्यावेळेस आपले विचार इतरांसमोर प्रभावीपणे मांडण्याचाही सराव आवश्यक आहे. मुलाखतीला सामोरे जातानाही विद्यार्थ्यांनी पुरेशी तयारी
करायला हवी.
गटचर्चा व मुलाखत या दोन्हींमध्ये यशस्वी होण्यासाठी विषयाचे ज्ञान आणि सॉफ्ट स्किल्सचा वापर अत्यावश्यक ठरतो. मुलाखतीच्या वेळी कोणते प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे  याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे तयारीला सुरुवात करावी. यामध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी की एमबीए झाल्यानंतर नोकरी मिळणे अवघड नाही. पण त्यासाठी पहिल्या दिवसापासून प्लेसमेंटच्या मागे न धावता यश मिळवण्यासाठी कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत, ते पाहायला हवे. प्लेसमेंटसाठी पुरेशी तयारी न केल्यास चांगली नोकरी मिळणे अवघड बनते आणि मग पदरी निराशा पडते. सध्या नोकरी मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये यशस्वी होण्यासाठी एमबीए अभ्यासक्रम पूर्ण करताना, आपली पात्रता सतत उंचावत राहायला हवी.
सारांश असे म्हणता येईल की, एमबीए अभ्यासक्रम पूर्ण करताना अनेक गोष्टी एकाचवेळी करायच्या असतात. विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक अर्हता उंचावण्यासोबत विषयांचे अद्ययावत ज्ञान प्राप्त करणे, संबंधित क्षेत्रातील अपडेट्सबद्दल चौकस असणे आणि सॉफ्ट स्किल्स अंगी बाणवण्याचा पद्धतशीर प्रयत्न करणे आवश्यक आहे.
मात्र, या क्षेत्रात गेली अनेक वर्षे वावरताना अनुभव मात्र असा येतो की, एमबीएला प्रवेश घेतल्यानंतरही अनेक विद्यार्थी महाविद्यालयीन मनोवृत्तीतून बाहेर येत नाहीत आणि मग कशीतरी पदवी संपादन करून नोकरीसाठी वणवण करण्याची वेळ त्यांच्यावर ओढवते. हे सर्व टाळण्यासाठी एमबीएची दोन वर्षे खऱ्या अर्थाने सत्कारणी लावली तर करिअरमध्ये यश मिळवणे अवघड नाही.
nmvechalekar@yahoo.co.in
(लेखक पुण्याच्या इंडसर्च संस्थेचे अधिष्ठाता आहेत.)