scorecardresearch

विशेषीकरणाचे पर्याय

व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षांत विशेषीकरणाची अर्थात ‘स्पेशलायझेशन’ची निवड विद्यार्थ्यांना करावी लागते.

विशेषीकरणाचे पर्याय

MBAव्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षांत विशेषीकरणाची अर्थात ‘स्पेशलायझेशन’ची निवड विद्यार्थ्यांना करावी लागते. उपलब्ध अनेक पर्यायांपैकी विपणन व्यवस्थापन आणि वित्तीय व्यवस्थापन या विषयांचा
क्रमिक पुस्तकांपलीकडचा अभ्यास कसा करावा, याविषयी..
एमबीए अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षी विशेषीकरणाचे म्हणजेच स्पेशलायझेशनचे विषय निवडायचे असतात. काही विद्यापीठांमध्ये एका वेळी एकच स्पेशलायझेशन घेता येते तर काही ठिकाणी एका वेळी दोन स्पेशलायझेशन्स घेण्याची तरतूद असते. आपल्या निवडीप्रमाणे तसेच विषयाच्या आवडीनुसार स्पेशलायझेशन घेता येते.  स्पेशलायझेशनमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आपल्या पसंतीप्रमाणे विपणन (मार्केटिंग), वित्त (फायनान्स), मनुष्यबळ व्यवस्थापन (ह्य़ुमन रिसोर्स डेव्हलपमेंट), माहिती तंत्रज्ञान (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी), उत्पादन (प्रॉडक्शन), शेती व्यवसाय व्यवस्थापन (अ‍ॅग्री बिझनेस मॅनेजमेंट), आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापन (इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट), उद्योजकता व्यवस्थापन (आंत्रप्रेन्युरशिप) इत्यादी अनेक उत्तम पर्याय यामध्ये उपलब्ध आहेत. काही विद्यापीठांमध्ये दुसऱ्या वर्षांपासून स्पेशलायझेशन घेता येते तर काही ठिकाणी पहिल्या वर्षीच्या दुसऱ्या सत्रापासून स्पेशलायझेशन घेता येते.
कोणताही विषय स्पेशलायझेशनसाठी घेतला तरी मिळणारी संधी ही जवळपास समान असते. त्यामुळे आपली आवड लक्षात घेऊन विशेषीकरणाचा किंवा स्पेशलायझेशनचा विषय निवडल्यास फायदा होतो. तसेच अमुक एक विषय अवघड किंवा दुसरा विषय सोपा असेही नाही. सर्वच विषयांबाबत सखोल अभ्यास करणे हे आवश्यक ठरते. याआधीच्या लेखात म्हटल्यानुसार आपण वर्गात शिकत असलेल्या सैद्धान्तिक ज्ञानाबरोबरच विषयाचा प्रत्यक्ष व्यवहारामधला उपयोग समजणे आवश्यक आहे.
विपणन व्यवस्थापन (मार्केटिंग मॅनेजमेंट) या विषयाचा विचार केला तर यामध्ये अनेक वेगवेगळ्या अशा विपणनाच्या कामांचा किंवा विपणनविषयक विभागाचा समावेश होतो. यामध्ये विपणन संशोधन (मार्केटिंग रिसर्च), जाहिरातीसंबंधीचे नियोजन, विपणनविषयक कायदे (मार्केटिंग लॉज), वितरणाची साखळी (चॅनल ऑफ डिस्ट्रिब्युशन्स), सेवांचे विपणन, आंतरराष्ट्रीय विपणन, ग्राहकांचे मानसशास्त्र, ग्रामीण भागातील विपणनासंबंधीची कामे इत्यादी अनेक महत्त्वाच्या विषयांचा समावेश होतो. याचा अभ्यास करताना पाठय़पुस्तके तसेच संदर्भ पुस्तके याबरोबरच वर्गातील लेक्चर्सचा उपयोग होतोच, पण थोडा अधिक प्रयत्न केला तर वर्गाबाहेरही अनेक गोष्टी शिकता येतात. यासाठी प्रत्येक बाबतीत आपण शिकत असलेल्या संस्थेवर अवलंबून न राहता स्वत:ही पुढाकार घेण्याची गरज आहे. यासाठी मित्र-मैत्रिणींचा ग्रुप करूनसुद्धा अनेक उपयुक्त गोष्टी करता येतात. यामध्ये एखादी छोटी प्रश्नावली तयार करून विपणन संशोधनाचा अनुभव घेता येतो. यामध्ये आपल्या नातेवाईकांची, मित्रमंडळींची, महाविद्यालयातील प्राध्यापकांची मते जाणून घेता येतात. ही मते एखाद्या वस्तूबद्दल असतील (ब्रँड) किंवा त्यांच्या आवडीनिवडीबद्दल असतील किंवा मार्केटिंग धोरणाबाबत असतील. तसेच जाहिरातींबद्दल सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की आपण राहात असलेल्या शहरामध्ये अनेक जाहिरातसंस्था (अ‍ॅड एजन्सीज) असतात. यापैकी काही संस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचे काम कसे चालते हे पाहता येईल. तसेच एखादी जाहिरात प्रत्यक्षात कशी तयार होते हेही पाहणे शक्य आहे. आपल्याला स्वत: एखादी जाहिरात तयार करता येईल का हाही विचार करता येतो. आजकाल मोबाइलवर व्हिडीओ शूटिंग करणे सहज शक्य आहे. मोबाइलचा असा वापर करून आपण स्वत:च एखादी जाहिरात तयार करण्याचा विचार करणे आणि तो अमलात आणणे शक्य आहे. अर्थात यामध्ये व्यावसायिक व्हिडीओ शूटिंगचे कौशल्य व सफाई नसली तरी जाहिरातीमधून दिला जाणारा संदेश योग्य प्रकारे पोहोचतो किंवा नाही हे पाहता येईल. याचबरोबर विपणनची इतर कार्ये म्हणजे उदा. साठवण (स्टोअरिंग) तयार झालेली वस्तू बाजारपेठेत विकली जाईपर्यंत कशी साठवली जाते यासाठी भेटी
देता येतील.
एखाद्या वस्तूचे विपणन (मार्केटिंग) कशा पद्धतीने केले जाते हे पाहण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांच्या विपणन विभागांशी संवाद साधता येईल. शेतीमालाचे विपणन हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी शहरातील मार्केट यार्ड पाहता येईल. धान्यबाजार, भाजीबाजार, कापडबाजार इत्यादींना आवर्जून भेट दिल्यास, त्या त्या  विक्रेत्यांचे विक्री कौशल्य, तिथे येणाऱ्या ग्राहकांचे वर्तन, विविध मध्यस्थ यांचे निरीक्षण करता येईल. विपणन हे केवळ आंतरराष्ट्रीय कंपन्याच करतात असे नव्हे तर अगदी खेडोपाडीसुद्धा विपणनाचे कौशल्य किती असते हे आपल्या लक्षात येईल. एखाद्या लहान गावामध्ये भरणारा आठवडाबाजारसुद्धा विपणानाच्या अनेक गोष्टी शिकवून जातो, मात्र तशी दृष्टी पाहिजे. त्यामुळे शहरातील मोठमोठय़ा मॉल व मोठय़ा कंपन्या यांना भेटी तर द्याव्याच, पण त्याचबरोबर शहराच्या शेजारी असलेल्या लहान खेडय़ांतील बाजारसुद्धा बघावा. यामधून अनेक गोष्टी शिकता येतील.
गेल्या काही वर्षांत सेवा क्षेत्र विस्तारत आहे. वेगवेगळ्या सेवांचे प्रमाण वाढत चालले आहे. या सेवांचे विपणन कसे केले जाते हेही बघता येते. वित्तीय सेवा देणाऱ्या अनेक कंपन्या उदा. विमा, बँकिंग, गुंतवणूक यासारख्या अनेक क्षेत्रातील कंपन्यांना विपणनाची गरज भासते. यातील संधी लक्षात घेऊन सेवांचे विपणन करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते हा विचार करता येतो. सेवा क्षेत्रासारखेच विस्तारणारे आणखी एक क्षेत्र म्हणजे ई-मार्केटिंग. या मार्केटिंगमध्ये ग्राहकांकडून ऑनलाइन मागणी आल्यानंतर ती किती दिवसांत पूर्ण केली जाते आणि या सर्व व्यवहारात विश्वासार्हता कशी पाळली जाते हे पाहणे अत्यंत रंजक आहे. या क्षेत्रातील नावाजलेल्या कंपन्या आणि त्यांची कार्यपद्धती समजून घेतल्यास आपल्या ज्ञानात भर पडेल यात शंकाच नाही.

या व्यतिरिक्त विपणन क्षेत्रामध्ये अनेक अशा बाबी आहेत की ज्या आपण व्यवहारात प्रत्यक्ष पाहून आपली पात्रता वाढवू शकतो. वस्तूचे जीवनचक्र (प्रॉडक्ट लाइफ सायकल) ही एक महत्त्वाची संकल्पना विपणनामध्ये आहे. प्रत्येक वस्तूचे एक ठरावीक आयुष्य असते. वस्तू बाजारपेठेमध्ये नवी असताना तिच्या विक्रीमध्ये वाढ होते आणि नंतर हळूहळू विक्री कमी कमी होत जाऊन वस्तू बाजारपेठेमधून बाहेर जाते म्हणजेच एखादी वस्तू बाजारपेठेमध्ये ठरावीक काळ राहते. हा काळ संपल्यानंतर अनेक कारणांमुळे ती वस्तू बाहेर पडते अशी या वस्तू जीवनचक्राची ढोबळ मानाने संकल्पना आहे. या संकल्पनेचा अभ्यास करताना जीवनचक्रामधील वेगवेगळे टप्पे समजून घेतले पाहिजेत, पण त्याचबरोबर प्रत्यक्ष व्यवहारात ही संकल्पना कशी लागू पडते हेही बघायला हवे. गेल्या १० वर्षांत किती नवीन वस्तू बाजारात आल्या आणि त्यापैकी किती वस्तूंनी आजतागायत टिकाव धरला अथवा टिकाव धरला नाही याचा अभ्यास करता येतो. तंत्रज्ञानात होणारे बदल हे इतके वेगवान आहेत की, आजकाल वस्तूंचे जीवनचक्र हे कसे कमी होत आहे हे लक्षात येईल.
सारांशाने असे म्हणता येईल की, विपणनामधील सर्व महत्त्वाच्या बाबी आपण व्यवहारात पडताळून पाहाव्यात. प्रत्यक्ष वस्तुस्थितीच्या जेवढे जवळ जाता येईल तेवढे जाण्याचा प्रयत्न करायला हवा. यामुळे आपली आकलनशक्ती तर वाढतेच, पण त्याचबरोबर आपला आत्मविश्वासही वाढतो. हे लक्षात ठेवायला हवे की, परीक्षेच्या वेळेस आदल्या दिवशी गाइड वाचून परीक्षा कदाचित उत्तीर्ण होता येईल, पण चांगले विपणन व्यवस्थापक होता येणार नाही.
विपणन व्यवस्थापनानंतर दुसरे विशेषीकरण किंवा स्पेशलायझेशन म्हणजे वित्तीय व्यवस्थापन (फायनान्शिअल मॅनेजमेंट). या विशेषीकरणामध्येसुद्धा अनेक वेगवेगळ्या पण संबंधित विषयांचा अभ्यास करावा लागतो. उदा. कॉर्पोरेट फायनान्शिअल मॅनेजमेंट, तसेच वित्तविषयक कायदे, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर, मर्चन्ट बँकिंग, कॅपिटल मार्केट, आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन, कॉस्ट मॅनेजमेंट इत्यादी अनेक महत्त्वाच्या विषयांचा समावेश या विशेषीकरणामध्ये होतो.
या विषयाचा अभ्यास करताना, वर्गात शिकत असलेल्या विषयांची व्यवहारात कशी सांगड घालता येईल तसेच व्यवहारात याचा कसा उपयोग करून घेता येईल हा विचार सातत्याने करावा लागतो. मागे एका लेखात म्हटल्यानुसार, या विषयाचा उपयोग करून आपली स्वत:ची वित्तीय साक्षरता वाढवता येते व त्याचा उपयोग आपल्याला आपले स्वत:चे निर्णय घेण्यासाठी होतो.
या व्यतिरिक्त याही विषयामध्ये आपल्याला आपला स्वत:चा आवाका वाढवण्यासाठी अनेक गोष्टी करता येतात. यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे वार्षिक अहवाल जरूर पाहावेत. हे अहवाल सार्वजनिक कंपन्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध असतात. हे अहवाल वाचून ते समजून घेणे आवश्यक आहे. या अहवालात दिलेले नफा-तोटा पत्रक व ताळेबंद यावरून कंपन्यांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज बांधता यायला हवा. हे झाले मोठय़ा कंपन्यांबाबत. याशिवाय आपल्या अवतीभोवती अनेक लहान व मध्यम स्वरूपाच्या व्यावसायिक संस्था असतात. उदा. घराजवळील किराणा दुकान किंवा स्टेशनरीचे दुकान अथवा मेडिकलचे दुकान. यांचे आर्थिक व्यवस्थापन कसे चालते हे विचारता येईल. अर्थात त्यांना होणाऱ्या नफ्याची रक्कम ते सांगणार नाहीत हे खरे आहे, पण आपल्याला त्यांच्या नफ्यामध्ये रस नसून ते भांडवल उभारणी कशी करतात, खेळते भांडवल कुठून आणतात यामध्ये जास्त रस आहे. अगदी एखादा गॅरेज चालवणारासुद्धा ही माहिती देऊ शकेल. म्हणजेच मोठय़ा कंपन्यांपासून, मोठे मॉल तसेच मोठय़ा संस्था याचबरोबर अगदी लहान व्यावसायिक यांचे आर्थिक व्यवस्थापन पाहता येते. याचबरोबर इतर संस्था म्हणजे रुग्णालये, महानगरपालिका, शैक्षणिक संस्था, स्पोर्ट्स क्लब इ. सामाजिक संस्थांचे आर्थिक व्यवस्थापन समजून घेता येते. यामध्ये असा प्रश्न उद्भवतो की, अशी माहिती मिळेल का? याचे कारण असे की संस्था आपले आर्थिक व्यवहार सांगण्यास तयार नसतात आणि ते साहजिकच आहे. यावर मार्ग असा की, आपण कोणतीही गोपनीय माहिती मागत नाही तसेच आकडेवारी मागत नाही. आपला हेतू त्यांचे सर्वसाधारण आर्थिक व्यवस्थापन कसे चालते हे समजून घेणे आहे. ज्या ठिकाणी वार्षिक अहवाल प्रसिद्ध होतात, त्या ठिकाणी आकडेवारी उपलब्ध असते व ज्या ठिकाणी हे अहवाल उपलब्ध नसतात त्या ठिकाणचे केवळ आर्थिक व्यवस्थापन समजून घेणे एवढाच आपला उद्देश असतो. वित्तीय व्यवस्थापनाच्या उरलेल्या बाबींचा विचार पुढील लेखात करू.
nmvechalekar@yahoo.co.in
(लेखक पुण्याच्या इंडसर्च संस्थेचे अधिष्ठाता आहेत.)

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या