फारुक नाईकवाडे

राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षेच्या सामान्य अध्ययनातील सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान घटकातील माहिती व संपर्क तंत्रज्ञान या उपघटकाच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे. तिन्ही सेवांच्या पूर्वपरीक्षेमध्ये यापूर्वी हा घटक समाविष्ट नव्हता. त्यामुळे सर्वच उमेदवारांसाठी हा घटक नवीन आहे आणि त्याची नव्याने तयारी करावी लागणार आहे. या घटकाचा सविस्तर अभ्यासक्रम देण्यात आलेला नाही. त्यामुळे तयारीसाठी आयोगाच्या ज्या परीक्षांमध्ये हे उपघटक समाविष्ट आहेत त्यांचा अभ्यासक्रम पाहून आणि प्रश्नांचे विश्लेषण करून तयारीसाठीचे मुद्दे ठरवून घेणे आवश्यक आहे.

राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर चारमध्ये तसेच दुय्यम सेवा गट ब मुख्य परीक्षा आणि गट क सेवेतील दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क आणि लिपिक टंकलेखक पदांच्या मुख्य परीक्षेमध्ये संगणक व माहिती तंत्रज्ञान हा घटक समाविष्ट आहे आणि त्याचा सविस्तर अभ्यासक्रमही देण्यात आला आहे. या सर्व अभ्यासक्रमांचे विश्लेषण करून तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षेमध्ये या उपघटकासाठी अपेक्षित मुद्दे आणि त्यांची तयारी कशी करावी ते पाहू.

अपेक्षित अभ्यासक्रम

*  संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर, अ‍ॅक्सेसरीज.

* आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रांतील जीवनात संगणकाचा वापर,

* डेटा कम्युनिकेशन नेटवर्किं ग आणि वेब टेक्नॉलॉजी – वायर्ड/वायरलेस. इंटरनेट, वेब टेक्नॉलॉजी, स्टॅटिक/डायनमिक वेब पेजेस, वेब होस्टिंग.

* नवीनतम साधने आणि तंत्रज्ञान-  क्लाऊड कम्प्युटिंग, सोशल नेटवर्किं ग, ब्लॉकचेन.

* इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), आभासी वास्तव/ संवर्धित वास्तव (व्हीआर/ एआर) मेसेजिंग, सर्च इंजिन, डिजिटल वित्तीय सेवा, कृत्रिम बुद्धिमत्ता/ मशीन लर्निग (एआय/एमएल)

* नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधा मिळविण्यासाठी होणारा उपयोग,

*  भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा

*  माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न आणि त्यांचे भवितव्य

*  शासकीय पुढाकार – मीडिया लॅब एशिया, डिजिटल इंडिया विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी.

*  सुरक्षा – नेटवर्क आणि माहिती सुरक्षा, फॉरेन्सिक, सायबर कायदा, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध.

प्रत्यक्ष तयारी.

*  संगणकाचे हार्डवेअर, सॉफ्टवेअर, अ‍ॅक्सेसरीज आणि संगणकाची भूमिका हे मुद्दे अगदी मूलभूत स्वरूपाचे आहेत आणि अभ्यासक्रमामध्ये त्यांचा उल्लेख नाही. तरीही या मुद्दय़ांचा थोडक्यात आढावा घेणे व्यवहार्य ठरेल.

* संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर, अ‍ॅक्सेसरीज यांचे प्रकार, स्वरूप, उपयोजन यांचा आढावा घ्यावा.

* माहिती साठविणे व माहितीवर प्रक्रिया करण्यासाठीची उपकरणे, नियमावली, त्यांचे प्रकार, उपयोग माहीत करून घ्यावेत.

* व्हायरसचे प्रकार व याबाबतच्या चालू घडामोडी माहीत करून घ्याव्यात.

* वैद्यकीय, कृषी, प्रशासन, बँकिं ग अशा विविध क्षेत्रांमध्ये संगणक व माहिती तंत्रज्ञान यांचा होणारा उपयोग समजून घ्यावा. यामध्ये त्या त्या क्षेत्रामध्ये संगणकीकरणाचा उपयोग आणि माहिती तंत्रज्ञानामुळे त्यांचा वापर करण्यामध्ये वाढलेली परिणामकारकता अशा अनुषंगाने हा मुद्दा पाहावा. विविध क्षेत्रांतील नवी संशोधने व उपकरणे यांची अद्ययावत माहिती असावी.

* कम्युनिकेशन नेटवर्किंग, इंटरनेट, वेब टेक्नॉलॉजी, स्टॅटिक/ डायनॅमिक वेब पेजेस, वेब होस्टिंग या संकल्पना समजून घेऊन त्यांचे उपयोजन कशा प्रकारे आणि कोणत्या क्षेत्रांमध्ये केले जाते ते समजून घ्यावे.

डेटा कम्युनिकेशन, नेटवर्किं ग व वेब टेक्नॉलॉजी या मुद्दय़ामध्ये माहितीचे संप्रेषण/ प्रसारण करण्यासाठी आवश्यक घटकांची माहिती तसेच संप्रेषणाच्या विस्तार, माध्यम व गतीच्या आधारे त्याचे प्रकार समजून घ्यावेत.

* नवीन साधने आणि तंत्रज्ञान – क्लाऊड कम्प्युटिंग, सोशल नेटवर्किं ग, ब्लॉकचेन इत्यादींमागील तंत्रज्ञान समजून घ्यावे. त्यांचा वापर होणारी क्षेत्रे, त्यांचे फायदे तोटे, त्यांबाबतच्या चालू घडामोडी माहीत असायला हव्यात.

* इंटरनेट ऑफ थिंग्ज, आभासी वास्तव/ संवर्धित वास्तव, मेसेजिंग, सर्च इंजिन, डिजिटल वित्तीय सेवा, कृत्रिम बुद्धिमत्ता/ मशीन लर्निग या बाबींचा विविध क्षेत्रांतील वापर आणि त्याबाबतच्या समस्या, कारणे, उपाय समजून घ्यावेत. या सर्व मुद्दय़ांमागील मूलभूत तंत्रज्ञान समजून घ्यावे.

*  नेटवर्क आणि माहिती सुरक्षेसाठीच्या फॉरेन्सिक, सायबर कायदा इत्यादींमधील महत्त्वाच्या तरतुदी, त्यांतील महत्त्वाच्या व्याख्या, तांत्रिक मुद्दे, सायबर गुन्ह्यचे स्वरूप, प्रकार व त्यांच्या सायबर कायद्यातील व्याख्या आणि शिक्षा इत्यादींचा अभ्यास मूळ कायदा वाचून करायला हवा. तसेच त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे कायदेशीर प्रयत्नसुद्धा कायद्याच्या मूळ दस्तावेजातून समजून घ्यावेत.

* भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा हा मुद्दा पुढील मुद्दय़ांच्या आधारे अभ्यासावा – शासनाची धोरणे, संगणकाच्या व माहिती तंत्रज्ञानाच्या वापरातील व विस्तारातील ठळक टप्पे, माहिती तंत्रज्ञान पार्क इत्यादी संकल्पना.

* माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य हा मुद्दा माहितीची सुरक्षितता, खासगीपणा, पायाभूत सुविधांवरील खर्च, कुशल मनुष्यबळाची आवश्यकता अशा ढोबळ मुद्दय़ांसहित जास्तीत जास्त आयामांच्या आधारे बारकाईने अभ्यासणे आवश्यक आहे. * मीडिया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र या शासकीय उपक्रमांवर भर देऊन शासनाच्या संगणक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्राआधारे सुरू करण्यात आलेल्या जास्तीत जास्त उपक्रमांचा आढावा घ्यावा. यामध्ये उपक्रमाचे नाव, सुरू करणारा विभाग, उद्देश, स्वरूप, त्यातील माहिती तंत्रज्ञानाची भूमिका, असल्यास लाभार्थी व त्यांचे निकष हे मुद्दे समजून घ्यावेत.