mpsc exam preparation tips forest service mains exam paper one zws 70 | Loksatta

एमपीएससी मंत्र : वनसेवा मुख्य परीक्षा पेपर एक – राज्यव्यवस्था घटक

मूलभूत हक्क व कर्तव्ये याबाबबतची सर्व कलमे मुळातून समजून घेऊन त्यामध्ये समाविष्ट अपवादांसहित पाठच करावीत.

mpsc exam preparation tips
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

रोहिणी शहा

राज्यघटना

राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया, घटनासमितीची रचना, महाराष्ट्रातील सदस्य, समित्या व त्यांचे सदस्य / अध्यक्ष, समितीच्या बैठका, समितीचे कार्य याचा थोडक्यात आढावा घ्यावा.

घटनेची प्रस्तावना, त्यामध्ये समाविष्ट तत्त्वे / विचार आणि प्रस्तावनेचे घटना समजून घेण्यासाठीचे महत्त्व हे मुद्दे व्यवस्थित समजून घ्यावेत. सर्वोच्च न्यायालयाचे घटनेचा अर्थ विषद करणारे महत्त्वाचे निर्णय माहीत असावेत.

मूलभूत हक्क व कर्तव्ये याबाबबतची सर्व कलमे मुळातून समजून घेऊन त्यामध्ये समाविष्ट अपवादांसहित पाठच करावीत. त्याबाबतच्या चालू घडामोडी व सर्वोच्च न्यायालयाचे अद्ययावत निकाल माहीत असणे आवश्यक आहे. या तरतुदींबाबत झालेल्या घटनादुरुस्त्या व महत्त्वाचे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल यांचा आढावा घेणे गरजेचे आहे.

राज्याच्या धोरणाची सर्व नितीनिर्देशक तत्त्वे समजून घेणे आवश्यक आहे. याबाबत केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी घेतलेले महत्त्वाचे निर्णय व ठळक कायदे समजून घ्यावेत. उदा. कामगार कल्याण, शिक्षण, मद्यबंदी, महिला कर्मचाऱ्यांसाठीच्या सवलती इत्यादी.

केंद्र व राज्यसरकारे यांच्यामध्ये प्रशासकीय, आर्थिक व कायदेशीर अधिकारांची विभागणी कशा प्रकारे झाली आहे. याबाबतची कलमे समजून घ्यावीत व सातव्या परिशिष्टातील विषयांची विभागणी व्यवस्थित समजून घ्यायला हवी. शक्य असेल तर केंद्र, राज्य व समवर्ती सूचीतील विषय पाठच करावेत.

घटना दुरुस्तीची प्रक्रिया व्यवस्थित समजून घ्यावी. महत्त्वाच्या व अद्ययावत घटनादुरुस्त्यांची माहिती असायला हवी.

घटनात्मक पदे अभ्यासताना संबंधित कलम, कार्ये, अधिकार, नेमणुकीची/ पदावरून काढण्याची पद्धत, सध्या त्या पदावरील व्यक्तीचे नाव हे मुद्दे पहावेत.

केंद्रीय/ महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच इतर घटनात्मक आयोग यांबाबतची कलमे, त्यांची रचना, कार्ये, अधिकार, त्यांची वाटचाल, सध्याचे सदस्य व अध्यक्ष हे मुद्दे लक्षात घ्यावेत.

राजकीय व्यवस्था व प्रशासन

लोकसभा / राज्यसभा / विधानसभा / विधान परिषद यांची रचना, कार्यकाळ, पदाधिकारी, सदस्य संख्या, निवडणूक, लोकप्रतिनिधीत्व कायद्यातील महत्वाच्या तरतुदी या बाबी बारकाईने अभ्यासाव्यात.

लोकसभा / राज्यसभा / विधानसभा / विधान परिषद यांचे कामकाज, त्यांच्या समित्या, रचना, कार्ये, अधिकार, कायदा निर्मिती प्रक्रिया, अर्थसंकल्पविषयक कामकाज यांच्या बाबत घटनेतील तरतुदी व्यवस्थित समजून घ्याव्यात. त्यासाठी त्यांची कामकाज नियमावली पाहणे आवश्यक आहे.

राष्ट्रपती, राज्यपालांचे अधिकार, कार्ये, नेमणूक याबाबतच्या तरतुदी समजून घ्याव्यात. महाराष्ट्राच्या राज्यपालांना असलेले विशेषाधिकार व्यवस्थित माहित असायला हवेत.

केंद्र व राज्य शासनाची निवड, रचना, कार्ये, अधिकार, कार्यपद्धती याबाबतच्या घटनेतील तरतुदी व्यवस्थित समजून घ्याव्यात.

राज्य प्रशासनामध्ये मंत्रालयीन कामकाजाची थोडक्यात माहिती करून घ्यावी.

ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन

ग्रामीण प्रशासनामध्ये जिल्हा ते ग्रामपंचायत उशा उतरंडीचा table from मध्ये अभ्यास करता येईल. यामध्ये पुन्हा महसुली व विकासात्मक व पोलीस प्रशासन वेगवेगळे लक्षात घ्यायला हवे. अधिकाऱ्यांची उतरंड व त्यांचे अधिकार, कार्य, नेमणूक, राजीनामा, पदावरून काढून टाकणे या बाबी समजून घ्यायला हव्यात.

स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी याच प्रशासनाचा भाग आहे. त्यांच्या निवडणुकांबाबतच्या तरतुदी, कार्यकाळ, विसर्जित करण्याचे अधिकार, राज्य निवडणूक आयोग, त्याची रचना, कार्ये व अधिकार यांचा बारकाईने आढावा घ्यायला हवा.

शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा त्यांचे प्रकार, निवडणूक, रचना, कार्ये, अधिकार इ. बाबी व्यवस्थित समजून घेऊन अभ्यास करावा.

७३ वी व ७४ वी घटनादुरुस्त्यांमधील तरतुदी, त्या अन्वये स्थापन केलेल्या समित्या, स्थानिक स्वराज्य संस्थाकडे सोपवलेले विषय हे मुद्दे समजून घ्यावेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासासाठी स्थापन केलेल्या समित्या / आयोग इ. चा अभ्यास आवश्यक आहे. या समित्यांकडून करण्यात आलेल्या शिफारशी, त्या अनुषंगाने घेण्यात आलेले निर्णय व त्यांची अंमलबजावणी यांचा नेमका अभ्यास करायला हवा.

महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा १८ मार्च २०२३ रोजी प्रस्तावित आहे. वन सेवा मुख्य परीक्षेच्या तयारीबाबत या लेखापासून चर्चा करण्यात येत आहे. वनसेवा मुख्य परीक्षेमध्ये पेपर एक सामान्य अध्ययन आणि पेपर दोनमध्ये सामान्य विज्ञान व निसर्ग संवर्धन अशा घटकांचा समावेश करण्यात आला आहे.  या लेखामध्ये पेपर एक – सामान्य अध्ययन मधील राज्यव्यवस्था घटकाच्या तयारी कशी करावी ते पाहू.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-01-2023 at 05:43 IST
Next Story
यूपीएससीची तयारी : राज्यव्यवस्था