scorecardresearch

एमपीएससी मंत्र – विज्ञान आणि तंत्रज्ञान : अभ्यासक्रमाची वैज्ञानिक मांडणी

राज्यव्यवस्था आणि कायदे या अभ्यासक्रमाच्या पेपर दोनमध्ये ‘क्रिकेटच्या मैदानांचे आकार’ या मुद्दय़ावर प्रश्न विचारलेला होता.

एमपीएससी मंत्र – विज्ञान आणि तंत्रज्ञान : अभ्यासक्रमाची वैज्ञानिक मांडणी

फारुक नाईकवाडे
राज्य सेवा मुख्य परीक्षा पेपर चार मधील विज्ञान आणि तंत्रज्ञान या घटक विषयाबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे. या घटकाची रचना फारशी बदललेली नाही. पण मुद्दय़ांचे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यामुळे नेमका अभ्यास कशाचा करायचा ते स्पष्ट झाले आहे. संदिग्धता कमी झाली आहे. उदाहरणार्थ आधीच्या अभ्यासक्रमातील ‘संगणक तंत्रज्ञानाची आधुनिक समाजातील भूमिका’ हा मुद्दा खूपच संदिग्ध आणि ‘काहीही’ विचारता येईल असा व्यापक होता. सन २०१४च्या मुख्य परीक्षेतील अशा एका प्रश्नावर खूप नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मुख्य परीक्षेच्या इतर पेपर्सचेही प्रश्न काही वेळा रद्द करण्यात आले आहेत. राज्यव्यवस्था आणि कायदे या अभ्यासक्रमाच्या पेपर दोनमध्ये ‘क्रिकेटच्या मैदानांचे आकार’ या मुद्दय़ावर प्रश्न विचारलेला होता. अभ्यासक्रमामध्ये संदिग्धता असेल तर प्रश्नकर्त्यांचेही असे गोंधळ उडू शकतात. अशा प्रकारचे प्रसंग यापुढे टाळले जातील अशी आशा करता येईल.

पुन्हा एकदा हा स्पष्ट उल्लेख व सल्ला आहे की, उमेदवारांनी किमान विज्ञान व तंत्रज्ञान घटकाचा अभ्यासक्रम इंग्रजीमध्येच पाहून तयारी करावी. मराठी अभ्यासक्रम हा इंग्रजी अभ्यासक्रमाचे अत्यंत असमाधानकारक भाषांतर (बऱ्याच ठिकाणी तर पूर्णपणे चुकीचे भाषांतर) आहे.

या घटक विषयाच्या अभ्यासक्रमातील नवे मुद्दे पुढीलप्रमाणे:

* ऊर्जा विज्ञान (घटक क्र. ३.१)

यामध्ये पारंपरिक व अपारंपरिक ऊर्जा स्रोत अशी विभागणी करून मांडणी करण्यात आली आहे. पारंपरिक ऊर्जा स्रोत आजही महत्त्वाचे आहेतच. त्यामुळे जीवाश्म इंधन, त्याचे ज्वलन, औष्णिक व जल विद्युत आणि ऊर्जा रूपांतरणासाठी आवश्यक द्रव स्थितीगतीशास्त्र (Essential fluid mechanics for energy conversion) हे नवे मुद्दे आहेत. (मराठी अभ्यासक्रमामध्ये आवश्यक द्रव गतीशास्त्र ऊर्जा रूपांतरण असा उल्लेख आहे.)

अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमध्ये समुद्रलाटा, जैव कचरा (अभ्यासक्रमामध्ये ‘जैव वस्तुमान, कचरा’ असा उल्लेख), पेट्रोलियम वनस्पती, साखर व पिकांची उपउत्पादने (अभ्यासक्रमामध्ये ‘ऊस पीक इत्यादीचे उपउत्पादन’ असा उल्लेख), ऑफ ग्रीड आणि ऑन ग्रीड सौर प्रकाश विद्युतकीय प्रणाली (अभ्यासक्रमामध्ये ऑफग्रीड व ऑनग्रीड हा शब्दप्रयोग सौर घटांबरोबर देण्यात आलेला नाही, मात्र इंग्रजीमध्ये  Off—grid & on—grid photo voltaic system  असा उल्लेख आहे.)

* संगणक व माहिती तंत्रज्ञान (घटक क्र. ३.२)

परिचय, कम्युनिके शन, नवीनतम साधने आणि तंत्रज्ञान या घटकातील सर्व मुद्दे नवीनच आहेत. केवळ शासकीय पुढाकार आणि सुरक्षा हे मुद्देच आधीच्या अभ्यासक्रमातून आलेले आहेत. परिचय, कम्युनिके शन हे मुद्दे आणि नवीनतम साधने घटकातील काही मुद्दे हे दुय्यम सेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये आधीच समाविष्ट आहेत. त्यांचा राज्य सेवा मुख्य परीक्षेमध्ये समावेश करून अभ्यासक्रम जास्त समावेशक करण्यात आला आहे.

* अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान (घटक क्र. ३.३)

भारतीय अंतराळ धोरण, इस्रो व संबंधित मुद्दे, अवकाश कचरा हे नवे मुद्दे आहेत. उपग्रह प्रक्षेपक हा मुद्दा आधी भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रम या नावाने समाविष्ट होता. आता नव्या स्वरूपातील उल्लेखामुळे भारतीय प्रक्षेपक आणि त्यांच्याशी संबंधित तथ्यात्मक माहितीवर जास्त फोकस असेल असे दिसते. म्हणजेच याबाबतच्या चालू घडामोडींच्या नोट्स व्यवस्थितपणे तयार करणे आवश्यक आहे. नैसर्गिक संसाधने, भूमाहिती प्रणाली अशा काही क्षेत्रांच्या व्यवस्थापनामध्ये अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर हा नवा मुद्दा आहे.

* जैव तंत्रज्ञान (घटक क्र. ३.४)

प्रस्तावना, किण्वन आणि पेटंट हे पूर्णपणे नवीन घटक आहेत. इतर मुद्दे नवीन वाटत असले तरी बारकाईने पाहिल्यास आधीच्या अभ्यासक्रमामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात समाविष्ट होते हे लक्षात येते. आधीच्या अभ्यासक्रमामध्ये जैव तंत्रज्ञानाची उपयोगिता या ढोबळ मुद्दय़ामध्ये कृषी, पशू प्रजनन, औषध निर्माण शास्त्र, मानवी आरोग्य, अन्न तंत्रज्ञान, पर्यावरण सुरक्षा या मुद्दय़ांचा समावेश होताच. नव्या अभ्यासक्रमामध्ये या मुद्दय़ांतर्गत नेमके काय अभ्यासावे याची चौकट आखून देण्यात आली आहे. यामध्ये नवे शब्दप्रयोग आढळतात. पण मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केले तर समजून येते की याच मुद्दय़ांवर प्रश्न विचारण्यात येत होते. याचा अर्थ अभ्यासक्रमामध्ये वाढ झालेली नाही तर नेमक्या मुद्दय़ांपर्यंत तो मर्यादित केलेला आहे.

* भारताचा औष्णिक कार्यक्रम (घटक क्र. ३.५)

इंग्रजीमधील  India’s Nuclear programme (भारताचा आण्विक कार्यक्रम) चे मराठी भाषांतर म्हणून भारताचा ‘औष्णिक’ कार्यक्रम हा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. भारताच्या अणू कार्यक्रमाची वैशिष्टय़े, आवश्यकता, आण्विक धोरणे, अणू वीज निर्मितीची प्रक्रिया, त्यामागील तंत्रज्ञान आणि आण्विक अपघात तसेच अणू वीज निर्मिती केंद्रे आणि आण्विक तंत्रज्ञानाचे अन्य क्षेत्रातील उपयोग हे नवे मुद्दे समाविष्ट करण्यात आले आहेत.

* आपत्ती व्यवस्थापन (घटक क्र. ३.६)

घटकाच्या शीर्षकामध्ये महाराष्ट्राचा विशेष संदर्भ इंग्रजी अभ्यासक्रमामध्ये आहे मराठीमध्ये नाही. या घटकातील आपत्तींचे वर्गीकरण, नैसर्गिक आपत्तींचे प्रकार आणि बॉम्बस्फोट हे मुद्दे वगळता सगळेच मुद्दे नवीन आहेत. सर्व प्रकारच्या आपत्तींची कारणे, परिणाम, उपाय योजना आणि त्या त्या आपत्तीमधील महत्त्वाचे प्रकार / उदाहरणे हे मुद्दे समाविष्ट करून अभ्यासक्रम सुसंबद्ध करण्यात आला आहे.

आपत्तींबाबतचे मूलभूत मुद्दे – पूर्वकल्पना, वितरण, धोके, मदत व पुनर्वसन हे मुद्देही समर्पकपणे समाविष्ट केलेले आहेत.

* वगळलेले मुद्दे

संगणक तंत्रज्ञानाची आधुनिक समाजातील भूमिका, नैसर्गिक संसाधनांच्या विकासातील, नगर नियोजनातील अंतराळ तंत्रज्ञानाची भूमिका, विद्या वाहिनी व ग्यान वाहिनी हे शासनाचे उपक्रम, जैव तंत्रज्ञानाची मानवी जीवन आणि अर्थव्यवस्था सुधारण्याची क्षमता, नैसर्गिक संसाधनांच्या विकासासाठी जैव तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञानातून  बियाणे निर्मिती, जैव तंत्रज्ञान विकास, नियंत्रण आणि व्यवस्थापनातील शासनाची भूमिका, अणुऊर्जेचा स्वच्छ ऊर्जा आणि ऊर्जास्रोत म्हणून विचार, NPT, CTBT, अमेरिकेसोबतचा अणुकरार आणि नैसर्गिक आपत्तींच्या केस स्टडीज.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mpsc exam preparation tips in marathi study plan for mpsc 2021 zws

ताज्या बातम्या