एमपीएससी मंत्र : राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षा – आर्थिक आणि सामाजिक भूगोल

या लेखामध्ये आर्थिक आणि सामाजिक भूगोलाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.

रोहिणी शहा

राजपत्रित तांत्रिक सेवा पूर्व परीक्षेच्या सामान्य अध्ययनातील प्राकृतिक आणि संकल्पनात्मक भूगोलाच्या तयारीबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये आर्थिक आणि सामाजिक भूगोलाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.

आर्थिक भूगोल

पूर्व परीक्षेमध्ये अर्थव्यवस्था हा घटक वगळण्यात आला असला तरी आर्थिक भूगोलावरील प्रश्न विचारले जाण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे या भागाचा व्यवस्थित अभ्यास आवश्यक आहे.

आर्थिक भूगोल हा बहुतांश तथ्यात्मक घटक आहे. यामध्ये आकडेवारी/ टक्केवारी आणि क्रमवारी याबाबतची माहिती अद्ययावत करून घेणे आवश्यक आहे. यासाठी आर्थिक पाहणी अहवालामधून महत्त्वाची पिके, खनिजे, उद्योग यांची देशातील सर्वाधिक उत्पादन, उत्पन्न व निर्यातीमधील वाटा असणारी राज्ये व यातील कोणत्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या तीन क्रमांकावर आहे याची माहिती अद्ययावत करुन घ्यायला हवी. महाराष्ट्रातील महत्त्वाची खनिजे, पिके व उद्योगांच्या उत्पादनाबाबत पहिल्या तीन जिल्ह्यांची माहिती करून घेतल्यास फायदेशीर ठरेल.

खनिजे व ऊर्जा स्रेत, महत्त्वाचे पायाभूत उद्योग, महत्त्वाची धरणे प्रकल्प आणि महत्त्वाची पर्यटन स्थळे यांचा कोष्टक मांडून अभ्यास करायचा आहे. या कोष्टकामध्ये समाविष्ट करायचे मुद्दे पुढीलप्रमाणे: स्थान, वैशिष्टय़े, आर्थिक महत्त्व, असल्यास वर्गीकरण, असल्यास पर्यावरणीय मुद्दे, संबंधित समस्या, कारण, उपाय, असल्यास संबंधित चालू घडामोडी.

महाराष्ट्रातील खनिजांचे उत्पादन होणारी क्षेत्रे, त्यांची भूशास्त्रीय रचना, उत्पादनाचे प्रमाण व गुणवत्ता, खाणींचे प्रकार या बाबी समजून घ्याव्यात. या दृष्टीने भारतातील व महाराष्ट्रातील खडकांचे प्रकार महत्त्वाचे असल्याने त्यांचा पुढील मुद्यांच्या अनुषंगाने अभ्यास करायला हवा: खडकांचा प्रकार, निर्मिती, कोठे आढळतो, भौगोलिक व वैज्ञानिक वैशिष्टये, रचना, आर्थिक महत्त्व,

महाराष्ट्रातील महत्त्वाची वने, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, जैवविविधता क्षेत्रे यांचा भौगोलिक व पर्यावरणीय वैशिष्टय़े व महत्त्व या दृष्टीने अभ्यास करावा. वनांचे आर्थिक महत्त्व समजून घ्यावे. भारतातील प्रसिद्ध वने, उद्याने व सद्यस्थितीत चर्चेत असलेली स्थळे याची माहिती करून घ्यावी. संदर्भ साहित्यातील संबंधित सगळे कोष्टक पाठ करणे आवश्यक नाही.

धार्मिक, वैद्यकीय, सांस्कृतिक पर्यटन, eco tourism,, राखीव उद्याने इ. संकल्पना व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. या वर्गीकरणांमध्ये येणारी महाराष्ट्रातील ठिकाणे व त्यांची वैशिष्टय़े माहीत असायला हवीत.

सामाजिक भूगोल

यामध्ये राजकीय, मानवी आणि लोकसंख्या भूगोल हे उपघटक विचारात घ्यायचे आहेत.

राजकीय भूगोल

प्रशासकीय विभागातील जिल्हे, त्यांची मुख्यालये व त्यांची वैशिष्टय़े, जिल्ह्यांची कालानुक्रमे निर्मिती, महत्त्वाची शहरे, आर्थिक व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणे यांची कोष्टक मांडून टिपणे काढावीत.  यामध्ये पर्यटनस्थळे (tourists spots), सान्निध्यात असल्यास नदी/ धरण/ पर्वतशिखर, औद्योगिक उत्पादने, वैशिष्टय़पूर्ण पारंपरिक उत्पादने/ हस्तोद्योग, ऐतिहासिक वारसा स्थळे/ इमारती, ठिकाणाशी संबंधित ऐतिहासिक व चर्चेतील व्यक्तिमत्त्वे यातील जे मुद्दे लागू होतील त्यांचा समावेश करून टिप्पणे काढावीत.

राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा, इतर राज्यांच्या सीमेवरील जिल्हे, जिल्ह्यांच्या सीमा म्हणून उपयुक्त ठरणारी नदी /डोंगर नैसर्गिक भूरूप आणि राज्याचा राजकीय नकाशाही व्यवस्थित अभ्यासणे आवश्यक आहे.

लोकसंख्या भूगोल

भारताच्या व राज्याच्या लोकसंख्येचा साक्षरता, नागरीकरण, लिंगगुणोत्तर, रोजगार, लोकसंख्येची घनता या मुद्दय़ाच्या आधारे आढावा घ्यावा. जन्मदर, मृत्युदर, बाल लिंगगुणोत्तर, माता मृत्युदर, अर्भक मृत्युदर, बाल मृत्युदर यांची माहिती असायला हवी.

यामध्ये सन २००१ व २०११ च्या जनगणनेची तुलना, वरील मुद्दा सर्वाधिक व सर्वात कमी प्रमाण असलेली तीन राज्ये, तुलनेने सर्वात जास्त व सर्वात कमी वाढ झालेली राज्ये व सर्व बाबतीत महाराष्ट्राचे दोन्ही वर्षांमधील स्थान तसेच महाराष्ट्राच्या बाबतीत सर्वाधिक व सर्वात कमी प्रमाण व वाढीचे जिल्हे अशा मुद्यांच्या कोष्टकामध्ये नोट्स काढणे फायदेशीर ठरेल.

मानवी भूगोल

वसाहतींचे प्रकार या मुद्यावर फारसे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता नसली तरी वसाहतीचे प्रकार, आकार, स्वरूप, ठिकाण व आर्थिक महत्त्व या मुद्यांचा आढावा घेणे फायदेशीर ठरेल. मानवी स्थलांतर हा मुद्दाही VIMP यादीत ठेवायची आवश्यकता नाही. तरीही घटक विषयांची व्याप्ती पाहता यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. स्थलांतराची कारणे, स्वरूप, समस्या, परिणाम व उपाय इ. दृष्टीने अभ्यास आवश्यक आहे. या बाबतीत आकडेवारीह्ण हा मुद्दा महत्त्वाचा आहे. विशेषत: महाराष्ट्राच्या संदर्भातील स्थलांतराची आकडेवारी (म्हणजे टक्केवारी) आर्थिक पाहणी अहवालामधून अद्ययावत करून घ्यायला हवी. यामध्ये स्थलांतरातील सामाजिक घटकांचे उतरत्या क्रमाने प्रमाण, कारणांची उतरत्या क्रमाने टक्केवारी, कोणत्या ठिकाणाहून स्थलांतर होत आहे त्यांच्या टक्केवारीचा उतरता क्रम ही आकडेवारी महत्त्वाची आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mpsc exam preparation tips in marathi tips for mpsc study zws

ताज्या बातम्या