एमपीएससी मंत्र : कर सहायक मुख्य परीक्षा – पदनिहाय पेपर प्रश्न विश्लेषण

या घटकावरील प्रश्न हे नेमके तरतूद विचारणारे आहेत. तथ्यात्मक, बहुविधानी आणि विश्लेषणात्मक असे प्रश्नांचे वेगवेगळे स्वरूप दिसून येते.

एमपीएससी मंत्र : कर सहायक मुख्य परीक्षा – पदनिहाय पेपर प्रश्न विश्लेषण
(संग्रहित छायाचित्र)

फारुक नाईकवाडे

विक्री कर विभागातील कर सहायक पदासाठीचा पेपर दोन या वर्षी २७ ऑगस्ट रोजी होणार आहे. सन २०१८ व २०१९च्या मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण या वर्षीच्या तयारीसाठी उपयोगी ठरेल. मागील वर्षी विचारण्यात आलेल्या प्रश्नांची घटकनिहाय संख्या आणि प्रश्नांचे स्वरूप कशा प्रकारचे होते त्याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे, तर पुढील लेखापासून या विश्लेषणाच्या आधारे पदनिहाय पेपरची तयारी कशी करावी याबाबत चर्चा करण्यात येईल.

नागरिकशास्त्र आणि भारतीय राज्यघटना

या घटकावर एकूण १५ प्रश्न विचारलेले आहेत. अभ्यासक्रमात वेगळय़ाने उल्लेख केलेला असला तरी हे दोन्ही घटक एकत्रितपणे अभ्यासणे आवशयक आणि व्यवहार्य आहे. त्यामुळे स्थानिक आणि राज्य स्तरावरील प्रशासन हे नागरिकशास्त्रातील मुद्दे भारतीय राज्यघटनेच्या अभ्यासाचा भाग म्हणूनच अभ्यासावेत जेणेकरून परिणामकारक अभ्यास होईल.

नागरिकशास्त्रावर ०५ प्रश्न विचारण्यात आले आहेत. या घटकावरील प्रश्न हे नेमके तरतूद विचारणारे आहेत. तथ्यात्मक, बहुविधानी आणि विश्लेषणात्मक असे प्रश्नांचे वेगवेगळे स्वरूप दिसून येते.

भारतीय राज्यघटनेवर १० प्रश्न विचारण्यात आले आहेत. या घटकावरील प्रश्न हे बहुविधानी आणि विश्लेषणात्मक स्वरूपाचे असले तरी नेमक्या तरतुदी आणि पारंपरिक आयाम समजून घेतल्यावरच ते सोडविता येतील अशा प्रकारचे आहेत.

पंचवार्षिक योजना

या घटकावर ०५ प्रश्न विचारण्यात आले आहेत. पंचवार्षिक योजनांच्या कालावधीतील वेगवेगळे आयाम विचारलेले दिसून येतात. योजनेची उद्दिष्टे, राजकीय आयाम, मूल्यमापन अशा मुद्दय़ांचा प्रश्नांमध्ये समावेश केलेला दिसून येतो. त्यामुळे सर्व पंचवार्षिक योजनांचा तथ्यात्मक आणि विश्लेषणात्मक अभ्यास आवश्यक ठरतो.

चालू घडामोडी

भारताचे द्विपक्षीय संबंध, आंतरराष्ट्रीय संस्था/ संघटना, क्रीडा क्षेत्र, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, पुस्तके, शासकीय योजना अशा मुद्दय़ांच्या चालू घडामोडींबाबत प्रश्न विचारलेले आहेत.

या घटकावर १० प्रश्न विचारण्यात आले आहेत. यामध्ये बहुविधानी प्रश्नांचे प्रमाण जास्त आहे. त्यामूळे नेमकी माहिती असणे असे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक आहे.

बुद्धिमत्ता चाचणी, मूलभूत गणितीय कौशल्य आणि अंकगणित या घटकावर एकूण ३० प्रश्न विचारण्यात आले आहेत. बुद्धिमत्ता चाचणीचे १५ आणि मूलभूत गणितीय कौशल्य व अंकगणित मिळून १५ अशी विभागणी प्रत्येक वर्षी गृहीत धरता येईल.

बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न हे जास्त लांबीचे व त्यामुळे थोडय़ा जास्त प्रमाणात वेळ घेणारे असे आहेत. बहुतांश प्रश्नांमध्ये भाषिक तार्किक क्षमतेचा वापर करावा लागेल अशा प्रकारे प्रश्नांची रचना करण्यात आलेली दिसून येते. 

मूलभूत गणितीय कौशल्य आणि अंकगणित या घटकावरील प्रश्न हे अभ्यासक्रमामध्ये नमूद केल्याप्रमाणे दहावीच्या काठिण्यपातळीचे आहेत. त्यामुळे पुरेशा सरावाने या १०-१५ गुणांची तजवीज सहज होऊ शकते.

पुस्तपालन व लेखाकर्म

या घटकामध्ये संकल्पनात्मक आणि पारंपरिक प्रश्नांवर भर देण्यात आलेला आहे. तसेच बँक जुळवणी पत्रक, घसारा मूल्य इत्यादीबाबत गणिते विचारण्यात आली आहेत. नियम वापरून योग्य पर्याय शोधण्यासारखे प्रश्नही विचारलेले दिसून येतात.

या घटकावर २० प्रश्न विचारण्यात आले आहेत. नेमका आणि मुद्देसूद अभ्यास केल्यास आत्मविश्वासाने सोडविता येतील अशी प्रश्नांची काठिण्यपातळी आहे. प्रश्नसंख्या, प्रश्नांचे स्वरूप आणि काठिण्यपातळी यांचा विचार करता हा घटक सर्वाधिक गुणदायक ठरू शकतो. त्यामुळे अभ्यास करताना अभ्यासक्रमातील कोणताच मुद्दा वगळू नये.

आर्थिक सुधारणा आणि कायदे

या घटकावर २० प्रश्न विचारण्यात आले आहेत. घटकाच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट प्रत्येक मुद्दय़ावर प्रश्न विचारण्यात आला आहे. प्रश्नांच्या स्वरूपामध्ये पारंपरिक, तथ्यात्मक, बहुविधानी, मूलभूत संकल्पनांवर आधारित असे वैविध्य आढळून येते.

आर्थिक सुधारणांशी संबंधित सर्व मूलभूत संकल्पना समजून घेणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील ठळक व दूरगामी परिणाम करणाऱ्या घडामोडींचा कालानुक्रम समजून घेणे, संबंधित सार्वजनिक वित्त व व्यापारविषयक मुद्दे समजून घेणे आणि याबाबतच्या चालू घडामोडींबाबत सजग राहणे या बाबी या घटकाच्या तयारीसाठी आवश्यक आहेत. वरील मुद्दय़ांपैकी बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांच्या तयारीबाबत यापूर्वी चर्चा करण्यात आली आहे. इतर घटकांच्या तयारीबाबत या व पुढील लेखांमध्ये चर्चा करण्यात येईल.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
यूपीएससीची तयारी: डॉलर विरुद्ध रुपया
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी