रोहिणी शहा
लिपिक टंकलेखक पदाच्या पेपर दोनच्या प्रश्नांचे विश्लेषण व गणित आणि सामान्य ज्ञान घटकांच्या तयारीबाबत मागील लेखामध्ये चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये सामान्य विज्ञान, पुरस्कार, माहिती तंत्रज्ञान आणि माहिती अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम या घटकांच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे.

सामान्य विज्ञान
रसायनशास्त्रामध्ये पुढील मुद्दय़ांचा अभ्यास आवश्यक आहे- मूलद्रव्यांचे वर्गीकरण, आवर्तसारणी, महत्त्वाच्या मूलद्रव्यांची वैशिष्टय़े, उपयोग, अणूंची रचना, कार्बनी व अकार्बनी रसायनशास्त्र, कार्बनी संयुगांमधील बंधांचे स्वरूप, महत्त्वाचे सिद्धांत, महत्त्वाच्या कार्बनी व अकार्बनी संयुगांची रेणूसूत्रे, वैशिष्टय़े, उपयोग, महत्त्वाच्या अभिक्रिया इत्यादीसारख्या मूलभूत बाबींची व्यवस्थित उजळणी करायला हवी.

Ramzan 2024
रमजान: जगातील विविध धर्मीय उपवासाच्या परंपरा नक्की काय सांगतात?
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान
loksatta analysis india fights somali pirates indian navy rescues ship from somali pirate attack
विश्लेषण: हुथींपाठोपाठ आता सोमाली चाच्यांचा उच्छाद… भारतीय नौदलाची भूमिका कशी ठरणार निर्णायक?

भौतिकशास्त्रातील महत्त्वाचे सिद्धांत, मूलभूत संकल्पना, विद्युत इत्यादींवरील समीकरणे यांचा प्रश्नांमध्ये समावेश असल्याचे दिसते. या घटकावर साधे सोपे (Straight forward)प्रश्न विचारण्याचे प्रमाण कमी आहे. मात्र मूलभूत अभ्यास झाला असेल तर आत्मविश्वासाने हे प्रश्न सोडविता येतात. वस्तुमान, बल, दाब, गती, ऊर्जा, विद्युत, प्रकाश, चुंबकत्व या मुख्य घटकांचा अभ्यास महत्त्वाचे सिद्धांत, महत्त्वाची समीकरणे, संबंधित राशीचे एकक, गणना, वैशिष्टय़े, स्रोत, परिणाम, उपयोग अशा मुद्दय़ांच्या आधारे करायला हवा.

वनस्पती व प्राणीशास्त्रातील वर्गीकरण, विविध वर्गातील वनस्पती / प्राण्यांची वैशिष्टय़े, वनस्पतींसाठीची पोषक द्रव्ये, त्यांचे रोग यावर प्रश्न विचारलेले आहेत. रोगांचे प्रकार, त्यांची लक्षणे, कारणीभूत घटक, प्रसार, बाधित होणारे अवयव, उपचार पद्धती अशा मुद्दय़ांच्या अनुषंगाने अभ्यास करावा.
स्थूल पोषणद्रव्ये: कबरेदके, प्रथिने व मेद आणि सूक्ष्म पोषणद्रव्ये : जीवनसत्त्वे, खनिज व क्षार या पोषण द्रव्यांचा स्रोत, शरीरावरील त्यांचे परिणाम, कमतरता व अधिक्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, त्यावरील उपाय या मुद्दय़ांच्या आधारे अभ्यास करावा. आरोग्य व पोषणाबाबतच्या केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या महत्त्वाच्या तरतुदी नेमकेपणाने माहीत असाव्यात.

पुरस्कार
चित्रपट, संगीत, पत्रकारिता, प्रशासन, संशोधन, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य स्तरावरील पुरस्कार माहीत असावेत. त्यांचे स्वरूप, प्रदान करणाऱ्या संस्था, सुरुवात, निवडीसाठीचे निकष या बाबी माहीत करून घ्याव्यात. साहित्य क्षेत्रातील आंतरराष्टीय पुरस्कार, चर्चेतील महत्त्वाची पुस्तके व त्यांचे लेखक, चर्चेतील लेखकांबाबतच्या महत्त्वाच्या बाबी पाहाव्यात. भारतातील व्यक्तींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असल्यास त्यांच्याबाबतची अतिरिक्त माहिती असणे, आवश्यक आहे. केंद्र शासनाचे पद्म, शौर्य, क्रीडा आणि श्रम इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार त्यांचे स्वरूप, पुरस्कारप्राप्त व्यक्ती व त्यांचे कार्यक्षेत्र, प्राप्त व्यक्ती या मुद्दय़ांच्या आधारे अभ्यासावेत. महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार, त्यांचे स्वरूप, पुरस्कारप्राप्त व्यक्ती यांची माहिती असायला हवी. शांतताविषयक आंतरराष्ट्रीय व भारत सरकारचे पुरस्कार, त्यांची पार्श्वभूमी, स्वरूप, पुरास्कारप्राप्त व्यक्ती/ संस्था हे मुद्दे पाहावेत. महत्त्वाच्या खेळांचे विश्वचषक, ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धा, इतर महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, त्यातील विक्रम, भारत/ महाराष्ट्र यांची कामगिरी यांचा आढावा घ्यायला हवा.

माहितीचा अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम
या कायद्यांचा मूळ दस्तावेज पाहून अभ्यास करणे आवश्यक आहे. कायद्याची पार्श्वभूमी, महत्त्वाच्या व्याख्या समजून घ्याव्यात. कायदा व त्याच्या अंमलबजावणीचे नियम दोन्ही बाबी व्यवस्थित अभ्यासणे आवश्यक आहे. दोन्ही कायद्यांतर्गत माहिती किंवा लोकसेवा मागण्याची विहित पद्धत, शुल्क, माहिती किंवा लोकसेवा पुरविणारे अधिकारी, विहित कालमर्यादा, कालमर्यादा ओलांडल्यावर तक्रारीसाठीचे/ अपिलासाठीचे अपिलीय प्राधिकारी, तक्रारी/ अपीलासाठीची (असल्यास निर्णय देण्याची/ कार्यवाहीची) कालमर्यादा, दंड/ शिक्षेची तरतूद, नमूद केलेले अपवाद, माहिती आयोग/ लोकसेवा हक्क आयोगांची रचना, अध्यक्ष सदस्य पदासाठी अर्हता, नेमणूक प्रक्रिया, दोन्ही आयोगांचे कार्य, अधिकारक्षेत्र, जबाबदाऱ्या समजून घेणे आवश्यक आहे.

माहिती व संपर्क तंत्रज्ञान
या घटकाचा अभ्यासक्रम माहिती व संपर्क तंत्रज्ञानासंबंधी प्राथमिक ज्ञान प्रकारे विहित केलेला आहे. प्रश्नांचे स्वरूप पाहता सरळसोट (straight forward )आणि प्राथमिक माहितीवर आधारित असेच असल्याचे लक्षात येते. यामध्ये माहिती साठविणे, तिच्यावर प्रक्रिया करणे, तिचे प्रसारण करणे या तीन मूलभूत बाबींशी संबंधित मुद्दे विचारात घेणे आवश्यक आहे. माहिती साठविण्याच्या पद्धती, त्यासाठीची उपकरणे (hardaware), नियमावली (software)त्यांचे प्रकार, उपयोग माहीत करून घ्यावेत. माहितीवर प्रक्रिया करण्यासाठीच्या उपकरणे, नियमावली, विविध ॲप, व्हायरसचे प्रकार आणि याबाबतच्या चालू घडामोडी माहीत करून घ्याव्यात. माहितीचे संप्रेषण/प्रसारण करण्यासाठी आवश्यक घटकांची माहिती असायला हवी. संप्रेषणाच्या विस्तार, माध्यम व गतीच्या आधारे त्याचे प्रकार समजून घ्यावेत.माहिती संप्रेषणाशी संबंधित मुद्दे, सायबर कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.